Wednesday, June 21, 2017

गॉडफादर - मेंदूला झिणझिण्या आणणारी व पूर्ण वाचनानंद देणारी कादंबरी





गॉडफादर या जगविख्यात कादंबरीचा अनुवाद मराठीत रविंद्र गुर्जर यांनी केलाय.
तर गॉडफादरची कहाणी सुरु होते ती आजच्या जगात (म्हणजे कादंबरी लिहिली तेव्हाच्या काळात) डॉन ला तीन मुले असतात. त्यापैकी संतिनो हा शीघ्र कोपी आणि प्रचंड रागीट, त्यामुळे त्याच्या वाटेला क्वचितच कोणी जायचे. दुसरा फ्रेडी स्त्रीलंपट असल्याने फॅमिलीच्या बिझिनेसमध्ये उपयोग शुन्य. तिसरा मायकेल मात्र बापाशी फारकत घेऊन त्याच्या इच्छेच्या विरोधात अमेरिकन सैन्यात असतो. सगळे  गुन्हेगारी विश्व सुरळीतपणे सुरु असते.  पण त्या काळात अमेरिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा व्यापार करण्यासाठी इटलीहून सोलोझो येतो. या सोलोझोला डॉनचे शत्रू असलेल्या पाच प्रमुख फॅमिलींचे पाठबळ असते. असे असूनही हा धंदा अमेरिकेत पसरवण्यासाठी सोलोझोला डॉन कॉर्लिऑनची मदत हवी असते. याचे मुख्य कारण असते ते डॉनच्या पोलिस, न्यायपालिका व राजकारणी नेते यांच्याशी असलेले जवळचे संबंध. पण  नशेच्या पदार्थांच्या विरोधात असलेल्या डॉनला सोलोझोचा प्रस्ताव मान्य होत नाही. या मिटिंगच्या वेळी संतिनो उर्फ सोनी कॉर्लिऑन चर्चेत मध्येच बोलतो आणि सोलोझोला कळते की संतिनो आपल्या उपयोगी पडू शकतो. अशा  तंग वातावरणात मिटिंग संपते आणि डॉन संतिनोला खडसावतो की ही चूक खूप महागात पडेल. पुढे घडतेही तसेच. डॉन कॉर्लिऑनवर खुनी हल्ला होतो आणि एका वेगवान कथानकाच्या गर्तेत वाचक गुरफटत जातो. कथानकाच्या अनुषंगाने पुढे अनेक पात्रे त्यात आहेत. हेगन वकील, खर्टुम या घोड्याचा मालक व चित्रपट निर्माता जॅक, त्याचा चित्रपट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला गॉडफादर डॉन चा मानसपुत्र, अनेक अंगातून खुलत जाणारी ही कादंबरी खूप रोमांचकारी आहे.

व्हिटो असलेला कॉर्लिऑन हा डॉन कॉर्लिऑन कसा होतो त्याच्यावर खुनी हल्ला का होतो? अमेरिकन नेव्हीमध्ये असलेला त्याचा मुलगा मायकेल त्याची मैत्रीण के अ‍ॅडम्स बरोबर असताना वडिलांवर गोळ्या झाडल्याची बातमी वृत्तपत्रात वाचून पुढे काय करतो? संतिनो वडिलांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिहल्ला करतो का? त्यात तो यशस्वी होतो का? कॉर्लिऑन फॅमिलीला पुढे पाचही शत्रू फॅमिलीशी वैर घ्यावे लागते का? टोळी युद्ध होते का? त्यात ते टिकतात का? शेवटी कॉर्लिऑन फॅमिलीला काय किंमत मोजावी लागते? डॉनचे पुढे काय होते? डॉनचे डावे व उजवे हात क्लेमेंझा व टेशियो यांची  या सर्व गदारोळात काय भूमिका असते?  अशा अनेक प्रश्नांची उकल कादंबरीत टप्प्याटप्प्याने होत जाते पण प्रत्येक उत्तराबरोबर वाचकाला हादरे बसतात. अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाच्या परिचयात सांगून पुस्तकाची रंगत घालवत नाही. पण माफियाचे काम कसे चालते आणि स्वतःचे अस्तित्त्व आणि वर्चस्व टिकवण्यासाठी माफिया टोळींतील युद्ध कोणत्या थराला जाते हे वाचणे  खरोखर भयानक आहे. पण रक्ताने रंगल्याशिवाय माफियाचे कामही होत नाही. अतिशय गुंतागुंतीच्या पण अतिशय ताकदीच्या या कादंबरीच्या  वाचनामुळे वाचक थरारुन जातोच. पण मेंदूला झिणझिण्या आणणारी  व पूर्ण वाचनानंद देणारी कादंबरी  म्हणजे गॉडफादर...

गॉडफादर या कादंबरीवर ३ भागांत इंग्रजी भाषेत चित्रपटही तयार झालेला आहे. आणि तो देखील तितकाच गाजलेला आहे. भारतातही हिदी चित्रपटसृष्टीला गॉडफादरचा मोह आवरलेला नाहिये. फिरोज खानचा "धर्मात्मा" आमीर खान चा आतंक ही आतंक हे मूळ चित्रपटाचे थेट रिमेक होते. गॉडफादर मधील अनेक प्रसंगांच्या कल्पना अनेक चित्रपटांतून  वापरल्या गेल्या. तरी मूळ इंग्रजी चित्रपटाच्या ताकदीचा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला तयार करता नाही आला.
तरीही वाचकांसाठी गॉडफादर हे पुस्तक मोठी मेजवानी आहे. एक अतिशय वेगवान , थरारक आणि श्वास रोखुन धरायला लावणारी अशी ही गॉडफादर कादंबरी पानापानातून वाचकाला थरार अनुभवायला देते.  आवर्जून वाचण्यासारख्या अनुवादित पुस्तकांपैकी गॉडफादर हे खूप वरचे पुस्तक मी मानतो.