Sunday, March 18, 2012

स्टुपिड - सुहास शिरवळकर

आजच सुहास शिरवळकरांचे 'स्टुपिड' हे पुस्तक वाचून पूर्ण केले. या लेखकाचं कोणतंही पुस्तक उचलावं आणि निखळ वाचनानंदात रमावं असा सिद्धहस्त लेखणीची कृपा असलेल्या मोजक्याच लेखकांपैकी सुहास शिरवळकर होते. 'सुशि' याच नावाने ते वाचकांना परिचित आहेत.
'स्टुपिड' मध्ये दोन कथा आहेत. पहिली अर्थातच 'स्टुपिड' आणि दुसरी 'दि गेसिंग मॅन'

पैकी पहिल्यांदा स्टुपिड मधे काय आहे ते पाहू -
'स्टुपिड':
चार वर्षे ऑफिसात एकही लेट मार्क नसलेल्या क्लार्कपासून 'स्टुपिड'च्या कथानकाची सुरुवात होते. तुषार कर्णिक, ऑफिसातल्या सहकार्‍यांपासून एकदम अलिप्त पण कामात अगदी चोख अशा पात्रापासून सुरु झालेल्या कथानकाचा नक्की अंदाज सुरुवातीला येत नाही. पण वाचकाला उत्सुकतेबरोबरच गोंधळात टाकायची कला सुशिंनाच जमावी. :)
त्याच्या ऑफिसच्या २१व्या माळ्या समोरच्या बिल्डींगच्या समोरच्याच २१व्या माळ्यावर तो एकटक पाहताना दरवाजातून ती बाहेर येताना त्याला दिसते. इथे वाचकाला वाटते की हा तुषार कर्णिक कोणा पोरीच्या प्रेमात आहे की काय? ;)
हे काही प्रमाणात खरे असते पण पूर्ण नाही. तो तिला चुकून झाली असे भासवून धडक मारतो त्यात तिचा चष्मा फुटतो. ही या कथेची नायिका. तिची आणि तुषारची अशी ओळख झाल्यापासून ती त्याला स्टुपिड स्टुपिड असेच म्हणत असते. तिची ही सवय सुशिंनी खास सुशि टच् ने रंगवली आहे. तर ही नायिका मनालिनी. चष्म्याशिवाय तिला काहीच दिसत नसते, पण असते थोडीशी तिरसट स्वभावाची. मनालिनी युवर्स चिट फन्ड कंपनीत हेड कॅशिअर म्हणून काम करत असते. हे वाचल्यावर तुषारच्या मनात काय बेत घोळत आहे त्याची थोडी कल्पना येऊ लागते. मनालिनीचा खास चष्मा असतो त्यामुळे ती कायम दोन चष्मे ठेवत असते. हा दुसरा चष्मा घरी असल्याने मनालिनी तुषारला तिच्या फ्लॅटवर घेऊन जाते. अर्थात त्यांच्यात दोस्ती झाल्यावर मगच. चष्म्याशिवायचे मनालिनीचे सौंदर्य पाहून तुषार तिच्यावर लट्टू होतो. त्याहीपेक्षा तिच्या बोल्ड स्वभावाने तो जास्त आश्चर्यचकित होतो. पुढे अर्थातच युवर्स चिट फन्ड चे अठ्ठेचाळीस लाख रुपये पळवले जातात. आणि सगळे पोलिस तपासाचे चक्र अर्थातच फिरते तुषार व मनालिनी या प्रमुख पात्रांभोवती. कथानकाच्या ओघात अनेक किरकोळ पात्रे येतात जसे तुषारचा बॉस, मनालिनीचा बॉस, सिक्युरिटी गार्ड इ..इ... , पण शेवटपर्यंत कथानकाचा शेवट काय आहे हे वाचकाच्या लक्षात येत नाही. मी तरी ते सर्व सांगून तुमचा रसभंग का करु? वेगवेगळे प्लॅन्स करुन शेवटी कॅश लंपास करायचा प्लॅन तयार होतो व अंमलात पण आणला जातो. त्यामागील प्रमुख सूत्रधार त्यात यशस्वी होतो का? तुषार आणि मनालिनीचे पुढे काय होते? त्यांच्यात प्रेम होते का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला वाचावी लागेल 'स्टुपिड' , काय वाचणार ना मग स्टुपिड? :)


'दि गेसिंग मॅन' :
ही 'स्टुपिड' मधील दुसरी कथा. पण तितकीच दर्जेदार. 'दि गेसिंग मॅन' मधे काय आहे ते आता पाहू.
बाँबे कॉलेजचे विद्यार्थी लेक्चर पाडण्यासाठी असतात असे सिद्ध करत असतात. पण त्याला अपवाद असतात प्रा. भाटियांचा सायकॉलॉजीचा पीरियड. आठ वर्षे भाटिया ही करामत करत असतात. इन्डो -फॉरिन कोलॅबरेशन मधे पीआरओ म्हणून काम करत असलेले भाटिया कंटाळा आला म्हणून ती नोकरी सोडतात व बॉंबे कॉलेजची वॉन्टेडची जाहीरात वाचून इंटरव्ह्यूला येतात. या इंटरव्ह्यू पासून भाटियांचा एक अत्भुत प्रवास सुरु होतो. कमिटी मेंबर्स भाटीयांचा अतिशय गांगरवून टाकणारा इंतरव्ह्यू घेतात. वशील्याचे तट्टू निवडायचे हे ठरलेले असूनही कमिटी शेवटी त्यांनाच अपॉईंट करते. पण भाटीया सर्वांना पुरुन उरतात.मुळातूनच तो वाचावा इतका हा इंटरव्ह्यू अगदी मजेशीर आहे. सायकोलॉजी शिकवण्याबरोबरच नाट्यस्पर्धांची ढाल, अ‍ॅथलेटीक्सचे अजिंक्यपद, क्रिकेटची ट्रॉफी, कॉलेजचे गॅदरिंग, इत्यादी कितीतरी जबाबदार्‍या भाटियांनी एकहाती पेलून दाखवल्या होत्या. अशा या जबरदस्त कारकीर्दीत भाटियांच्या आयुष्यात अचानक एक जोरदार वळण येतं.
प्रिन्सिपॉल एकदा भाटियांना बोलावून दिल्लीच्या एका महत्वाच्या कॉन्फरन्स मधे बाँबे कॉलेजला रिप्रेझेन्ट करायला सांगतात. त्या कॉन्फरन्सची तयारी करत असताना शीण आल्यामुळे भाटिया त्यांच्या सहाव्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या बाल्कनीत टाईमपास करायला आलेले असतात. निमा - भाटियांची बायको - त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येणार असते. भाटिया रस्त्यावरची रहदारी पहात असतात. त्यावेळी अचानकच ते घडते. दोन कार टक्कर चुकवण्यात यशस्वी होतात पण एक कार भाटियांच्या बिल्डिंगला येऊन धडकते व आगीचे लोळ उठतात. कारबरोबर बघत भाटिया बाल्कनीतून खाली वाकून पहात असतात. त्याचवेळी अचानक त्यांचा तोल जातो.
पुढे मग त्यांची पत्नी निमा आक्रोशित होते त्यानंतर डॉ. संजय लाहोटी या डॉक्टरची एन्ट्री होते. त्यानंतर जे घडते ते केवळ अत्भुत या सदरात मोडते. त्याबद्दल अधिक सांगत नाही. पण पुढे काय होते? डॉ. लाहोटी काय करतात? भाटिया वाचतात की नाही? निमाचे काय होते? 'दि गेसिंग मॅन' कसा अवतरतो? घटनाक्रम कसा फिरत रहातो? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी वाचा खास सुशि टच् असलेली दुसरी कथा 'दि गेसिंग मॅन'

सुशिप्रेमी मित्रांनो आणि मैत्रिणींनो मग वाचणार ना आपल्या आवडत्या सुशिंची 'स्टुपिड' ही कादंबरी? :)

पुस्तकाचे नाव : स्टुपिड
लेखक : सुहास शिरवळकर (सुशि)
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
मूल्य : १२०/- रुपये

No comments:

Post a Comment