Monday, January 28, 2019

कथासारित्सागर एक अद्भुत प्राचीन ग्रंथ

पुस्तकाबद्दल :


मूळ ग्रंथ बृहत्कथा हा महाकवी गुणाढ्य याने इसवीसना पूर्व पहिल्या ते इसवीसना नंतर पहिल्या शतकाच्या काळात कधीतरी लिहिला याबद्दल विद्वानांत एकमत आहे. महाभारता पेक्षाही श्रेष्ठ असा हा ग्रंथ मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. कथेप्रमाणे राजाने महाकवी गुणाढ्य याला राज्याबाहेर हाकलून दिल्यावर त्याने प्रत्येकी एक लक्ष श्लोक याप्रमाणे सात विद्याधरांच्या कथा रचून प्राकृत पैशाची भाषेत मूळ ग्रंथ लिहिला. राजाने ग्रंथ नाकारल्यामुळे ग्रंथाचे वाचन जंगलात करून तो एकेक पान महाकवी गुणाढ्य जाळत होता. सर्व प्राणिमात्र तहान भूक विसरून हा अद्भुत ग्रंथ ऐकत होते. शिकार्यांना राजासाठी सकस मांस मिळत नसल्यामुळे  राजाने शोध करविला आणि त्याच्या लक्षात महाकवी गुणाढ्य याची महती लक्षात आली. तेव्हा राजाने त्याला थांबवले. तोपर्यंत सहा विद्याधर कथा आग्नेय स्वाहा झालेल्या होत्या. उरलेल्या एक लक्ष श्लोक संख्येची एकच नरवाहन दत्त या विद्याधर राजाची कथा शिल्लक उरली.

पुढे इसवीसनच्या नंतर ११ व्या शतकात काश्मीर येथील एका पंडिताने बृहत् कथेचा संस्कृतात अनुवाद केला. तो आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे आज कथासारित्सागर या नावाने महाकवी गुणाढ्य याची मूळ बृहत् कथा आपल्याला वाचावयास मिळते आहे.

इंग्रज अधिकारी एम. एन. पेंझेर यांना हा अमूल्य ग्रंथ मिळाला. त्यांनीं तो सविस्तर इंग्रजीत दहा खंडांतून अनुवादित केला आहे. मराठीत वरदा प्रकाशन च्या ह. अ. भावे यांनी ५ खंडांत कथासरित्सागर मराठीत आणले आहे. याही आधी मराठी अनुवाद उपलब्ध होते. पण ते जुन्या मराठीत आणि संक्षिप्त केले असल्यामुळे कालबाह्य झाले होते. दुर्गा भागवत यांची अत्यंत अभ्यासपूर्ण सविस्तर प्रस्तावना हेही या कथासारित्सागर च्या अनुवादाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणतीही कथा वाचली तरी अत्यंत आनंद मिळतो. अवश्य वाचावे असे हे ५ खंड आहेत.