Wednesday, December 19, 2012

शिवरात्र - नरहर कुरुंदकर

सध्या शिवरात्र हे नरहर कुरुंदकरांचे पुस्तक वाचतो आहे. खरे तर मी सहसा पुस्तक पूर्ण न वाचता समीक्षण म्हणा वा परिचय म्हणा कधीही लिहित नाही. पण केवळ सुरुवातीच्या ५० पानांतच कुरुंदकरांनी वैचारिक क्षमतेवर जे धक्क्यांमागून धक्के दिले आहेत. त्यामुळे शिवरात्रचा परिचय लिहिणे क्रमप्राप्त आहे.

पुस्तक एकूण तीन भागांत आहे. सुरुवातीच्या भागात कुरुंदकरांनी मुख्य भर दिला आहे तो हिंदुत्वाचे प्रवर्तक व मार्गदर्शक गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधीजी यांच्यातील वैचारिक फरक यावर. कुरुंदकरांच्या तर्कशुद्ध विचार मांडण्याच्या पद्धतीमुळे स्तिमित व्हायला होते.वादग्रस्त मुद्दे आहेत. पण तरी लिहितोच.
गांधींवर जो मुस्लिमधार्जिणा संघाकडून आरोप केला जातो तोच मुळात चुकीचा कसा आहे हे कुरुंदकर या पुस्तकात सिद्ध करुन दाखवत आहेत.
प्रत्यक्षात गोखले व टिळक हे जेव्हा काँग्रेसमधे होते तेव्हाच त्यांनी मुस्लिमांशी विभक्त मतदारसंघाचा करार केला होता - ज्यामुळे देशाची फाळणी गांधीजी टाळू शकले नाहीत.  प्रत्यक्षात त्यानंतर गांधीजींनी मुस्लिमांशी असा एकही करार केलेला नाही. त्यामुळे फाळणी टाळण्याच्या वेळी गांधीजींना आलेल्या अपयशाची मीमांसाही कुरुंदकरांनी परखडपणे केली आहे. गोखले - टिळकांच्या धोरणांमुळे झालेल्या नुकसानाचीही चिकित्सा केली आहे.
तसेच गांधीजी हे नेहमीच हिंदूंचे नेते होते व मुसलमानांचे नव्हते असेही ठाम प्रतिपादन मुद्द्यांच्या आधारे त्यांनी केले आहे. मुसलमानांनी कायमच गांधींना विरोध केला होता. त्यांच्याशी गांधीजी नेहमीच गोड बोलत होते पण प्रत्यक्षात करार त्यांनी एकही केलेला नव्हता. यामागची गांधीजींची भूमिकाही कुरुंदकरांनी स्पष्ट केली आहे.

तसेच हिंदुत्त्ववाद्यांचा दम फक्त बोलण्यात होता व कृतीत त्यामानाने नगण्य होता. अशीही चिकित्सा कुरुंदकरांनी केली आहे.
उदाहरणार्थ - स्वातंत्र्यलढ्याच्या संग्रामात हिंदुत्ववाद्यांनी मुळात असे कोणते लढे लढले? तर याचे उत्तर एकही नाही हे कुरुंदकर 'शिवरात्र' मधे सिद्ध करतात. अगदी हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात गांधीजींच्या शब्दाने ज्या गोष्टी झाल्या त्यावेळी हिंदुत्त्ववाद्यांनी कोणतीही कृती केली नाही. त्यामुळे केवळ हिंदुत्त्ववादाचे विचार लोकांना पाजून व कृती न करणार्‍यांना गांधीजींच्या निर्णयांचे मूल्यमापन करण्याचा अधिकार नाही...इ..इ... अशा अनेक स्पष्ट व सिद्ध करणार्‍या दाखल्यांनी मन सुन्न होऊन गेले आहे.
फक्त ५० पानेच वाचून झाली आहे. पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर कदाचित त्यावर सविस्तर लिहिन. तूर्तास छोटेसे पुस्तक पण आवाका अगदी प्रचंड आहे अशी सध्याची परिस्थिती आहे.


सत्य हे कठोर असते हेच खरे. मला त्यांचे बरेचसे मुद्दे पटले. सुदैवाने मी गोविंद तळवलकरांची 'सत्तांतर' सिरिज, फ्रीडम ऑफ मिडनाईट, तत्कालीन राजकारण्यांच्या भूमिकांचे व निर्णयांची मीमांसा करणारी पुस्तके, फाळणीपूर्व भारतातील घटनाक्रम व राजकारण यांच्यावर वा तत्सम अनेक पुस्तके वाचली असल्याने कुरुंदकरांच्या मांडणीतली खोली लगेच जाणवली.
गांधीजींनी १९३४ सालीच काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा त्याग केला होता. असे असूनही भारतीय जनमानसावर गांधीजींची असलेली पकड, प्रभाव व ते राष्ट्रपिता का ठरले यावर नरहर कुरुंदकर यांची चिकित्सा जबरदस्त आहे.गांधीजींना आपण राष्ट्रपिता का मानतो? याची सर्व बाजूंनी जी मांडणी त्यांनी केली आहे ते पाहून खरोखर अचंबा वाटतो.

खरे तर शिवरात्र मधील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व्हायला हवी. कुरुंदकरांच्या या तर्कशुद्ध पद्धतीने मांडलेल्या मुद्द्यांच्या वाचनानंतर गांधीजी हे हिंदूंचेच नेते होते यात शंका उरत नाही. इतिहासाचा हा वेगळा पैलू वाचकांना नक्कीच चिंतन करण्यास भाग पडेल. भाग २ व ३ मध्ये काय आहे ते सविस्तर नंतर पाहूयात.

 कुरुंदकरांची 'जागर' व 'धार आणि काठ' ही देखील याच पठडीतील पुस्तके आहेत. अर्थात विषय थोडे वेगळे आहेत. कुरुंदकरांच्या तर्कशुद्ध चिकित्सा पद्धतीचे तुम्ही एकदा फॅन झालात की त्यांचे प्रत्येक पुस्तक ही एक पर्वणी ठरते. 'मनुस्मृती' हाही त्यांचा असाच अप्रतिम ग्रंथ आहे. पण बाजारातून तो अदॄश्य होऊन बहुतेक दशक होत आले आहे.


धन्यवाद,
सागर


पुस्तकाचे नाव : शिवरात्र
लेखक : नरहर कुरुंदकर
प्रकाशक : देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.
पृष्ठसंख्या : १८६
किंमत : रु.२००/-