Friday, June 22, 2012

श्रद्धांजली : प्रसिद्ध लेखक भा.द.खेर यांना श्रद्धांजली

भा. द. खेर हे नाव वाचकांना अत्यंत चतुरस्त्र लेखन करणारे म्हणून परिचित आहे. मित्रांनो भा. द. खेर आज आपल्यांत नाहीत. गेल्या चार वर्षापासून ते अंथरूणाला खिळून होते. प्रकृती अस्वास्थ आणि वयोमानामुळे त्यांना द्रवरुप आहार दिला जात होता. अखेर गुरूवारी सकाळी दहा वाजता राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.भा. द. खेर यांची पुढील प्रमुख पुस्तके प्रसिद्ध आहेत

१. चाणक्य
२. हिरोशिमा
३. प्रबुद्ध (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर)
४. हसरे दु:ख (चार्ली चॅप्लीनचा डोळ्यांत पाणी आणणारा जीवनपट)
५. क्रांतीफुले
६. यज्ञ
७. 'दि प्रिन्सेस' या कर्नल मनोहर माळगावकर यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीचा मराठी अनुवाद

व इत्यादी अनेक ....

भा. द. खेर या थोर लेखकाला ही भावपूर्ण व विनम्र श्रद्धांजली

माहिती सौजन्य : ईसकाळ.कॉम

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेहता पब्लिशिंग हाऊस च्या संकेतस्थळावर भा. द. खेर यांचा जीवनपटच दिलेला आहे. तोच खाली देतो आहे

माहितीचा थेट दुवा : http://www.mehtapublishinghouse.com/AuthorDetails.aspx?AuthorCode=115

जन्म : 12 जून 1917

ठिकाण : कर्जत जि. अहमदनगर

शिक्षण : बी. ए. नंतर दोन वर्षे एल.एल.बी. चा अभ्यास

व्यवसाय : सुप्रसिद्ध कादंबरीकार, लेखक आणि पत्रकार लेखन आणि पत्रकारिता यातील कामगिरी

पत्रकारिता : दै. केसरी चे वीस वर्ष सहसंपादक, सह्याद्रीचे दहा वर्षे संपादक, समग्र टिळक 7000 पृष्ठे - संपादक, सावरकर साहित्य नवनीत चे एक संपादक या शिवाय जवळपास आठशेच्यावर पृष्ठांचे स्फुट लेखन.

लेखन : पहिले पुस्तक `नादलही' कथासंग्रह प्रकाशित - 3 सप्टेंबर 1939 आजवर जवळपास 100 लहान-मोठी पुस्तके प्रकाशित. `चरित्रात्मक कादंबरी' हा वाङमयप्रकार मराठीत प्रथम आणण्याचा मान. त्यापौकी सावरकरांच्या जीवनावरील `यज्ञ', लालबहाद्दूर शास्त्रींच्या जीवनावरील `अमृतपत्र', नेहरु कुटुंबावरील `आनंद भवन', डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील `प्रबुद्ध', चार्ली चॅप्लिनच्या जीवनावरील `हसरे दु:ख', चाफेकर बंधूंच्या जीवनावरील `क्रांतिफुले', `चाणक्य', महाभारतावरील `कल्पवृक्ष', झाशीच्या राणीच्या जीवनावरील `समर सौदामिनी', श्रीकृष्णावरील `सारथी सवा|चा', श्रीरामावरील `सेतूबंधन', स्वा. सावरकरांच्या तत्वज्ञानावरील `पूर्णाहूती', नेपोलियनच्या जीवनावरील `दिग्विजय' या कादंबर्या विशेष गाजल्या. तसेच जपानमधील अणुसंहारावरील `हिरोशिमा' ही कादंबरी गाजली. त्याचबरोबर आत्मचरित्रात्मक आठवणींची `स्मृतीयात्रा', `सूर भरला अंतरी', स्मृतीगंगा' ही पुस्तकेही गाजली. याशिवाय `दि प्रिन्सेस', `वादळ वारा', `आधांतरी' ही भाषांतरीत पुस्तकेही लोकप्रिय ठरली. पन्नास वर्षे अव्याहत लेखन. आत्तापय|त 25000 पृष्ठांच्यावर छापील पाने प्रकाशित. चरित्रात्मक कादंबरी हा प्रकार रूढ केला. तो प्रकार विशेष आवडतो.

पुरस्कार : `आनंदभवन' कादंबरीला 1974 चे सोविएत लॅण्ड नेहरूअॅवॉर्ड `हिरोशिमा'ला 1984 चे सोविएत लॅण्ड नेहरूअॅवॉर्ड `हिरोशिमा'ला 1984 चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार `हसरे दु:ख'ला 1993 चा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार

इतर मानसन्मान आणि जाहीर सत्कार : 1) स्वा. सावरकरांचे `1857 चे स्वातंत्र्यसमर' या जगद्विख्यात ग्रंथाची सहावी आवृत्ती प्रकाशित करण्याचा मान. 2) 14 जानेवारी 1947 रोजी स्वा. सावरकरांच्या `1857 चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात टिळक स्मारक मंदिरात डॉ. ना.भा. खरे यांच्या हस्ते सत्कार 3) 10 मे 1952 रोजी `अभिनव भारता'च्या सांगता समारंभाच्या वेळी क्रांतिकारक वाङ्मय लिहिल्याबद्दल स्वा. सावरकरांच्या हस्ते सत्कार. 4) 1976 मध्ये सात खंडातील सात हजार पृष्ठांचे समग्र टिळक वाङ्मयाचे संपादन केल्याबद्दल दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्याहस्ते टिळक स्मारक मंदिरामध्ये सत्कार. 5) 14 जानेवारी 1981 रोजी `केसरी' या दीड हजार पृष्ठांच्या ग्रंथाचे संपादन केल्याबद्दल दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या हस्ते टिळक स्मारक विद्यापिठात दुसर्यांदा सत्कार. 6) 1967 मध्ये `दि प्रिन्सेस' या कर्नल मनोहर माळगावकर यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीच्या भाषांतराच्या प्रकाशन समारंभात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात सत्कार. 7) 6 आॅगस्ट 1984 रोजी `हिरोशिमा' या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्यावेळी टिळक स्मारक मंदिरात स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार. 1993 मध्ये आद्य श्री शंकराचार्य पीठातर्फे प्रमुख साहित्यिक या नात्याने पुण्याच्या श्री. शंकराचार्य मंदिरात सत्कार आणि मानचिन्ह. 9) 1994 मध्ये `क्रांतिफुले' या क्रांतिवीर चाफेकर बंधूंवरील कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी माननीय श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते सत्कार. 10) 1991 मध्ये अमृतमहोत्सवानिमित्त `रामायण' कर्ते श्री. रामानंद सागर यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात जाहीर सत्कार. 11) 1995 मध्ये मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शंभरावे पुस्तक `पुर्णाहुती' प्रकाशित.

लेखनानिमित्त परदेशप्रवास 1) भारत सरकारतर्फे 1969 मध्ये `अमृतपुत्र' ही शास्त्रीजींच्या जीवनावर कादंबरी लिहिण्यासाठी स्टेट गेस्ट म्हणून रशिया दौरा. 2) जर्मन सरकारच्या निमंत्रणावरुन सुभाषबाबूंच्या जीवनावर कादंबरी लिहिण्यासाठी पूर्व आणि पश्चिम जर्मनीचा प्रवास. 3) चर्चिल, चार्ली चॅप्लिन, सावरकर यांची माहिती घेण्यासाठी 1969 मध्ये लंडनभेट. 4) स्टेट गेस्ट म्हणून 1976 मध्ये जपान सरकारच्या निमंत्रणावरुन हिरोशिमावर लिहिण्यासाठी जपान दौरा.

परदेशी प्रसारमाध्यमावरुन भाषण-मुलाखत 1) मॉस्को रेडिओ वरुन भाषण 2) एन.एच.के. जपानवरुन मुलाखत प्रसारित 3) हिरोशिमावर लिहिण्यासाठी भारतीय लेखकाचे जपानमध्ये आगमन, अशा आशयाची बातमी फोटोसह जपानी वृत्तपत्रांतून प्रकाशित.

भा. द. खेर या थोर लेखकाला ही भावपूर्ण व विनम्र श्रद्धांजली

Monday, June 18, 2012

पुण्याच्या "अक्षरधारा"त मान्सून सेलची बरसात

पुण्याच्या धावत्या भेटीत मित्रांबरोबर 'अक्षरधारा' ला भेट द्यायला गेलो. तर चक्क लॉटरीच लागली अशी परिस्थिती झाली त्या दिवशी.

"अक्षरधारा" नित्यनव्याने चांगल्या चांगल्या योजना ग्राहकांना देत असते. ती चांगली योजना योगायोगाने त्या दिवशी आमच्यासारख्या पुस्तकवेड्यांच्या झोळीत पडली म्हणजे लॉटरीच लागल्यासारखे झाले होते.
अक्षरधाराचा सध्या मान्सून सेल चालू आहे. ५५%, ३०% व २०% अशा सवलतीने खूप चांगली चांगली व नवीन पुस्तके मिळत आहेत. "अक्षरधारा"ची ही योजना पुढील दोन ते अडीच महिने सुरु राहणार आहे. तेव्हा रसिक वाचकांनी या भरघोस सवलतीचा लाभ जरुर घ्यावा.
अक्षरधाराचा पत्ता : बाजीराव रस्ता, आचार्य अत्रे सभागृहासमोर, पुणे
संपर्क ०२०-२४४४१००१ / ९८२२४७१००१
ई-मेलः info@akshardhara.com
संकेतस्थळ : www.akshardhara.com

३-४ दिवसांपूर्वीच मी एका नामवंत दुकानामध्ये गेलो होतो, त्यावेळी (मी बंगलोरवरुन नेहमी पुस्तके घेतो हे सांगूनही) १०% च्या वर सवलत देणार नाही (मेहता प्रकाशनाची पुस्तके असूनही) असे स्पष्ट सांगण्यात आले. या अनुभवाने हादरुन मी ती पुस्तके तशीच ठेवून निघून आलो होतो. तीच पुस्तके अक्षरधारात मला ५५% सवलतीने मिळाली Smile

ही मी अक्षरधारात घेतलेली पुस्तके:

१. प्रे - मूळ लेखक - मायकल क्रायटन - अनुवाद : प्रमोद जोगळेकर - (५५% सवलत)
२. लूपहोल - सुहास शिरवळकर (५५% सवलत)
३. आवारा - सुहास शिरवळकर (५५% सवलत)
४. अंमल - सुहास शिरवळकर (५५% सवलत)
५. स्पेलबाऊंड - सुहास शिरवळकर (५५% सवलत)
६. कथा साहसवीरांच्या - विजय देवधर ( ३०% सवलत)
७. शिवरात्र - नरहर कुरुंदकर (५% सवलत) -
८. जागर - नरहर कुरुंदकर (५% सवलत)
९. सूर्य - श्री. दा. पानवलकर (५% सवलत) (हिंदीतील गाजलेला
"अर्धसत्य" चित्रपट या कादंबरीवर आधारित होता)

Saturday, June 2, 2012

"नर्मदेऽऽ हर हर"
लेखकः जगन्नाथ कुंटे
प्रकाशकः प्राजक्त प्रकाशन
किंमत : रुपये २२०/-

अलिकडेच माझ्या एका मैत्रिणीने पुस्तकविश्व.कॉम या संकेतस्थळावर "नर्मदेऽऽ हर हर" या पुस्तकावर हा पुस्तक परिचय लिहिला होता. त्या अनुषंगाने मला या पुस्तकावर काही लिहावेसे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.

या पुस्तकातून नेमके घ्यायचे काय? हा एक खूप मोठा प्रश्न दोन्ही प्रकारच्या (आस्तिक आणि नास्तिक) वाचकांपुढे असतो. एकूणच या पुस्तकातून सर्व प्रकारच्या वाचकाला जे हवे ते मिळेल. कोणाला टीका करण्याची सामग्री दिसू शकेन तर कोणाला जीवनाचे सत्य. पण टीका व्हावी कारण टीकेमुळे नेमक्या गोष्टी स्पष्ट होतात. जालावर अनेकदा मी वाचलेलेही आहे की कुंटेंनी सिगारेट ओढली, चहा पिला. यंव केलं त्यंव केलं. अशाच गोष्टी भरलेल्या आहेत. अशा टीकाकारांबद्दल आदरही आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की कुंटेंनी जे लिहिले आहे ते स्वतः अनुभवले आहे. आपण आपल्या स्वतःच्या (विशेषतः नर्मदा परिक्रमेचा अनुभव नसताना मर्यादित) अनुभवांच्या चष्म्यातून त्यांच्या अनुभवांचं मूल्यमापन करणे कितपत योग्य आहे? त्यापेक्षा जीवनाचं सत्य त्यातून उलगडतं की नाही? त्याविषयक काही चिंतन आपल्या विचारांना मिळतं की नाही? या दिशेने "नर्मदेऽऽ हर हर" चे वाचन केले तर कदाचित काहितरी गवसू शकेल. शेवटी देव म्हणजे तरी काय? मानला तर देव नाहीतर दगड.

"शहरी सवयींना सोकावलेल्या आपल्या शरीरांना सोसणारे आहे का?" हा प्रश्न शेवटी वाचकाला नक्की अंतर्मुख करुन जाईन.

"नर्मदेऽऽ हर हर" कडे मुख्यतः वाचकांचे दुर्लक्ष होते ते मुख्यतः याच प्रमुख कारणामुळे. एकदा टीका करण्याची सामग्री दिसली की पूर्वग्रह निर्माण होतो. पूर्वग्रह निर्माण झाला आणि पुस्तकाचे वाचन झाले तरीसुद्धा आपले चाणाक्ष मन टीका करण्याची सामग्रीच त्यात शोधत असते. त्यातून काही मोती आपल्या नकळत कधीच गळून गेल्याचेही लक्षात येत नाही. सोन्याच्या खाणीत मणभर मातीचा ढीगारा उपसल्यावर सोन्याचा कण सापडतो त्याचप्रमाणे पुस्तकाच्या वाचनाचे असते. नेमके सोन्याचे कण कोणते? हे शेवटी ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. तरीपण तरल मनाने कोणत्याही पुस्तकाचे वाचन केले की हे सोन्याचे कण आपोआप आपल्या झोळीत स्वतःहून पडतात.

जगन्नाथ कुंटेंची "नर्मदेऽऽ हर हर" व्यतिरिक्त नित्य निरंजन आणि साधनामस्त ही २ पुस्तके मी स्वतः वाचली आहेत. त्यामुळे या लेखकाचे अनुभव पूर्णपणे ओघवते आहेत एवढे नक्की सांगू शकतो. किमान मला तरी कुंटेबुवांच्या या अनुभवांत लबाडीचा लवलेशही कुठे दिसला नाही. "नर्मदेऽऽ हर हर" मधील आपल्याला पटत नसलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले की आपोआप या पुस्तकातील प्रत्यक्ष अनुभवांचे सौंदर्य जाणवेल. साधनामस्त मधे साधनेच्या अनुभवांबद्दल जास्त लिहिले आहे. पण "नर्मदेऽऽ हर हर" हे मुख्य करुन प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेतील अनुभवांवर आधारित आहे. तेव्हा एका प्रवाश्याचे अनुभव म्हणून जरी याकडे पाहिले तरी ही नर्मदा परिक्रमा वाचकांना आवडेल असे मला वाटते. जिज्ञासूंनी जगन्नाथ कुंटे यांची ही नर्मदा परिक्रमेची अनुभवयात्रा अवश्य वाचावी. Smile