Saturday, December 24, 2011

या आठवड्यात आठवलेली काही सुंदर पुस्तके :

सोमवार, १९ डिसेंबर २०११

(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "ययाति" *, लेखकः विष्णु सखाराम उर्फ वि.स.खांडेकर , प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस (ययाति, देवयानी आणि शर्मिष्ठा यांची महाभारतातील ही कथा प्रत्यक्षात अनुभवतो आहोत असे ही साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी वाचताना जाणवते. भान हरपवणारी कादंबरी )मंगळवार, २० डिसेंबर २०११

(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "मृत्युंजय" *, लेखकः शिवाजी सावंत , प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन ( महाभारतातील कर्णाची ही कादंबरी वाचताना ही कथा नसून एक व्यथाच आपण अनुभवतो आहोत असे वाटते. भारतीय ज्ञानपीठच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित ही कादंबरी कित्येक भाषांतून अनुवादीत झाली आहे. महारथी कर्णाची बाजू मांडणारी, एक नितांतसुंदर साहित्य कलाकृती.)


From


बुधवार, २१ डिसेंबर २०११

(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "ययातिकन्या माधवी" *, लेखिका : विजया जहागीरदार , प्रकाशक : ऋचा प्रकाशन ( महाभारतातील ययातिने दक्षिणा देण्यास असमर्थ असल्यामुळे स्वतःची कन्या हेतुपूर्तिसाठी म्हणून एका ऋषिला दिली, व ती दक्षिणा वसूल होईपर्यंत ही ययातिकन्या माधवी त्यात भरडत राहिली. एका राजाकडून दुसर्‍या राजाकडे. एका मुलाला जन्म देऊन पुन्हा पुन्हा ही माधवी तयार होत होती. नक्की का? व कशासाठी? हे सर्व जाणून घेण्यासाठी ही हादरवून सोडणारी कादंबरी अवश्य वाचा.)

From


गुरुवार, २२ डिसेंबर २०११

(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "नीलांगिनी" *, लेखिका : स्मिता पोतनीस, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस (द्रौपदीच्या नजरेतून महाभारताकडे पाहून महाभारताला एक वेगळा दृष्टीकोन देणारी कादंबरी)

From


शुक्रवार, २३ डिसेंबर २०११

(‎(महाभारत विशेष) आजच्या दिवसाचे सुंदर पुस्तक: * "युगंधर" *, लेखक: शिवाजी सावंत, प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन (श्रीकॄष्णाचे युगंधर हे नामाभिमान कसे सार्थ होते हे सांगणारी ही सुंदर कादंबरी. )


Saturday, November 12, 2011

ज्वाला आणि फुले : एक जळजळीत काव्यसंग्रह

मित्रांनो,
४-५ दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. अर्धवटरावांना मी बंगळूरात एका संध्याकाळी भेटलो होतो. अर्ध्याचे ऑफिस काही केल्या सापडत नव्हते. दोन वेळा एकाच सिग्नलवरुन यू टर्न उपलब्ध नसताना पोलिसाच्या समोर गाडी दोन वेळा वळवून नेली होती. नशीब माझे पोलिसाची माझ्याकडे वक्रदॄष्टी नाही गेली. नंतर लक्षात आले की आपण चुकीचा यू टर्न घेत होतो. एक सिग्नल क्रॉस करायचे विसरलोच होतो . शेवटी आमची ती ऐतिहासिक भेट एकदाची झाली. अर्धवटरावांनी आमचे दर्शन होताच झुकून मुजराच केला. आधी कळालेच नाही की अर्ध्याने भर रस्त्यात मला मुजरा का केला. नंतर त्याने किस्सा सांगितला. बाबासाहेब पुरंदरे पहिल्यांदा ज्यांना भेटतात त्यांना असाच मुजरा करतात. शेवटी ती ऐतिहासिक भेट थोडक्यात आटोपून आम्ही पोटाच्या गरजेवर आलो. आम्ही दोघे शुद्ध शाकाहारी भोजनवेडे, तेव्हा पोटावर ताव मारण्यासाठी आम्ही कोरमंगलातील बार्बिक्यू नेशन्स मधे गेलो. इकडच्या तिकडच्या अनेक विषयांवरच्या गप्पा आम्ही मारल्या. आम्ही दोघे पुस्तकवेडे तेव्हा आमच्या दोघांच्या चर्चेत पुस्तकांचा विषय नसता तर नवलच होते.

माझा हा मित्र प्रचंड काव्यप्रेमी. उगाच तो स्वतःला अर्धवट म्हणवून घेतो. कित्येक कविता तर मुखोद्गत आहेत त्याला. साला इथे मला मी केलेल्या कविता पण लक्षात रहात नाहीत . अर्ध्यासारखी सरस्वती मला कधी प्रसन्न होणार???... तर बोलता बोलता विषय कवितांकडे वळाला. अनेक गाजलेल्या कवी आणि काव्यसंग्रह यांची चर्चा चालू असताना त्याने अचानकच बॉम्ब फोडला.मला विचारले तू बाबा आमटेंचे ज्वाला आणि फुले वाचले असशीलच. मी म्हणालो - नाही
त्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसलाच (खरे तर मनातून उखडला असावा - नंतर ती प्रतिक्षिप्त क्रिया किती योग्य होती ते मला नंतर कविता त्याच्या तोंडून ऐकल्यावरच पटली) . त्याला कारण माझे पुस्तकप्रेम आणि कविताप्रेम दोन्ही माहिती होते. तेव्हा अर्ध्याने त्या कवितासंग्रहातील एक कविता (जी त्याला मुखोद्गत होती) ती म्हणून दाखवली. त्यातील सोप्या, प्रचंड परिणाम साधणार्‍या आणि हृदयाला स्पर्श करणार्‍या अकृत्रिम शब्दांतून जो भाव प्रकट होत होता ते पाहून मलाच आश्चर्य वाटले. एवढी सुंदर कविता असलेला काव्यसंग्रह किती सुंदर असेल?

अर्ध्या पुढच्या वेळी बंगळूरात येईल तेव्हा हे पुस्तक माझ्यासाठी घेऊन येणार आहे.
आमची चर्चा संपली. तो त्याच्या मार्गाने गेला मी घरी आलो तरीसुद्धा मला राहवले नाही.
गेले २ दिवस मायाजालावर हे पुस्तक वा त्यातील कविता शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून ३ कविता सापडल्या. पण त्यातील एका कवितेने मला एवढे हादरवून सोडले की अशा दर्ज्याच्या कविता असलेला हा अत्भुत कवितासंग्रह प्रत्येक कविताप्रेमीकडे असावा - किमान या अप्रतिम कवितासंग्रहाची माहिती व्हावी - या हेतूने हे लेखन करतो आहे.

तर बाबा आमटे यांची "ज्वाला आणि फुले" संग्रहातील पुढील कविताच बोलकी आहे तेव्हा माझे शब्द इथे आवरते घेतो व कविता देतो.

शब्दसामर्थ्य जरुर पहा या कवितेतले.

======================
कवितेचे नाव : श्रम - सरितेच्या तीरावर
======================
वाल्मिकीच्या करुणेच्या काठाने वाटचाल करीत
निर्वेदाचे टोक गाठले.
कालिदासाने गिरिशिखरांवर वाकलेली शृंगार - मेघांची दाटी पाहिली
भूपालांच्या विजयवाहिनीसह युद्धघोष करीत
वीररसांच्या भाटांचे बेभान तांडेही निघाले
भाबड्या भक्तीचे पानमळेही अमाप फुलले
पण श्रम - सरितेच्या तीरावर आपल्या गीतांचे कलश भरण्यासाठी
कोणीच कसे आले नाही?
सांदीपनीच्या आश्रमात सुगंधाचे अद्भुत फुललेले ज्याने पाहिले
त्याला स्वेद - रसाची पुसट जाण असल्याची नोंद मात्र आहे.

निळ्या नदीच्या किनार्‍यावरील वाळूच्या अफाट सपाटीवर
पाषाणांचे उत्तुंग त्रिकोन उभारता उभारता
लक्षावधी छात्या रक्तबंबाळ झाल्या
मरणासाठी बादशाही बिळे बांधता बांधता
असंख्य जीवनांचा अंत झाला
ज्यांनी चिरे मस्तकावर वाहिले
ते चिर्‍यांच्या फटीफटीतून निःशब्द चिनले गेले
पण मृत्यूच्या वस्तीतही आपल्या वासनांची लक्तरे वाहून नेणारे
त्या बिळात अजून कायम आहेत!

चौदा प्रेमांचा चोथा करणार्‍या समआटाचे तकलूपी अश्रू
ज्यांनी पत्थरांतून चिरंतन केले
त्यांच्या आटलेल्या रक्ताची दखल
दरबारी भाटांनी घेतल्याचे ऐकिवात नाही!
बिगारीत बांधलेले मनोरे छातीवर जे घेऊन कोसळले
त्यांचे मृत्यू लेख अजून इतिहासाने वाचलेले नाहीत!
कलेचे वस्त्र बिनदिक्कत फेडणार्‍या
आणि प्रतिभेच्या हाटात रसांचा घाऊक सौदा करणार्‍या
भूपालांचा आणि सुलतानांचा काळ संपला!
आणि जिची वाट पाहिली जात होती ती पहाट
आज उंबरठ्यावर आहे
श्रमपालांच्या युगांतील स्वेद - रसांच्या साधनेसाठी
प्रज्ञेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे!

संथ नाजुक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे
मस्तकावर पाट्या वाहणार्‍या स्वेदगंधेच्या डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावाणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्‍याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे

भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्^न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत

भूमीच्या गर्भातून काळे सोने वर काढणारे श्रम - पुत्र
त्यांच्या सर्वांगावर काळीच झळाळी उधळलेली
भूगर्भातल्या गर्मीने भाजलेले
आणि ओझे वाहून मोडण्याच्या सीमेपर्यंत वाकलेले
त्यांच्या कण्यांचे मणके
त्यांना ताठ करण्यासाठी प्रतिभेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे
षोडशींच्या शरीरावरील रेशमी वस्त्रांची सळ्सळणारी वळणे पाहून
आता फक्त चांदण्यांचा चावटपणा त्यांना आठवू नये
अथवा उकळत्या पाण्यात शिजणार्‍या
कोषातील किड्यांची प्रेते आठवून
केवळ त्यांची अहिंसा व्याकूळ होऊ नये
तर आसामच्या अरण्यातील ते अर्धनग्न मजूर आठवून
त्यांच्या रक्तात उकळीही उठावी!
आणि मुलास अफू पाजून कोश गोळा करण्यास निघणार्‍या
मजुरणींचे आटलेले डोळे आठवून
त्या ज्वालारंगी वस्त्रांनी त्यांचेही डोळे जळावे
काश्मिरी कलाबतूंचे गालिचे पाहून
काश्मिरी माणसाच्या देहावरील
ठिगळांची कलाकुसरही त्यांना आठवावी
आणि मग त्यांच्यासाठी गालिच्याची ती मखमल कातेरी व्हावी!

खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!

[ज्वाला आणि फुले या काव्यसंग्रहातून]
=========================

Wednesday, August 3, 2011

पुस्तक परिचय : ... आणि पानिपत (कादंबरी) - एक सखोल चिंतन...


पुस्तकाचे नाव :  .... आणि पानिपत (कादंबरी)
लेखक : संजय सोनवणी
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन, पुणे
किंमत: ४०० रुपये
पृष्ठसंख्या : ४७२
लेखकाचा ब्लॉग : http://sanjaysonawani.blogspot.com/पानिपताचे युद्ध आणि त्याची कारण मीमांसा यावर कित्येक कादंबर्‍या आणि संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत.
अलिकडेच मी संजय सोनवणी यांची " ... आणि पानिपत " ही कादंबरी वाचली.  संजय सोनवणी हे संशोधन करुन पुराव्याच्या आधारे  लेखन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
सदाशिवराव भाऊंचा तोतया , जनकोजी शिंदेचा तोतया याकडे ऐतिहासिक ग्रंथांनी जरी काणाडोळा केला तरी त्यांची स्फोटकता या कादंबरीत जाणवते.

सन  १६८० ते १७६१ एका दलित कुटुंबियाच्या चार अख्ख्या पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला हा थरारक इतिहास काल्पनिक वाटतच नाही एवढा जळजळीत वास्तव वाटतो.
भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला', किरण नगरकर यांची 'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या त्या काळात त्यांनी प्रचंड खळबळ उडविली होती. "...आणि पानिपत" ही देखील अशीच खळबळजनक कादंबरी आहे. "...आणि पानिपत " चे लेखक संजय सोनवणी हे वादग्रस्त विधाने करणारे लेखक म्हणून ओळखले जात असले तरी स्वतः संशोधन करुन पुराव्यासकट विचार वाचकांपुढे ठेवतात.    आता कादंबरीकडे वळूयात.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल्या "...आणि पानिपत" या नावापासूनच खरी सुरुवात होते. वाचकाच्या मनात सुरुवातीची तीन टिंबे "..." ( खरं तर अश्रूंचे थेंब) घर करुन बसतात. आणि कादंबरी वाचून खाली ठेवल्यावर तर "...आणि पानिपत" असे आपसूकच वाचकाच्या मनात उमटते. मला वाटते हेच "...आणि पानिपत" या कादंबरीचे यश आहे.

कादंबरी सुरु होते ती सिदनाक महार या पात्रापासून. तत्कालीन महार समाज कसा रहात होता व तत्कालीन बोलीभाषा वापरल्यामुळे थोडी शिवराळ भाषा वाटत असली तरी त्यामुळे कादंबरीला एक जिवंतपणा येतो. सुरुवातीची काही पाने वाचताना वाचकाला वाटते की सिदनाक महार हे मुख्य पात्र असणार. पण जसजसे कथानक पुढे सरकत जाते तसतसे सिदनाकचा पिता आणि भिमनाक महाराचा मुलगा रायनाक हे पात्र कादंबरीचा प्राण व्यापून टाकते. सद्सद्विवेकबुद्धी , सत्य-असत्य, योग्य-अयोग्य, पात्र-अपात्र अशी कित्येक मानसिक आंदोलने लेखकाने या कादंबरीतून समर्थपणे उभी केली आहेत. आजचा समाज प्रगत आहे आणि लायकी हाच निकष लावून समाजात कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला स्वतःचे स्थान निर्माण करता येते. पण  पेशवाईच्या काळात,
महारांना सकाळ आणि संध्याकाळ पुणे शहरात पाऊल टाकायची परवानगी नव्हती. का तर त्यांची सावली अंगावर पडते. आणि त्यामुळे विटाळ होतो. या असल्या खुळचट समजुतीपायी एका महाराने प्राण गमावले (हा सत्य प्रसंग आहे व याचे ऐतिहासिक दाखले देखील आहेत)
तसेच विकत घेऊन बाई ठेवण्याच्याही प्रथा होत्या.
भाऊंचा तोतया नव्हताच असे मानण्यापेक्षा ते खरे भाऊ असू शकतील काय? ही शक्यताही पडताळून तर बघितलीच पाहिजे. कारण पानिपताच्या युद्धात भाऊंचे प्रत्यक्ष प्रेत कोणीही पाहिल्याचा पुरावा नाहीये.
सिदनाक महाराच्या  पात्रापासून कादंबरीची सुरुवात झाल्यावर कादंबरीच्या मध्यानंतर पुन्हा त्याचे आगमन होते, या काळात लेखकाने रायनाक महाराच्या वैचारीक प्रगल्भतेवर प्रकाश टाकला आहे. एक स्त्री केवळ निराधार झाल्यामुळे  तिचा मोह नाकारण्याएवढा संयम दाखवणारा रायनाक पाहिला की गदगदून येते. त्याउलट रायनाकचा मुलगा सिदनाक लग्नानंतर त्याची बायको पोटुशी होते व बाळंतपणासाठी  माहेरी जाते. तेवढ्यात सिदनाकच्या खास मित्राची बायको त्याला एकांतात घरात गाठते, त्यावेळचा त्यांचा रांगडा प्रणय वाचकाला उत्तेजित करता करता स्त्रीचा मोह नाकारणार्‍या रायनाकला अगदी उत्तुंग करुन टाकते. त्यावेळी रायनाकचे मोठेपण वाचकाला जाणवते.
पुढे  सिदनाकची पुण्यात एका ब्राह्मणाच्या अंगावर सावली पडल्यामुळे हत्या होते  आणि त्याचा मुलगा भिमनाक (हे पणजोबांचेच नाव ठेवलेले असते) पोरका होतो. त्यावेळी रायनाकच्या मनात त्याच्या भावाची येळनाकची विचारसरणी पटू लागते.
भिमनाक महाराला २ मुले असतात. एक रायनाक आणि दुसरा येळनाक. येळनाक संताजी-धनाजी जोडगोळीपैकी संताजी घोरपडेंच्या तैनातीत असतो आणि प्रचंड शौर्यही गाजवतो. पण रायगडाजवळच्या एका लढाईत एक मुसलमान सरदार अशरफीखान येळनाकच्या शौर्यावर भाळतो व त्याला जिवंत कैद करवतो. आणि त्याला मुसलमान होण्याचे निमंत्रण देतो व त्याचा  योग्य तो सन्मान करतो. हसन अली या नावाने येळनाकचे नामकरण होते. हा कादंबरीतील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यावरुन आपल्याला लक्षात येते की भारतात मुसलमान हे मूठभर आक्रमक असूनही त्यांची संख्या अमाप कशी वाढली? लेखकाने या प्रश्नाचा अप्रत्यक्षरित्या वेध घेतल्याचे जाणवते.
कादंबरी संपायला येते त्याबरोबर रायनाक , भिमनाक ही पात्रे गौण होऊ लागतात आणि येळनाक (हसन अली) या पात्रावर प्रकाशझोत जातो. पण नंतर पुढे दिल्लीचे राजकारण आणि पानिपत युद्धाचा वेध घेणे हा प्रमुख हेतू या कादंबरीमागे असल्याने तो ही विरळ होत जातो. पण तो शेवटपर्यंत असतो.
युद्धासाठी जाणार्‍या लव्याजम्यात भिमनाक त्याची नवी नवरी बाळी बरोबर जातो, त्यात त्याचा खास मित्र पेशव्यांच्या सैन्यात असतो. तो वारंवार भिमनाकला भेटायला येत असतो त्यातच बाळी त्याच्यावर भाळते व पुढे त्यांचे जमते देखील. त्यावेळीही वाचकाला सिदनाकचा रांगडा प्रणय पुन्हा एकदा दिसणार असे वाटते. पण लेखकाने याचे भान ठेवल्याचे जाणवते. ज्या गोष्टीला जेवढे महत्त्व द्यायचे तेवढेच महत्त्व संजय सोनवणी यांनी दिले आहे. शेवटी शेवटी कादंबरी विस्तारीत जाते तशी ती थोडी विस्कळीत वाटू लागते. पण पानिपताच्या युद्धातील प्रश्नांचा आढावा घ्यायचा असल्यामुळे तेवढे वाचक समजू शकतो.

कादंबरी वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी वाचकाच्या मनात पूर्वी वाचलेला पानिपताचा भव्य दिव्य इतिहास उभा राहतो. विश्वास पाटील यांनी 'पानिपत' ही कादंबरी लिहून 'तत्कालिन उपलब्ध साधनांच्या आधाराने पानिपत' युद्धाचा इतिहास एका थरारक स्वरुपात वाचकांच्या समोर ठेवला.  पण या कादंबरीत जे प्रश्न हाताळले गेले नाहित ते हाताळण्याचे धाडस संजय सोनवणी यांनी दाखवले आहे. आणि मला वाटते की इथेच "...आणि पानिपत" चे वेगळे पण सुरु होते.
पानिपताचा इतिहास म्हटले की मराठ्यांचा पराक्रम आणि पेशव्यांचे कर्तृत्त्व यापलिकडे काही वाचल्याचे आपल्याला आठवते का बघा. सर्वसामान्यांच्या आयुष्यात पानिपताच्या युद्धाने केवढे मोठे वादळ निर्माण केले याचे एक परखड अवलोकन "...आणि पानिपत" च्या माध्यमातून लेखकाने केले आहे. अर्थात या कादंबरीत पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे असेल कदाचित पण लेखकाने पानिपताच्या युद्धाच्या अनुषंगाने सगळ्याच अंगाला स्पर्श केला आहे असे नाही म्हणता येणार. पण जे लिहिले आहे त्याला तोड नाही.

   "...आणि पानिपत "  ही कादंबरी  अनेक वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकते आणि क्रांतिकारक विचार देखील देते. कोणत्याही वेगळ्या विचारांचे स्वागतच व्हायला हवे. वाचकांनी ते करावे एवढीच विनंती. जात पात बाजूला ठेवून एका सर्वसामान्य गरीब रयतेच्या दृष्टीकोनातून या कादंबरीचे वाचन वाचकाने केले तर "...आणि पानिपत" या कादंबरीला तुम्ही न्याय देऊ शकाल. एका जातिविशेष अभिमानातून अथवा पूर्वग्रह ठेवून हे पुस्तक वाचले तर तो "...आणि पानिपत" या कादंबरीवर अन्याय ठरेल. खरे तर तो विचारस्वातंत्र्यावरील अन्याय ठरेल.  मला वाटते की त्यांच्या मतांशी भिन्नता असणार्‍या संशोधकांनी वा लेखकांनी त्यांनी उभे केलेल्या प्रश्नांना हॅ... काहीतरीच असे उडवून लावण्यापेक्षा लेखनाच्या माध्यमाद्वारेच उत्तरे दिली पाहिजेत. अशा बौद्धिक आणि पुराव्यांसकट मांडल्या जाणार्‍या मतांमुळे इतिहासातील देवत्व दिलेल्या व्यक्ती खरोखर तशाच होत्या किंवा नाही यामागील सत्य उलगडण्यास सर्वांनाच मदत होईल.

तर सर्वसामान्य आणि सर्व बुद्धीवंत अशा सर्व वर्गातील वाचकांनी अवश्य वाचावी अशीच ही कादंबरी आहे. वाचकाची अजिबात निराशा होणार नाही हे खात्रीने म्हणू शकतो.
"...आणि पानिपत" वाचा आणि कशी वाटली ते अवश्य कळवा. :)

Thursday, June 23, 2011

पुस्तकांवर प्रश्नमंजुषामाझे प्रिय मित्र देवेन्द्र प्रभुणे यांनी पुस्तकविश्व.कॉम या संकेतस्थळावर अनेक प्रश्नमंजुषा घेतल्या आहेत. त्यातील मला आलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना माहिती व्हावीत यासाठी देत आहे.


धन्यवाद,
~ सागर 

१.मराठीतील पहिले पुस्तक कोठे छापल्या गेले?(जागेचे नाव)
उत्तर  : मातृभाषेतील पहिले पुस्तक दुसर्‍या प्रदेशात छापले जावे आणि तेही अमराठी, त्यातही ज्यांची गुलामगिरी पत्करावी लागली त्या ब्रिटिशांच्या पैकी एकाच्या - विल्यम कॅरे या गृहस्थामुळे, यात दुसरे दु:ख ते कोणते?
श्रीरामपूर (त्या काळचे एकसंध बंगाल) १८०५ साली छापले गेले.२.पुढील प्रस्तावना कोणत्या पुस्तकातील आहेत?
अ.  शंभरातील नव्याणवास
      उत्तर : नन अदर दॅन कोसला - भालचंद्र नेमाडे
ब. "टु इन्ग्रिड बर्गमन " 
      उत्तर : कवी ग्रेस - काव्यसंग्रह - संध्याकाळच्या कविता ३.पुरुष असुनही स्त्रीटोपणनावाने लेखन करणारे लेखक कोण?
उत्तर  :  चिं. त्र्यं. खानोलकरांनी आरती प्रभू हे स्त्री नाव काव्य लेखनासाठी वापरले

४.बाबुराव अर्नाळ्करांचे मूळ नाव काय?
उत्तर  : चंद्रकांत सखाराम चव्हाण

५.कोणत्या मराठी साहीत्यकाला "दो रास्ते" ह्या चित्रपटासाठी कथेचे filmfare पारितोषीक मिळाले होते?
उत्तर  : - चंद्रकांत काकोडकर

६."सुर्य"ह्या श्री.दा.पानवलकरांच्या कथेवर कोणता विख्यात हिंदी चित्रपट बनवलेला आहे?
उत्तर  : - अर्धसत्य.. जबरदस्त चित्रपट. श्रेय मात्र विजय तेंडूलकरांनी पटकथा लिहिल्यामुळे त्यांच्याकडे गेलं.

७.अठरा धान्यांचे कडबोळे हे कोणत्या विनोदी कथासंग्रहाचे मूळ नाव आहे?
उत्तर  : संकलित लेख - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

८.बहिणाबाई चौधरी ह्यांचया कविता जगासमोर आणणारे साहित्यिक कोण?
उत्तर  : - आचार्य अत्रे 

९.कोणत्या विख्यात कवीच्या विनोदी कथा संग्रह् रुपात प्रसिद्ध झाल्या आहेत?
उत्तर  : राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या नावाने अदमासे दीडशेच्या आसपास कविता लिहिल्या आहेत.
मनोरंजन मासिकातून त्यांनी बाळकराम या नावाने जे विनोदी लेखन केले ते रिकामपणची कामगिरी या संग्रहातून प्रसिद्ध झाले आहे.

१०.रुपक कथा मराठीत आणणारे साहित्यिक कोण?
उत्तर  : वि.स. खांडेकर


Wednesday, February 16, 2011

संक्षिप्त आवृत्त्या - मराठी साहित्याला लागलेली एक कीड


अलिकडेच मी काही जुनी पुस्तके नव्याने छापून बाजारात आली म्हणून उत्साहाच्या भरात विकत घेतली.
मी खरेदी करताना एकतर ऑनलाईन किंवा फोनवरुन ऑर्डर देऊन इकडे बंगळूरात मागवतो. अशा वेळी हा धोका लक्षात येत नाही. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेतल्यावर किमान कळते तरी की हातात काय कलाकृती आली आहे ते. असो पण मुद्दा तो नाहिये.
मुळात कोणत्याही कादंबरीचा अथवा पुस्तकाचा संक्षेप करणे हे योग्य आहे की अयोग्य?
माझ्यामते तरी कोणत्याही साहित्यकृतीचा दुसर्‍या लेखकाने संक्षेप करणे ही प्रचंड आक्षेपार्ह बाब आहे आणि संक्षिप्त आवृत्त्या या मराठी साहित्याला लागलेली ही कीड आहे.
मी स्वतःच तीन उदाहरणे पाहिली आहेत. अजून किती असतील आणि किती येणार आहेत ते प्रकाशकांनाच ठाऊक.
नाथमाधवांसारख्या प्रतिभावान लेखकाने छत्रपति शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या स्वराज्य मालिकेतील ७-८ पुस्तके असो. किंवा हरि नारायण आपटेंचे 'चंद्रगुप्त' हे पुस्तक असो किंवा मग भा.रा. भागवतांनी ज्यूल्स व्हर्नच्या कथा मराठीत अनुवादीत केल्या तो २० पुस्तकांचा संच असो.
प्रकाशकांनी नाव मूळ लेखकाचे वापरायचे व आत कोठेतरी संक्षेप केलेल्या लेखकाचे नाव द्यायचे याला बाजारू वृत्ती नाही तर काय म्हणावे? मराठी माणसाच्या हातात पैसा खेळू लागला आणि तो पुस्तके विकत घेऊन वाचू लागला म्हणजे त्याच्या हातात सुंदर कलाकृती विकृत करुन द्यायचा हक्क तुम्हाला कोणी दिला? ज्याने रसनिर्मिती केली त्या लेखकाच्या कलाकृतीचे मूल्यमापन त्या लेखकापेक्षा जास्त दुसरे कोण करु शकेन?
भा. रा. भागवतांनी ज्यूल्स व्हर्नच्या सुंदर वैज्ञानिक कथांचा सुरस अनुवाद मराठीत २० पुस्तकांच्या संचाच्या रुपाने आणला होता. मुळात ही पुस्तके लहान आकाराचीच होती, त्यांचाही संक्षेप करण्याचे प्रयोजन ना प्रकाशकांनी दिले ना संक्षेप करणार्‍या लेखकाने. भा.रा. भागवतांनी बाल-कुमार वयोगटाला समोर ठेवून जी साहित्य निर्मिती केली त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. भागवतांचे बाल-कुमार वयोगटाला मोहून टाकण्याचे कौशल्य त्या कधीही नाव न ऐकलेल्या लेखकाकडे आहे की नाही हे कोण ठरवणार? संक्षेप करणारे लेखक पात्रतेने आणि योग्यतेने महान असतीलही. पण म्हणून दुसर्‍या लेखकाची साहित्यकृती विद्रूप करुन वाचकांना देणे हा अक्षम्य अपराध आहे.
तीच गोष्ट ह.ना.आपटे यांच्या चंद्रगुप्त या कादंबरीची. हिंदी अनुवाद आजही विकत घेण्यासाठी उपलब्ध आहे. पण मराठीत मात्र हे सुंदर पुस्तक बाजारात मिळत नाही. सध्या मिळते आहे ते केवळ ३०-३५ पानांचे पुस्तक. जे बाल वयोगटातील वाचकांना समोर ठेवून संक्षेप केलेले आहे.
आपण वेळीच या संक्षिप्त आवृत्त्यांच्या किडीवर उपाय नाही केला तर उद्या नाथमाधवांची वीरधवल अवघ्या ८०-१०० पानांत बघावयास मिळेल. छावा १००-१५० पानांत दिसेन. जी एंची अनेक पुस्तके एकत्र संक्षिप्त मिळतील. यापुढे कल्पनाच करु इच्छीत नाही.
एखाद्या कादंबरीचा रस त्यातील वर्णनांतून वाचकाला लेखक आपल्या शैलीतून एका वेगळ्या स्वप्न-विश्वात नेतो. विबिध वर्णनांनी वाचकाचे भावविश्व निर्माण होते. साहित्याच्या सौंदर्याचा हा आत्माच या संक्षिप्त आवृत्त्या मलीन करतात.
संक्षेपात वातावरणनिर्मितीला तडा जातो हा मुख्य भाग आहे. तसेही एखादे मोठे पुस्तक वाचताना आपल्याला नको तो भाग वगळण्याचे...न वाचण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असतेच की... पण आपल्याला (वाचकाला) पुस्तकातील कोणता भाग नको आहे हे दुसर्‍या कोणी ठरवावे हे मला वाटते कोणालाही मान्य नसावे. मूळ कलाकृतीतील नको तो भाग वगळण्याचे स्वातंत्र्य केवळ वाचकाच्याच हातात असावे असे माझे मत आहे. सार वाचण्यासाठी संक्षिप्त आवृत्त्यांचा उपयोग होईलच की. त्याने हे केले तो तिथे गेला, त्याला ती भेटली, त्याने युद्ध केले अशा संक्षेपानेदेखील कथानक कळतेच की. पण वाचन करताना रसस्वाद भंग होतो त्याचे काय?
उदाहरणादाखल, चंद्रगुप्त या ह.ना.आपटेंच्या सुंदर कादंबरीचा ज्या बाल वयोगटातील मुलांसाठी संक्षेप केला गेलाय, त्या पुस्तकात पहिल्या ३ पानांत ह.ना.आपटेंनी वातावरणनिर्मितीसाठी रचलेले वर्णन जसेच्या तसे दिलेले आहे, आणि पुढील संक्षेप घाईघाईत उरकला गेला आहे. जी रसमाधुरी मोठ्या कादंबर्‍यांतून असते ती संक्षेपात खास करुन लहान वयोगटातील वाचकांना लक्ष्य करुन देऊन उपयोग काहीच नाही. कारण ती रसमाधुरी दीर्घपल्ल्याच्या कादंबरीसाठी निर्माण केली गेली होती.
केवळ चांदण्या रात्री अमके तमके झाले असे पण संक्षेपात झाले असतेच की.
संक्षेपात मूळ कलाकृतीचे सौंदर्य लोपते यावर माझा जास्त आक्षेप आहे. संक्षेप योग्य असता तर लेखकानेच तो भाग कशाला लिहिला असता?
अर्थात काय आवडावे काय न आवडावे हा सर्वस्वी वैयक्तीक अनुभवावर आधारीत भाग आहे. पण साहित्यसौंदर्य लोपेल अशा संक्षिप्त आवृत्त्या फोफावू लागल्या तर लोक वाचनातील जी रसमाधुरी आहे तीच विसरुन जातील. मग वाचन हे यांत्रिक होईल.
एक सुंदर विचार येथे आठवतो आहे तो देतो आणि थांबतो
कोणतेही व्यसन केव्हा सुटते???? ................. व्यसन लागण्याआधी....
तद्वतच साहित्यसौंदर्य जपायचे असेन तर ते ....कीड लागण्याआधीच जपले पाहिजे.....
संक्षेपाची सुरुवात एकदा मान्य झाली की केव्हा त्यामुळे साहित्यसौंदर्य केव्हा पोखरले गेले ते कळणार पण नाही.
वेळीच आवरले नाही तर ही संक्षिप्त आवृत्त्यांची कीड पसरायला वेळ नाही लागणार.....
*** सर्व लेखकांना, प्रकाशकांना विनंती की अशा प्रकारची संक्षिप्त आवृत्त्यांची कीड मराठी साहित्यात आणू नका ***

*** सर्व पुस्तकप्रेमींनी संक्षिप्त आवृत्यांवर बहिष्कार टाकणे हे एकमेव शस्त्र वाचकांच्या हातात आहे. तेव्हा सर्व वाचकांनी संक्षिप्त आवृत्ती दिसली की ती घेऊच नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. ***

Saturday, February 5, 2011

२००० ते २०१० या दशकातील मला आवडलेल्या पुस्तकांची यादी


विचार न करता पहिली सहा लगेच डोळ्यांसमोर आली, व बाकीची शोधावी लागली. त्यात अनुवादीत पुस्तके जास्त आहेत याचा नक्कीच खेद आहे मला. पण ही वस्तुस्थिती आहे. बहुतेक अजून ५-६ महिन्यांनी मला मागील दशकातील पुस्तके जास्त अधिकाराने देता येतील.
२००० ते २०१० या दशकातील मला आवडलेल्या पुस्तकांची यादी

१. प्रतिस्पर्धी - किरण नगरकर (ककल्ड चा अनुवाद) - रेखा सबनीस - पहिली आवृत्ती : २००८
२. ब्र - कविता महाजन - पहिली आवृत्ती : मे २००५


३.१ अभयारण्य - डॉ. जयंत नारळीकर - (पहिली आवृत्ती : २००२ )

३.२ व्हायरस - डॉ. जयंत नारळीकर


४. पूर्वांचल - अविनाश बिनिवाले (जबरदस्त आणि प्रत्येकाने वाचावे असेच पुस्तक)


५. दा विंची कोड - डॅन ब्राऊन - अनु: अजित ठाकूर


६. एन्जेल्स अ‍ॅन्ड डेमन्स - डॅन ब्राऊन - अनु: बाळ भागवत
७. द अल्केमिस्ट - पाओलो कोएलो - अनु: नितीन कोत्तापल्ले


८. नभात हसरे तारे - जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, अजित केंभावी


९. कालगणना - मोहन आपटे


१०.किमयागार - अच्युत गोडबोले.


११.साधनामस्त - जगन्नाथ कुंटेअजून वाचले नाहीत पण २००० - २०१० या दशकातील सर्वोत्तम माझ्या यादीत नक्की आले असते याची खात्री असल्याने ही पण यादी देतो आहे.
१. शाळा - मिलिंद बोकील
२. बारोमास - सदानंद देशमुख
३. आदिबंध - बापू करंदीकर
४. नांगरल्याविण भुई - नंदा खरे
५. उर्जेच्या शोधात - प्रियदर्शनी कर्वे
६. प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
७. समिधा - साधना आमटेFriday, February 4, 2011

पुस्तक परिचय : "असूरवेद" - संजय सोनवणी

नुकतेच 'असूरवेद' ही कादंबरी वाचून संपवली. हो संपवली म्हणजे हातातली कामे बाजूला ठेवून प्रसंगी टाळून ही कादंबरी संपवली इतकी ती ओघवती कादंबरी आहे. पण फक्त ओघवती कादंबरी आहे म्हणून मी 'असूरवेद' बद्दल लिहित नाहिये. तर या कादंबरीने मला एक सखोल चिंतन करण्यास भाग पाडले म्हणूनही मी या आगळ्या वेगळ्या कादंबरीबद्दल लिहित आहे. संजय सोनवणी हे तसे वादग्रस्त लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. पण या कादंबरीद्वारे त्यांनी कादंबरी लेखनात एक क्रांतिकारी पायंडा पाडला आहे. सर्वमान्य जे आहे त्यापेक्षा स्वतः संशोधन करुन जे निष्कर्ष काढले आहेत (त्यावर त्यांनी स्वतंत्र पुस्तके देखील लिहिली आहेतच) त्याआधारे कादंबरी रचण्याचा प्रयोग करणे हा एक धाडसी प्रयोगच म्हणावा लागेल. कारण कादंबरी चे रुप सर्वसामान्य जनतेच्या मनावर जेवढी पकड घेते तेवढी पकड संशोधनात्मक ग्रंथ घेत नाहीत हे खेदाने म्हणावे लागेल. याचे कारण सर्वसामान्य वाचकवर्ग कादंबरी, कथा व कविता या साहित्यप्रकारांत जेवढा रमतो तेवढा संशोधनग्रंथ, पुरातत्त्व विद्या यासारख्या विषयांत रस असल्याशिवाय अशी पुस्तके हातातही घेत नाही.
असूरवेद या कादंबरीतून वैदिक कालीन इतिहासाची रंजक प्रकारे मांडणी करुन लेखकाने वाचकांमध्ये या काळातील सर्व ग्रंथांचे मूल स्वरुप समजून घेण्याची जिज्ञासा जागृत केली आहे.   प्राचीन काळी सर्वमान्य असलेले चारच वेद अस्तित्त्वात नव्हते तर त्यांना वेदांचे स्वरुप कसे आले आणि त्याकाळी कित्येक ग्रंथ सामग्री उपलब्ध होती. व कोणत्या कारणांसाठी अनेक पुरातन धर्मग्रंथांचा नाश केला गेला? असे अनेक प्रश्न मनांत उभे राहतात. त्यासाठी ही धार्मिक थरारकथा अवश्य वाचायला हवी

सर्वसामान्य वाचकच नव्हे तर सर्व प्रकारच्या वाचकांना समोर ठेवून संजय सोनवणी यांनी असुरवेद ही सुंदर कादंबरी देताना वाचकांना एका मागोमाग एक परंपरागत समजुतींना धक्के देतानाच एक सखोल चिंतनही करायला लावतात. आणि मला वाटते की हेच या कादंबरीचे खरे यश आहे. धर्माने उभ्या केलेल्या जातियवादाच्या भिंती देखील 'असूरवेद' मधून साकारलेल्या प्रमुख पात्रांच्या  माध्यमातून तोडायचे धाडस लेखक संजय सोनवणी यांनी केलेले आहे. यासाठी त्यांची प्रशंसा जरुर केली पाहिजे