माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान देणारे पुस्तक :
महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप
लेखक - श्री.संजय सोनवणी
एवढ्यांतच "महार कोण होते?" हे सुप्रसिद्ध लेखक आणि संशोधक "श्री.संजय सोनवणी" यांनी लिहिलेले पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण केले. महार समाजाचा इतिहास सांगणारे पुस्तक असे या पुस्तकाकडे कोणी पाहिले तर तो या पुस्तकावर मोठा अन्याय होईल. महार समाजाचा उगम घेता घेता लेखक श्री. संजय सोनवणी यांनी प्रत्यक्ष मानव संस्कृती कशी अस्तित्त्वात आली? जन्मावर आधारित जातीय व्यवस्था कशी अस्तित्त्वात आली? त्यातून शूद्र म्हणून हिणवले गेलेल्यांवर अमानवीय अत्याचार कसे झाले? कर्मकांडांच्या अवडंबरातून सत्ता केंद्रीत करुन बहुजनांचे शोषण कसे झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यांच्या आधारे व अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने या पुस्तकातून दिलेली आहेत. म्हणूनच हा ग्रंथ केवळ महार समाजाचा न राहता त्याहीपलिकडे जाऊन अखिल मानव समाजाचा होतो. केवळ १०९ पानांच्या या अफाट आवाका असलेल्या पुस्तकाचे संशोधन लेखकाने प्रचंड मेहनतीने, अत्यंत तर्कशुद्ध व तळमळीने केल्याचे जाणवते, त्याबद्दल लेखक श्री. संजय सोनवणी हे नक्कीच कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या या अनमोल संशोधनाची दखल भविष्यातील कित्येक शतके घेतली जाईल. पुस्तकातील केवळ १०% एवढ्याच गोष्टी मी या परिक्षणात घेऊ शकलो आहे यावरुन पुस्तकाचा आवाका लक्षात यावा.
प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचे भान आणवून देणारे पुस्तक असे मी या पुस्तकाचे वर्णन करेन. खरे तर पुस्तकाच्या शीर्षकापासूनच या पुस्तकाच्या आत काय दडले असेल याचा अंदाज येतो. पण एका अज्ञात संशोधनाच्या खोलीत शिरत असल्याचा थरारही जाणवतो. साधारणपणे संशोधनग्रंथ म्हटला की त्यात आकडेवारी, प्रचलित समजूती, लेखकाने पूर्वग्रहाने केलेली मते असा भडीमार असतो. पण 'महार कोण होते?' चे लेखक या सर्व किचकट मांडणीला पूर्ण फाटा देत सर्वसामान्यांना सोप्या भाषेत हे संशोधन समजावून देण्यात अतिशय यशस्वी झालेले आहेत. म्हणूनच या ग्रंथाचे मोल अद्वितीय असे आहे.
महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप या नावावरुनच लेखक श्री. संजय सोनवणी वाचकांना महारांचा उगमापासूनचा शोध घेऊन त्यांची भविष्यकाळातील दिशा स्पष्ट करणार असल्याचे वाचकाच्या लक्षात येते. अवघ्या १०९ पानांच्या या पुस्तकात लेखकाच्या भूमिकेबरोबर एकूण आठ प्रकरणे आहेत. मूर्ती लहान पण आवाका मात्र प्रचंड असे सामर्थ्य या पुस्तकात आहे. एकेक प्रकरणाचा थोडक्यात आढावा घेऊन पाहूयात.
पुस्तकाचे वाचन करण्यापूर्वी कोणताही पूर्वग्रह मनात वाचकांनी ठेवू नये यासाठी लेखकाने खास छोटीशी भूमिका मांडली आहे. पुस्तकांतील क्रांतिकारी विचार समजून घेण्याच्या दृष्टीने ती अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. संजय सोनवणी म्हणतात की जन्माधारित जातीय व्यवस्थेच्या माध्यमातून एका जातीय चौकटीत ढकलण्यात ब्राह्मण वर्ग हा कारणीभूत होता. पण ते हेही अधोरेखित करतात की (सर्वच ब्राह्मण समाज नव्हे), पुस्तक वाचणार्या प्रत्येक ब्राह्मणाने ही गोष्ट लक्षात घेतली की या पुस्तकातील विचार तो खुल्या मनाने पाहू शकेल. जातीय व्यवस्थेला आणणार्या पुरोहित व्यवस्थेचे दोष दाखवताना 'माणूस बदलतो यावर माझा पुरेपूर विश्वास आहे','हिंसा शारिरिक असते तशीच सांस्कृतिकही असते' असे व्यवस्थेवर तटस्थ दृष्टीकोनातून लेखकाने टिप्पणी केली आहे. हा सिद्धांत पुढे नेण्यासाठी त्यात त्रुटी आढळल्याच तर त्या लक्षात आणून देण्याचे आवाहनही लेखक खुल्या मनाने करतात. यावरुन लेखकाची भूमिका स्पष्ट व्हावी. आता एकेक प्रकरणाचा आढावा घेऊयात.
प्रकरण १:
यात लेखक ऋग्वेद काळापासून हिंदू धर्माचा वेध घेताना 'जन्माधारित वर्ण-जात ठरवणारी ही जगातील एकमेव धर्मव्यवस्था आहे' हेही कठोरपणे वाचकाच्या निदर्शनास आणून देतात. लेखकाने मते मांडण्यापूर्वी ऋग्वेदातील पुरुषसूक्त व त्याचा अर्थ दिला आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जसेच्या तसे दिले आहेत. त्यानंतर ऐतरेय ब्राह्मण व मनुस्मृती चे दाखले देऊन क्र. ११ व १२ या ऋचा पुरुषसूक्तातील बाकीच्या ऋचांपेक्षा कशा भिन्न आहेत व कालौघात या ऋचा नंतर त्यात जोडल्या गेल्या आहेत हे लेखकाने या प्रकरणात सिद्ध केले आहे. यासाठी लेखक आर.सी.दत्त यांचा दाखला देऊन मूळ ऋग्वेदात छेड्छाड केली गेल्याचे झरथ्रुष्टाच्या उदाहरणाने लेखक सप्रमाण सिद्ध करतात. तसेच व्यासांनी वेद संकलित केल्याचाही दाखला ते विचारात घेतात. ऋग्वेदातील इतर सर्व १०,००० पेक्षा अधिक ऋचांमध्ये कुठेही जन्मावर आधारित जातीय व्यवस्थेचे उल्लेख नसताना फक्त एका पुरुषसूक्ताच्या ११ व १२ व्या ऋचेत हा उल्लेख असल्याने लेखकाचे मत मान्य होण्यास वाचकाला अडचण पडत नाही.
प्रकरण २:
यात हिंदू हा शब्द कोठून आला याची लगेच पटणारी तार्कीक मीमांसा केली आहे. तसेच व्यक्तीप्रणीत धर्म आणि रुढ धर्म यांतील मूलभूत फरक लेखकाने अतिशय प्रभावी पद्धतीने मांडला आहे. प्रत्यक्ष महाभारतातील दाखल्यापासून अनेक गोष्टींचा यात विचार केला आहे की ज्या कारणामुळे जन्माधारित जातीय व्यवस्था अस्तित्त्वात कशी आली याची भूमिका वाचकाच्या लक्षात यावी.
प्रकरण ३:
यात लेखकाने सृष्टीत सर्वात आधी कोण अस्तित्त्वात आले आणि कोणत्या क्रमाने अस्तित्त्वात आले याची तार्कीक फोड केली आहे. त्यासाठी पुरुषसूक्ताच्या आधाराने जन्माधारित वर्णव्यवस्था अस्तित्त्वात कशी आली यावर मंथन केले आहे. बाकीचा ऋग्वेद कुठेही वर्णव्यवस्था असल्याचे वा अत्यावश्यक असल्याचे सांगत नाही हे अधिक स्पष्ट करताना पुरातन मानवाची शिकारी मानवाकडे वाटचाल झाली त्यानंतर मानवाचे जे विचारी मनवात स्थित्यंतर झाले त्याकाळी धर्म अस्तित्त्वात तरी होता काय? हेही लेखक परखडपणे दाखवून देतात. 'आदिमानवाने प्रतिकूल निसर्गाशी संघर्ष करत असतानाच ज्या गूढांशी ज्या पद्धतीने वैचारिक सामना केला त्याला तोड नाही' हे एक शाश्वत सत्य लेखक या प्रकरणातून मांडत असताना धर्म म्हणजे काय? याची मानवाने निसर्गाशी तादात्म्य साधत कशी उकल केली हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. याच प्रकरणात नाग हा शब्द आपल्या जीवनात किती घट्ट्पणे रुळला आहे हे स्पष्ट करताना लेखक नगर, नागरिक, नागर हे शब्द उदाहरणादाखल देतो तेव्हा आपसूकच वाचकाच्या मनात प्रश्न उमटतो की, अरेच्च्या हे आपल्याला कसे माहिती नव्हते? या प्रकरणाच्या शेवटी लेखकाने मानवी विकासाचा मुद्देसूद क्रम दिला आहे, याचा उपयोग वाचकाला पुढील प्रकरणांतील गुह्य समजण्यात होते.
प्रकरण ४:
या प्रकरणात लेखकाने रक्षक संस्थेचा इतिहास सांगितला आहे. आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींतून लेखकाने जे संशोधन समोर ठेवले आहे त्याला तोड नाही. लेखकाने थेट सातवाहनांच्या (इसवी सनाच्याही आधीच्या) काळापासून रक्षक संस्था कशी अस्तित्त्वात आली याचे पुरावे देता देता महार शब्द कसा निर्माण झाला याचाही वेध घेतला आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात असलेल्या मॅगॅस्थेनिस या वकीलाने त्याकाळी केलेल्या नोंदींतून लेखकाने अतिशय परिश्रमाने माहितीचे सगळे तुकडे शोधून आपल्याला जोडून दाखवले आहेत. या अस्सल पुराव्यांतून रक्षक संस्थेचा इतिहास लेखकाने कसा शोधला ते अवश्य या प्रकरणात वाचा. जात कशी निर्माण झाली याचाही परामर्श लेखकाने या प्रकरणात घेतला आहे. रक्षक संस्थेच्या जबाबदार्या या प्रकरणांत नोंदवल्या आहेत.
प्रकरण ५:
महार समाजाला एक गौरव प्राप्त करुन देणारे असे हे अतिशय महत्त्वाचे प्रकरण आहे. या प्रकरणातून लेखकाने महार कोण होते? यावर अतिशय तर्कनिष्ठ मांडणी करुन त्यांच्या जबाबदार्या वाचकांच्या समोर मांडल्या आहेत. मागच्याच प्रकरणात लेखकाने रक्षक संस्थेचा इतिहास समोर ठेवला होता त्याची आठवण वाचकाला झाल्याशिवाय रहात नाही. वाचक मनातल्या मनात तुलना करत असतानाच लेखकाने हा तर्क पुढे अधिक स्पष्ट करुन महारांवर असलेल्या जबाबदार्यांचा वेध घेतला आहे. पण महारांना ज्या हीनतेच्या पातळीवर ढकलल्या गेले त्याबद्दल लेखक खंत व्यक्त करताना म्हणतो की - 'त्याचे जे दूरगामी परिणाम भारतीय मानसिकतेवर पडले ते दूर करायला अजून किती पिढ्या लागतील हे आज तरी सांगता येत नाही.'
प्रकरण ६:
या प्रकरणात महार शब्दाची उपपत्ती शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. इरावती कर्वे, शिवरामपंत भारदे, रॉबर्टसन, महात्मा फुले, रा.गो.भांडारकर अशा मान्यवर संशोधकांचे महार शब्दाबद्दलचे मत लेखकाने दिले आहे व त्याचे तर्कशुद्ध विश्लेषणही केले आहे. मनुस्मृती, इतर पुराणे, उपनिषदे, वेद अशा सर्वांचा सखोल अभ्यास करुन लेखकाने दाखवून दिले आहे की - 'जाती या विशिष्ट सेवा-उद्योगातील कौशल्यातून निर्माण झाल्या आहेत.' जन्माने कोळी असलेल्या व्यास व वाल्मीकी यांनी विश्वविख्यात काव्ये लिहिल्याचे दाखवून पुरातनकाळी जन्माधारित जातीय व्यवस्था नसल्याचे लेखक सप्रमाण दाखवून देतात. 'महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवय्या अशी राहिलेली आहे' हे आजच्या प्रगल्भ वाचकाला लेखक जाणवून देतात. महारांची वस्ती गावाबाहेर का? त्यांची कामे यांबरोबरच मरिआई या देवतेचे देखील तार्किक विश्लेषण लेखकाने केले आहे.
प्रकरण ७:
या प्रकरणातून लेखकाने महार समाजाची सामाजिक अवनती कशी आणि कधी झाली? यावर प्रकाश टाकला आहे. हा इतिहास कापवून टाकणारा असला तरी वाचकाने तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे त्यामुळे त्या अनुषंगाने अधिक सांगून वाचकाचा थरार घालवत नाही. तरी या प्रकरणात लेखकाने पुराणांनी घातलेल्या समुद्रबंदी, महामंदी, दुष्काळांची रांग, अस्पृश्यतेचा आरंभकाळ अशा अनेक अंगांनी सखोल विचार केला आहे. बेदरच्या महाराजाने १४ व्या शतकात विठ्या महाराला दिलेल्या सनदेच्या पुराव्याच्या आधारे काही समजूतींना आणि पूर्वग्रहांना अर्थ नव्हता हे देखील लेखकाने सिद्ध केले आहे.
प्रकरण ८:
यात लेखकाने वर्तमान व भवितव्य यावर अतिशय परखडपणे व तटस्थ असे अवलोकन करुन विचार महार समाजापुढे ठेवले आहेत. आजच्या समतेच्या जगात महार समाजाने पुढे कसे जायचे याचा एकंदरीत आराखडाच लेखकाने मांडला आहे व महार समाजाने व त्यांच्या नेत्यांनीच या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधली पाहिजेत असेही लेखक शेवटी दाखवून देतात.
या सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन झाल्यावर अजून काही थोडक्यात सांगतो -
लेखकाने पहिली तीन प्रकरणे वैदिक कालापासूनच्या उत्खननास दिलेली आहेत. या तीन प्रकरणांतून पुरुषसूक्त कसे प्रक्षिप्त आहे हे लेखकाने सप्रमाण सिद्ध करुन त्याअनुषंगाने जन्माधारित जातीयतेची पाळेमुळे पुराणग्रंथांतून कशी रुजवली गेली. आणि त्याद्वारे फक्त महारांचेच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचे अवमूल्यन कालौघात कसे झाले यादॄष्टीने ही तीन प्रकरणे अत्यंत महत्त्वाची ठरतात. अगदी अलिकडच्या काळापर्यंत महारांचे अवमूल्यन का आणि कसे झाले? हे समजून घ्यायचे असेल तर त्याची सुरुवात कोठे झाली आणि नंतरच्या काळात ती वाढीस कशी लागली यावर प्रकाश पडल्याशिवाय महार कोण होते? या प्रश्नाचा विचार करुनही उपयोग नव्हता हे अगदी पटते. संशोधन प्रश्नाच्या अगदी मुळापासून कसे असावे हे या पुस्तकातून शिकायला मिळते.
पुस्तक वाचून खाली ठेवल्यावर आजचे महार लाचारीचे जगणे सोडून अभिमानाने जगायला नक्कीच शिकतील असा विश्वास वाटतो. आणि महारेतरांना या पुस्तकामुळे महारांविषयी (असलीच तर) हीनत्त्वाची भावना समूळ नष्ट होण्यास नक्कीच मदत होईल.
जाता जाता महार कोण होते? हा शोध हा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जातीय व्यवस्थेचा शोध खरेतर आहे. असे तटस्थ मूल्यांकन वाचकांना देताना लेखक श्री. संजय सोनवणी यांची श्री. हरि नरके यांना अर्पण केलेली अर्पणपत्रिका लेखकाच्या संवेदनशीलतेचा परिचय वाचकांना देतात.
परंपरागत समजुतींना धक्का देणारे आणि वारंवार वाचून चिंतन करावे असे 'महार कोण होते?' हे पुस्तक आहे असे आवर्जून म्हणेन. संजय सोनवणी यांनी या पुस्तकाद्वारे महारांचा शोध घेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे जाणवते. महार कोण होते या सिद्धांताची अत्यंत तर्कनिष्ठ आणि सप्रमाण अशी मांडणी श्री. सोनवणी यांनी केलेली आहे, त्यासाठी ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. वाचकांनी खुल्या मनाने या पुस्तकाचे स्वागत करावे ही विनंती.
धन्यवाद,
सागर भंडारे
बंगलोर
आयुष्याला कलाटणी देणारे एक क्रांतिकारी पुस्तक...
ReplyDeleteमी गरीब का आहे?
या क्रांतिकारी पुस्तकाच्या माध्यमातून “गरीबी” हा विषय लेखक - राज धुदाट यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. गरीबीची कारणे त्यांनी समर्पकपणे सांगितली आहेत, त्याचं बरोबर गरीबीमधून बाहेर पडण्यासाठी असलेले पर्याय सुद्धा त्यांनी सुचवलेले आहेत / दिलेले आहेत.
मी गरीब घराण्यात जन्माला आलो म्हणून मी आयुष्यभर गरीबचं राहावं असे कुठे लिहिले आहे काय? किंवा असा काही नियम आहे काय? प्रत्येकाला आपल्या गरीबीवर नैतिक मार्गाने मात करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी तर असे म्हणेन आपल्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी लागणारी श्रीमंती आमच्या प्रत्येकाला मिळायलाचं हवी आणि किंबहुना तो आमचा जन्मसिध्द अधिकारच आहे. जरी गरीब घरात जन्मास येऊन तो अधिकार आमच्या पासून दूर गेला असेल तरी, अहिंसा व सत्याच्या मार्गाने आम्ही तो अवश्य प्राप्त करू शकतो. आमची गरीबी दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे ऐवढे मात्र खरे. गरीबीवर मात केलेल्यांची अनेक उदाहरणे देता येतील; धीरुबाई अंबानी एकेकाळी पेट्रोल पंपावर किरकोळ स्वरूपाचे काम करीत होते, कारण त्यांचा जन्म एका गरीब परिवारात झाला होता, पण त्यांनी गरीबीशी संघर्ष करून ते देशातील अतिश्रीमंत व्यक्तीपैकी एक बनले.
माणसाचे नशीब एक टक्का काम करते आणि नव्यानव टक्के आपली कर्तबगारी काम करते. मी गरीब आहे म्हणून घरातचं बसलो किंवा रोजंदारीचं करीत बसलो तर गरीबीतून बाहेर पडताचं येणार नाही. याचा अर्थ रोजंदारी करणा-यांनी रोजंदारीचं करू नये असा नसून आपल्या दैनंदिन कामातूनचं गरीबीच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा.
बेडूक एखाद्या डबक्यात रहात असतो, त्याला वाटते की आपण समुद्रातच रहात आहोत आणि हेच आपले विश्व आहे. दीर्घकाळ तो त्या डबक्याच्या दलदलीत वास्तव्य करत असतो, पण कर्मधर्म संयोगाने तो त्या घाणीतून बाहेर पडतो तेंव्हा त्याला कळते की, आपले विश्व खूप मोठे आहे. पण आपण या मोठया विश्वात येण्याचा, गरीबीच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नच करीत नाही; आम्ही आमची गरिबी उराशी कवटाळून नशिबाला दोष देत अश्रू ढाळत राहतो, आमच्या डोळ्यातील अश्रुमुळे आम्हांला सारे काही अंधुक दिसते, परिणामतः आम्हांला गरीबीच्या दलदलीतून बाहेर येण्याचा मार्ग दिसत नाही. म्हणून गरिबीला न कवटाळता, डोळ्यातील अश्रू पुसून आम्ही नवा मार्ग शोधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवा.
मला अजून एक उदाहरण सांगावस वाटत. मी एका नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीत काम करीत असतांना एकदा एका व्यक्तीची भेट झाली, ती व्यक्ती काही वर्षापूर्वी एका हॉटेल मध्ये वेटर म्हणून महिना सात हजार रुपये पगारावर काम करत होती. ती व्यक्ती रोज हॉटेलमध्ये कामाला आल्यावर विचार करत असे की, एक ना एक दिवस मी महिन्याला पन्नास हजार रुपये पगार मिळवणारचं आणि एक दिवस तो एका नेटवर्क कंपनीत अर्धवेळ कामाला लागला, काही दिवसात त्याची चांगली टीम तयार झाली. आणि तो आठवडयाला पन्नास हजार रुपये कमवू लागला. म्हणजेच सदर इसमाचे उदाहरणावरून आम्ही आमच्या दैनंदिन कामकाजाबरोबरचं आमच्या गरीबीतून बाहेर पडण्याचा विचार करायला हवा, आणि केवळ आम्ही विचार करून चालणार नाही तर त्याला सकारात्मक कृतीची जोड द्यायला हवी.
लेखक - राज धुदाट यांचे “मी गरीब का आहे?” हे पुस्तक वाचकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे एक क्रांतिकारी पुस्तक आहे यात तिळमात्र शंका नाही. हे पुस्तक वाचून वाचकांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकते, मी असेही म्हणेन या पुस्तकाच्या वाचनाने जर काही वाचकांची गरीबी दूर झाली आणि त्यांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडले तर लेखक - राज धुदाट यांचा हा पुस्तक लेखनाचा प्रपंच सार्थकी लागला असे होईल. केवळ काही वाचक नव्हे तर शेकडो आणि हजारो वाचकांच्या जीवनात या पुस्तकाच्या माध्यमातून क्रांती घडेल याची मला पूर्ण खात्री आहे.
लेखक - राज धुदाट यांनी वाचकांसाठी अनेक नवीन नवीन विषयावर अगणित पुस्तकांची निर्मिती करावी, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी आणि त्यांच्या या वेगळ्या प्रयत्नासाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!
- कवी रमेश शिवाजी इंगवले
09637370129
पुस्तकाचे नाव - मी गरीब का आहे? लेखक - राज धुदाट
प्रकाशक - डॉ. सुनील पाटील प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
ISBN - 978 - 81 - 927074 - 3 - 3 आकार - 1/8
पृष्ठे - 156 (कव्हर सह) मुल्य - 140/-
विषय - प्रबोधनपर संपर्क - 02322 225500, 9975873569 kavitasagarpublication@rediffmail.com