Sunday, December 21, 2014

हिरण्यदुर्ग : एक अत्यंत थरारक व रोमांचकारी संघर्षाचा प्रवासअद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार तसा मराठी साहित्याला नवा नाहीये. पण दुर्दैवाने मराठी साहित्यात या कादंबरी प्रकारात फारसे काम लेखकांकडून झालेले नाही. मुळात कथानक गुंफण्याचं विलक्षण कसब असणारा लेखकच या अद्भुताच्या विश्वात प्रवेश करायला धजावतो. अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार मराठीत सुरु कसा झाला हा एक खरोखर उत्सुकतेचा विषय आहे. गो.ना. दातार यांनी रेनॉल्ड्स या पाश्चात्य लेखकाच्या कादंबर्‍यांची भारतीय रुपांतरे मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे व त्या कादंबर्‍या लोकप्रिय झाल्यावर अद्भुतरम्य कादंबर्‍या अनेक मराठी लेखक लिहू लागले. पण त्या सर्व कादंबर्‍यांचे सांगाडे विदेशी लेखकांचे असत. अगदी अलिकडे काही दशकांपूर्वी 'मर्मभेद'कार म्हणून गौरविले गेलेल्या शशी भागवतांच्या या कादंबरीतले अद्भुत ऐयार त्याच्याही आधी दोन दशकांपूर्वीच देवकीनंदन खत्रींच्या 'चंद्रकांता' या हिंदी कादंबरीत आले होते. 'चंद्रकांता'त ऐयार कुठून आले हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. बाळसे धरु लागलेला अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्य प्रकार आता संपुष्टात येतो की काय असे चित्र असतानाच आणि २०१४ वर्ष संपत असताना, किंबहुना गेल्या कित्येक दशकांत प्रकाशित झालेल्या ढीगभर पुस्तकांत "हिरण्यदुर्ग" खरोखर सोन्याच्या तेजस्वितेने तळपणारे पुस्तक आहे.

"हिरण्यदुर्ग" ही एक अद्भुतरम्य कादंबरी आहेच. पण अद्भुतरम्य कादंबरी या साहित्य प्रकारातली मानदंड ठरणारी अशी ही कादंबरी आहे. का आणि कसे ते थोडक्यात सांगतो. आतापर्यंत आपण वाचत आलेल्या कित्येक अद्भुतरम्य कादंबर्‍या भारतीय रुपातल्या असल्या तरी त्या सर्व कादंबर्‍यांचे कथासूत्र बव्हंशी विदेशी व क्वचित इतर भाषेंतील कादंबर्‍यांवरुन घेतलेले होते. अगदी मुळापासून कथासूत्र अस्सल मराठी भाषेतील असलेली अद्भुतरम्य कादंबरी आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही. अद्भुतरम्य कथानकाची निर्मिती करण्यासाठी विलक्षण प्रतिभा लागते. मराठी वाचकांना थरार कथा आणि रहस्यकथा वेगवेगळ्या आहेत याची जाणीव करुन देणारे व थरारकथांचा सम्राट म्हणून ज्यांनी अतिशय तरुण वयात नाव कमावले ते आजचे आघाडीचे व लोकप्रिय लेखक श्री. संजय सोनवणी वाचकांना परिचित आहेतच. या लेखकाने आतापर्यंत अनेक साहित्यप्रकार आव्हान म्हणून स्वीकारले व प्रमाणाबाहेर यशस्वीपणे योगदान देऊन हाडाचा लेखक काय काय करु शकतो याचा जणू एक आदर्शच त्यांनी निर्माण केला आहे. शेकडो लेख आणि शंभराच्या आसपास पुस्तके लिहून एक प्रकारची स्थितप्रज्ञता आल्यावर संजय सोनवणी यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाने अद्भुतरम्य कादंबरी लिहिणे हे मराठी वाचकांचे एक प्रकारचे भाग्यच आहे असे मी समजतो. यापुढेही अद्भुतरम्य कादंबर्‍या अनेक लिहिल्या जातील. तरीही कथानकाचा सांगाडा व जडण घडण संपूर्णपणे मराठी असलेली मराठीतील पहिली अद्भुतरम्य कादंबरी म्हणून "हिरण्यदुर्ग" कायमच ओळखली जाईल. या प्रशंसेसाठी लेखक श्री. संजय सोनवणी खरोखर पात्र आहेत.

सातवाहनांचा गौरवशाली काळ हा खरे तर महाराष्ट्राच्या व आपल्या देशाच्या इतिहासाचाही मानदंड असायला हवा होता. पण यावर दुर्दैवाने आपल्या संशोधक वा इतिहासकारांकडून म्हणावी तशी भरीव कामगिरी झाली नाही. स्वतः लेखक संजय सोनवणी हे इतिहास संशोधनही करत असल्याने सातवाहनांच्या काळाची पार्श्वभूमी 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीसाठी वापरुन त्यांनी एक प्रकारे वाचकांसाठी महाराष्ट्राच्या सातवाहन राजांच्या वैभवशाली इतिहासाची कवाडेच जणू उघडून दिली आहेत.

हिरण्यदुर्गाच्या गाभार्‍यात आता डोकावून पाहूयात. 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीत असे काय आहे की ज्यासाठी वाचक पुस्तकाला चिकटून राहतो?. अद्भुत, वीर, रौद्र, बीभत्स, भय, रोमांच, थरार, शौर्य, प्रेम, वासना, थरकाप, हिडिस, घृणा, प्रेरणा, चेतना, आशा, निराशा, जय, पराजय, सुष्ट, दुष्ट, हिंसा, अहिंसा, संहार, प्रतिकार, अशा कित्येक प्रकारच्या मनोभावनांचा परिचय वाचकांना "हिरण्यदुर्ग" ही अद्भुतरम्य कादंबरी करुन देते. कादंबरीचे नाव "हिरण्यदुर्ग" असल्यामुळे हिरण्यदुर्ग या कादंबरीत केंद्रस्थानी असणार हे उघड असल्याने या कादंबरीची सुरुवात होते ती सिंहभद्र आणि केतुमाल या दोन आगंतुक प्रवाशांबरोबर. हे दोन्ही प्रवासी वाट चुकून सूर्य मावळल्यानंतर हिरण्यदुर्गाच्या परिसरात येतात आणि त्यांचे खूप आदरपूर्वक स्वागत होते. प्रवासाने थकलेले हे दोघे प्रवासी हिरण्यदुर्गाची श्रीमंती पहात सुग्रास भोजन करुन मदनमंजिर्‍यांच्या गोड सहवासाने रात्री गाढ झोपी जातात. सकाळी दोघे जागे होतात आणि पूर्णपणे हादरतात ते उध्वस्त भिंती... गच्च झुडपांचे रान...  ढासळलेले बुरुज ...असा दुर्ग पाहून. काय असते हिरण्यदुर्गाचे हे भयंकर रहस्य?

पुढे हिरण्यदुर्गाच्या कक्षेतून बाहेर पडून सिंहभद्र आणि केतुमाल हे प्रवास करु लागतात. वाटेत एक गूढ जटाधारी भेटून त्यांना आसरा देतो. त्याच्या साहाय्याने एका गुप्त गुहेच्या मार्गाने दुसर्‍या बाजूने ते  दोघे बाहेर येतात. धनगरांकडुन मिळालेली धक्कादायक वागणूक वाचकांना आश्चर्याच्या गर्तेत ढकलते. खुद्द सिंहभद्र देखील त्या वागणुकीने चक्रावतो. जसजसा त्या निष्पाप व मोकळ्या मनाच्या धनगरांच्या सहवासात राहून सिंहभद्र गोष्टी ऐकत जातो तसतसा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. स्वतःच्या आजच्या अस्तित्त्वाची पाळेमुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या भयंकर संग्रामात दडलेली आहेत हे जाणून स्वतः सिंहभद्र आणि पर्यायाने केतुमालही थरकापतात.

पुढे पुलोम्याच्या सर्व शक्ती जागृत होतात आणि तो प्रकटतो. पुलोमा अवतीर्ण झालाय आणि सिंहभद्र अजूनही स्वतःच्या अस्तित्वाची पाळेमुळे शोधतो आहे. अशा विपरीत अवस्थेत या भयंकर रणसंग्रामाला सुरुवात होते. असंख्य लोहपीसांचा वर्षाव करणारा लोहपक्षी, त्याच्याशी लढणारा सिंहभद्राच्या आज्ञेतील त्रिशूळ. सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच त्याला नष्ट करण्याच्या हेतूने अवाढव्य पर्वतच्या पर्वत उध्वस्त करणारा पुलोमा. पाताळगंगेचे रहस्य, विनाशकारी परिस्थितीत तेर नगरीतील सर्पांच्या राजाकडे सुरक्षित ठेवलेले गूढ आणि रहस्यमयी बाड. ते बाड मिळून सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच पुलोम्याने नागांच्या राणीला आपल्या सापळ्यात अडकवून बाड नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न. बाडाच्या रक्षणासाठी झटणार्‍या शक्तीश्री महाराजांना आलेले अपयश. अशातच गोंधळलेल्या सिंहभद्राच्या आयुष्यात देवसेनेचा अचानक झालेला प्रवेश. पुलोम्याला देवसेनेचा पडलेला मोह. अशा अनेक धक्क्यांमागून धक्के देणारे हे अद्भुतरम्य कथानक वाचकाची उत्कंठा शेवटच्या पानापर्यंत ताणून धरण्यात यशस्वी ठरते.

सिंहभद्र कोण असतो? देवसेना कोण असते? पुलोम्या कसा अवतरतो? सिंहभद्राला जागे करु शकणारे बाड नष्ट होते का? त्यात काय असते? लोहपक्ष्याशी त्रिशूळ कसा लढतो? त्रिशूळ सिंहभद्राच्याच आज्ञेत का असतो? हिरण्यदुर्गाचे रहस्य काय असते? हिरण्यदुर्गाच्या पोटात असे काय रहस्य दडले असते की सर्वशक्तीमान खुद्द पुलोम्याही त्यात प्रवेश करु शकत नसतो? सिंहभद्राला त्याच्या शक्तींचे भान येते का? युद्धात कोण जिंकतो? पुलोम्या की सिंहभद्र? तेर नगरीतील सर्प सातवाहनांच्या चरणी वाहिलेली आपली जन्मोजन्मीची निष्ठा पाळतात का? पाताळगंगेचे रहस्य काय असते?  सातवाहनांच्या राजांची सिंहभद्र आणि पुलोम्या या संघर्षात काय भूमिका असते? सातवाहन ते बाड एवढे का जपत असतात? शक्तिश्री राजाची कन्या देवसेनेचे एक रहस्य काय असते? कुबड्या कोण असतो? त्याचे रहस्यमय वागणे शेवटी कसे उकलते? कोण असतो हिरण्यदुर्गाचा खरा स्वामी? धर्मपाल आणि महाधम्मरक्ख (बौद्ध भिक्खू) सिंहभद्राला कोणती मदत करतात ? शक्तीश्री महाराजांचे एकनिष्ठ सेवक आमोदक आणि गंगाधर बाडासाठी शेवटपर्यंत कसे झुंझतात? हिरण्यदुर्गाच्या परिसराचे रहस्य उकलते का? मरुगण नेमके कोण असतात? ते कोठून आलेले असतात? त्यांचा सिंहभद्राशी काय संबंध असतो? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पानोपानी उत्कंठा ताणून धरणार्‍या "हिरण्यदुर्ग" या अद्भुतरम्य कादंबरीतून मिळतात.

अद्भुतरम्य कादंबरी मध्ये धक्का तंत्र प्रभावीपणे वापरणे हे अतिशय मोठे आव्हान असते. आणि त्यात हिरण्यदुर्ग या कादंबरीचे लेखक संजय सोनवणी हे पूर्णत: किंबहुना जास्तच यशस्वी झालेले आहेत. ही कादंबरी वाचताना वाचकाला पानोपानी धक्के बसत जातात. जेव्हा वाचक भानावर येतो तेव्हा लक्षात येते की आपली कादंबरी वाचून पूर्ण झालेली आहे. हेच हिरण्यदुर्ग चे अद्भुत यश आहे. वाचकाला अजून काय हवे असते? हिरण्यदुर्ग वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाच्या मनात उरतो तो एका थरारक व रोमांचकारी प्रवासाचा आनंद. सातवाहन काळातील तेर व प्रतिष्ठान नगरी, सातपुड्याच्या अजस्त्र पर्वतरांगा....निबीड अरण्ये....हिरण्यदुर्गाच्या या अद्भुत विश्वात वाचकाला पुन्हा पुन्हा फिरायला प्रेरित करेन. हिरण्यदुर्ग या कादंबरीमुळे भविष्यात अनेक लेखकांना स्वतंत्रपणे अद्भुतरम्य कादंबरी मराठीतून लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही आणि या अद्भुतरम्य कादंबरीची दखल मराठी साहित्यात मैलाचा दगड म्हणून कायमच घेतली जाईल. 'हिरण्यदुर्ग' चा हा अत्यंत थरारक व रोमांचकारी संघर्षाचा प्रवास वाचकांना नक्कीच आवडेल...

धन्यवाद,
सागर भंडारे

Tuesday, November 18, 2014

हिरण्यदुर्ग - संजय सोनवणी (एक अत्भुतरम्य कादंबरी)"हिरण्यदुर्ग" या कादंबरीचे विशेष हे सांगता येईल की,
कोणतेही विदेशी कथानक उसने न घेता "पूर्णपणे स्वतंत्र" अशी अत्भुतरम्य व वीर , भय, इत्यादी रसाने ओथंबलेली मराठी साहित्यातील खर्‍या अर्थाने पहीली कादंबरी म्हणता येईल.
याआधी गो.ना.दातार, नाथमाधव, ना.ह.आपटे इत्यादी प्रतिभावंतांनी रेनॉल्ड्स वा इतर पाश्चात्य साहित्यातील कथाबीजे वापरुन व त्याला मराठी वा भारतीय बाज चढवून अत्भुतरम्य कादंबर्‍यांची निर्मिती सुरु केली होती.
सुरुवातीला मनोरंजनासाठी या विदेशी कादंबर्‍यांची भारतीय वातावरणात रुपांतरे झाली हा साहित्यप्रकार मराठी वाचकांना जास्त रुचलाही. पण दुर्दैवाने अशा कादंबर्‍यांची रचना करणार्‍या प्रतिभावंतांची कमतरताच मराठी साहित्याला जाणवली. नाथमाधवांनी वीरधवल ही एक कादंबरी लिहून हा प्रयत्न थांबवला. अत्भुतरम्य कादंबर्‍यांचे जनक रुढार्थाने दातार ठरतात. दातारांनंतर कित्येक दशकांचा दुष्काळ पुढी शशी भागवतांनी मर्मभेद द्वारे संपवला. पण त्यातले ऐयार हे देवकीनंदन खत्रींच्या चंद्रकांता कादंबरीत येऊन दोन दशके लोटली होती. भागवतांनंतर अनेकांनी प्रयत्न केले खरे पण म्हणावे तसे कोणाला यश लाभले नाही.

अत्भुतरम्य कादंबरी हा सुंदर साहित्य प्रकार मराठीत खर्‍या अर्थाने स्वतंत्रपणे देण्याचे श्रेय संजय सोनवणी सरांच्या "हिरण्यदुर्ग" या कादंबरीला द्यावे लागेल. हिरण्यदुर्ग या कादंबरीमुळे भविष्यात अनेक लेखकांना स्वतंत्रपणे अत्भुतरम्य कादंबरी मराठी लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.

"हिरण्यदुर्ग" या अत्भुतरम्य कादंबरीची नोंद मराठी साहित्यात मैलाचा दगड म्हणून कायमच भविष्यात नोंद घेतली जाईल.
'हिरण्यदुर्ग' या अत्भुतरम्य कादंबरीच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा !!!

जय सिंहभद्र !

- इति ब्रह्मसमंध

Monday, November 3, 2014

२०१४ चे दिवाळी अंक

२०१४ हे वर्ष दिवाळी अंकांच्या दृष्टीने मागील वर्षाशी तुलना करताना थोडे समाधानकारक म्हणता येईल
अनेक दिवाळी अंकांनी यावेळी विविधता जपली आहे. मुखपृष्ठांतून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तर अनुक्रमणिकेवर एक दृष्टीक्षेप टाकताच दिवाळी अंकाच्या अंतरंगाची कल्पना येईल अशी मेहनत घेण्यात आलेली आहे.
यावर्षी अनेक अंक मी पाहिले. व त्यातील अनेक घेतलेही. पुढील दिवाळी अंक मी यंदाच्या वर्षी घेतले आहेत ते त्यातील वैविध्यामुळे आणि अंक दर्जेदार वाटले म्हणून. पुढील काही महिने २०१४ च्या या सर्व दिवाळी अंकांचा फराळ मला चांगलाच पुरेल असे दिसते आहे.

साहित्य-लोभस


साहित्य चपराक
मेहता ग्रंथ जगत

 

कलमनामाआवाजप्रपंच

हसवंती नवलकथा


किस्त्रिम 

महाराष्ट्र टाईम्स
लोकप्रभा


धनंजय


Friday, October 17, 2014

२०१४ वर्षांच्या दिवाळीतील 'साहित्य'फराळही महागला

माहिती स्त्रोत : लोकसत्ता

अन्य वस्तूंप्रमाणेच दिवाळीतील 'साहित्य फराळ' अर्थात दिवाळी अंकही महागले आहेत.
यंदा दिवाळी अंकांच्या किमतीत दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. काही दिवाळी अंकांच्या किंमती २५० रुपयांच्या घरात गेल्या आहेत. तर बहुतांश दिवाळी अंकांच्या किंमती १५० ते २०० रुपयांदरम्यान आहेत.
'दिवाळी अंक' ही मराठी भाषा आणि संस्कृतीची गेल्या शंभरहून अधिक वर्षांची मोठी परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी कथा, कविता, लेख, कादंबरी अशा स्वरुपात 'साहित्य' विषयक दिवाळी अंक जास्त प्रमाणात दिसून येत असत. मात्र अलिकडच्या काही वर्षांत या स्वरुपात बदल झाला असून ज्योतिष, पाककला, पर्यटन, उद्योग-व्यवसाय, वास्तुशास्त्र, महिला अशा विविध विषयांवरील सुमारे ३५० ते ४०० दिवाळी अंक बाजारात पाहायला मिळतात. अन्य कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये दिवाळी अंक ही संकल्पना नाही.

सर्वच क्षेत्रात महागाई झाली असून प्रामुख्याने वाहतूक, कागद यात झालेल्या दरवाढीमुळे दिवाळी अंकांच्या किंमतीतही काही प्रमामात वाढ करावी लागली आहे. सर्वसाधारणपणे दिवाळी अंक हे वेब ऑफसेट किंवा शीटफेड प्रिटिंग या प्रकारात केले जातात. कागद, शाई, पेट्रोल-डिझेल, छपाई यातील दरवाढीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी अंकांच्या किमतीत १५ ते २० टक्के  वाढ झाली असल्याचे दिवाळी अंकांच्या संपादकांची संघटना असलेल्या 'दिवा प्रतिष्ठान'चे प्रमुख कार्यवाह शिवाजी धुरी यांनी सांगितले.

तर ८० टक्के दिवाळी अंक १२० ते १८० रुपये आणि २० टक्के अंक २०० ते २५० रुपये या किंमतीचे असल्याचे  'दीपावली' आणि 'ललित' या अंकांचे संपादक अशोक कोठावळे म्हणाले. 'हंस', 'मोहिनी' आणि 'नवल' या दिवाळी अंकात एकही जाहिरात नाही. जाहिरातींशिवाय असलेल्या या प्रत्येक अंकांची किंमत २५० रुपये आहे. या तीन दिवाळी अंकांची गेल्या वर्षीही तेवढीच किंमत होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्य अंकांच्या यंदा किंमतीत १० ते १५ रुपयांची  तसेच काहींनी वाढ झाल्याचे 'बी.डी. बागवे वितरक कंपनी'चे हेमंत बागवे यांनी सांगितले.  
दिवाळी अंकांची एकूण पाने, अंकातील जाहिरातींचे प्रमाण, छापण्यात आलेल्या प्रतींची एकूण संख्या, वितरकांना द्यावे लागणारे कमिशन आदी सर्व बाबींचा विचार करून दिवाळी अंकाची किंमत ठरविली जाते. त्यामुळे दिवाळी अंकांची निर्मिती करणाऱ्यांना एक अंक ज्या किंमतीला पडतो त्यापेक्षा ४० ते ६० रुपये जास्त अंकांची किंमत ठेवली जाते, असे या व्यवसायातील सूत्रांनी सांगितले. 

काही दिवाळी अंकांची किंमत, गेल्यावर्षी आणि यंदा (रुपयांमध्ये)
अंकाचे नाव,         २०१३    २०१४
अंतर्नाद                १५०      २००
धनंजय                  १५०      २००
आवाज                  १५०      १६०
शतायुषी                १००      १२०

Thursday, October 9, 2014

साहित्य अकादमीने पुरस्कार दिलेली पुस्तके व त्यांचे विषय
नमस्कार वाचन प्रेमी मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

दिवाळी जवळ आली आणि आता दिवाळी अंकांचा फराळ जोरात सुरु होणार. चांगली गोष्ट आहे. पण पुस्तकांची खरेदी देखील दाबून होणार.
या लेखाचे प्रयोजन वाचकांना खरेदीसाठी पुस्तके सुचवणे हे नाहिये. पण १९५५ सालापासून साहित्य अकादमी परिषदेने मराठी साहित्यासाठी पुरस्कार देण्यासाठी सुरुवात केली तेव्हापासून कोणकोणत्या साहित्यप्रकारांना जास्त पुरस्कार मिळाले ते बघणे मनोरंजक ठरेलसाहित्य प्रकार पुरस्कारांची संख्या
आत्म-चरित्र
ऐतिहासिक संशोधन
कथा-संग्रह
कविता-संग्रह
कादंबरी १२
काव्यशास्त्रावर प्रबंध
चरित्र
चिंतन
नाटक
निबंध
पुरस्कार नाही
भाषा-शास्त्र अभ्यास
व्यक्तीचित्रण
समीक्षा
सांस्कृतिक इतिहास
सौंदर्यशास्त्र
एकूण ५९आता पुढे मी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या पुस्तकांची यादी देतोय जेणे करुन वाचकांना ही पुस्तके ग्रंथालयातून अथवा उपलब्ध असेल तर घेऊन ठेवता येतील.
वाचा नक्की.वर्षपुस्तकाचे नावपुस्तकाचा लेखकसाहित्य प्रकार
२०१६ आलोकआसाराम लोमटेग्रामीण कथासंग्रह
२०१५ चलत् चित्रव्यूहअरुण खोपकरसंस्मरण
२०१४ चार नगरातले माझे विश्वजयंत नारळीकरअात्मकथा

2013 वाचणार्‍याची रोजनिशी (Biography) सतीश काळसेकर चरित्र
2012 फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (Short Stories) जयंत पवार कथा-संग्रह
2011 वार्‍याने हलते रान (Essays) ग्रेस निबंध
2010 रुजुवात (Critic) अशोक केळकर समीक्षा
2009 चित्रलिपी (Poetry) वसंत आबाजी डहाके कविता-संग्रह
2008 उत्सुकतेने मी झोपलो (Novel) श्याम मनोहर कादंबरी
2007 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य (Biography) गो. मा. पवार चरित्र
2006 भूमी (Novel) आशा बगे कादंबरी
2005 भिजकी वही (Poetry) अरुण कोलटकर कविता-संग्रह
2004 बारोमास (Novel) सदानंद देशमुख कादंबरी
2003 डांगोरा एका नगरीचा (Novel) त्र. वि. सरदेशमुख कादंबरी
2002 युगांत (Play) महेश एलकुंचवार नाटक
2001 तणकट (Novel) राजन गवस कादंबरी
2000 पानझड (Poetry) ना. धों. महानोर कविता-संग्रह
1999 ताम्रपट (Novel) रंगनाथ पठारे कादंबरी
1998 तुकाराम दर्शन (Criticism) सदानंद मोरे समीक्षा
1997 ज्ञानेश्र्वरीतील लौकिक सृष्टी (Criticism) म. वा. धोंड समीक्षा
1996 एका मुंगीचे महाभारत (Autobiography) गंगाधर गाडगीळ आत्म-चरित्र
1995 राघव वेळ (Novel) नामदेव कांबळे कादंबरी
1994 एकूण कविता-संग्रह (Poetry) दिलीप चित्रे कविता-संग्रह
1993 मर्ढेकरांची कविता-संग्रह: स्वरूप आणि संदर्भ (Literary criticism) विजया राजाध्यक्ष समीक्षा
1992 झाडाझडती (Novel) विश्वास पाटील कादंबरी
1991 टीका स्वयंवर (Criticism) भालचंद्र नेमाडे समीक्षा
1990 झोंबी (Autobiographical Novel) डॉ. आनंद यादव आत्म-चरित्र
1989 हरवलेले दिवस (Autobiography) प्रभाकर ऊर्ध्वरेषे आत्म-चरित्र
1988 उचल्या (Autobiography) लक्ष्मण गायकवाड आत्म-चरित्र
1987 श्रीविठ्ठल एक महासमन्वय (Literary criticism) डॉ. रा. चिं. ढेरे समीक्षा
1986 खूणगाठी (Poetry) ना. घ. देशपांडे कविता-संग्रह
1985 एक झाड आणि दोन पक्षी (Autobiography) विश्राम बेडेकर आत्म-चरित्र
1984 गर्भरेशीम (Poetry) इंदिरा संत कविता-संग्रह
1983 सत्तांतर (Novel) व्यंकटेश माडगुळकर कादंबरी
1982 सौंदर्यानुभव (Literary criticism) प्रभाकर पाध्ये समीक्षा
1981 उपरा (Autobiography) लक्ष्मण माने आत्म-चरित्र
1980 सलाम (Poetry) मंगेश पाडगावकर कविता-संग्रह
1979 सृष्टी सौंदर्य आणि साहित्यमूल्य (Literary criticism) शरच्चंद्र मुक्तिबोध समीक्षा
1978 नक्षत्रांचे देणे (Poetry) आरती प्रभू कविता-संग्रह
1977 दशपदी (Poetry) अनिल कविता-संग्रह
1976 स्मरणगाथा (Autobiographical novel) गो. नी. दांडेकर आत्म-चरित्र
1975 सौंदर्यमीमांसा (Aesthetics) रा. भा. पाटणकर सौंदर्यशास्त्र
1974 नटसम्राट (Play) वि. वा. शिरवाडकर नाटक
1973 काजळमाया (Short stories) जी. ए. कुलकर्णी कथा-संग्रह
1972 जेव्हा माणूस जागा होतो (Autobiography) गोदावरी परुळेकर आत्म-चरित्र
1971 पैस (Essays) दुर्गा भागवत निबंध
1970 आदर्श भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले (Biography) न. र. फाटक चरित्र
1969 नाट्याचार्य देवल (Biography) श्री. ना. बनहट्टी चरित्र
1968 युगांत (Interpretation of the Mahabharata) इरावती कर्वे समीक्षा
1967 भाषा: इतिहास आणि भूगोल (Linguistic study) ना. गो. कालेलकर भाषा-शास्त्र अभ्यास
1966 श्री शिवछत्रपती (Historical research) त्र्यं. शं. शेजवलकर ऐतिहासिक संशोधन
1965 व्यक्ती आणि वल्ली (Sketches) पु. ल. देशपांडे व्यक्तीचित्रण
1964 स्वामी (Novel) रणजित देसाई कादंबरी
1963 रथचक्र (Novel) श्री. ना. पेंडसे कादंबरी
1962 अनामिकाची चिंतनिका (Philosophical reflections) पु. य. देशपांडे चिंतन
1961 डॉ. केतकर (Biography) द. न. गोखले चरित्र
1960 ययाति (Novel) वि. स. खांडेकर कादंबरी
1959 भारतीय साहित्यशास्त्र (A treatise on poetics) गणेश त्र्यंबक देशपांडे काव्यशास्त्रावर प्रबंध
1958 बहुरूपी (Autobiography) चिंतामणराव कोल्हटकर आत्म-चरित्र
1957 पुरस्कार नाही पुरस्कार नाही पुरस्कार नाही
1956 सौंदर्य आणि साहित्य (A study of aesthetics) बा. सी. मर्ढेकर सौंदर्यशास्त्र
1955 वैदिक संस्कृतीचा विकास (Cultural history) तर्कतीर्थ जोशी सांस्कृतिक इतिहास


Wednesday, August 13, 2014

सुहास शिरवळकरांची व शशी भागवतांची पुस्तके सवलतीच्या दरात


सुहास शिरवळकरांची चांगली पुस्तके तसेच शशी भागवतांच्या दोन गाजलेल्या कादंबर्‍या सवलतीच्या दरात मिळवा.

Monday, August 11, 2014

सुहास शिरवळकर

सुहास शिरवळकर फॅन असाल तर हे पान तुमच्यासाठीच !
https://www.facebook.com/sushi.fanpage

 

या पानावर काय असेन?

सुहास शिरवळकरांच्या जवळपास सर्व पुस्तकांबद्दल माहिती या पानावर देण्यात येणार आहे.
अनेक माहिती नसलेल्या गोष्टी या पानामुळे सुशिंच्या चाहत्यांना कळणार आहेत.
या पानावर वेळोवेळी भर टाकणारे तुमच्या-आमच्यासारखे चाहते तर आहेच.
'अजिंक्य-विश्वास' (Ajinkya Vishwas) हा सुशिंचा एक चालता बोलता कोशच येथे वावरुन ही सर्व माहिती आपल्याबरोबर शेअर करणार आहे. शिवाय सुशिंचे सुपुत्र सम्राट शिरवळकर
(Samrat Suhas Shirvalkar) हेही वेळोवेळी त्यात भर टाकणार आहेत.
तेव्हा या पानाला नक्की भेट द्या व लाईक करुन अपडेट्स मिळवा. Wednesday, July 23, 2014

शपथ वायुपुत्रांची - वाचनानंद देणारा थरार
पुस्तकाचे नाव : शपथ वायुपुत्रांची
मूळ लेखक : अमिश त्रिपाठी
मराठी अनुवादः मेघना संभू-शेट्ये
पृष्ठसंख्या : ६८४
किंमत : रुपये ३९५
(पण ऑनलाईन मागवल्यास सवलतीत २१० ते २३० पर्यंत  मिळून जाते)


शपथ वायुपुत्रांची कालच वाचून झाले. मला तरी शिवा ट्रिलॉजी आवडली. मूळ कथानक केंद्र स्थानी ठेवून मी वाचत असल्यामुळे आणि तांत्रिक, भाषिक, मुद्रण, अनुवाद अशा चुकांकडे दुर्लक्ष करु शकल्यामुळे कथानकाचा खूप मस्तपणे आनंद घेता आला. वायुपुत्रांची शपथ या तिसर्‍या आणि शेवटच्या भागाचा आत्मा दोन प्रमुख गोष्टींत आहे
१. कथानकाची लयबद्धता आणि
२. सती
 या व्यतिरिक्त शिव, गणेश, कार्तिकेय, भगीरथ, भृगू, पाशुपतास्त्राची प्राप्ती, अज्ञात मारेकरी, मेलुहाचा सेनापति इत्यादी प्रमुख गोष्टी आहेतच. तरीही कथानकाचा आत्मा व्यापला आहे तो याच २ गोष्टींनी 

सती चे पात्र प्रचंड ताकदीने या भागांत रंगवले गेले आहे. तसे ते सुरुवातीपासूनच होते. पण तिसर्‍या भागाच्या वाचनानंतर मनात काही उरत असेल तर ते शिव नसून सती. हे पात्र खूप ताकदीने रंगवले गेले आहे पण त्यामुळे शिवा ट्रिलॉजीच्या शेवटी शिव कमी उरतो.
माझ्यामते 'शपथ वायुपुत्रांची' च्या उणीवा व बलस्थाने अशी आहेत :
बलस्थाने:
१. सती
२. कार्तिकेयाने केलेला शत्रुचा संहार छान रंगवलेला आहे
३. तोच संहारक कार्तिकेय नंतर संयमी दाखवला आहे
४. कथानकाची सुसुत्रता आणि लयबद्धता
५. शिवाचे प्रभावी निर्णय आणि व्यक्तीमत्त्व
६. सतीचा निष्णात मारेकर्‍यांशी झालेला लढा. हे प्रकरण विशेष प्रभावित करते.
उणीवा:
१. शपथ वायुपुत्रांची हे शीर्षक असलेल्या भागात वायुपुत्रांचा प्रभावच जाणवत नाही.
२. पाशुपत्य अस्त्राची न समजणारी माहिती देऊन उगाच गोंधळ वाढवला आहे
३. शिव हा शीघ्रकोपी आणि संहारक अशी त्याची पुराणांतली प्रतिमा आहे असे असताना मेलुहाची राजधानी देवगिरी व त्यातील सर्व सैनिकांचा व मेलुहावासीयांचा संहार अतिशय संथपणे वेळ देऊन केलेला दाखवला आहे. बर हे फिक्शन आहे हे माहिती असूनही पुढे त्यानंतरच्या प्रकरणांत पुराणांतील कथांशी नाळ जोडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो तोकडा पडला आहे. असा शेवट उरकण्यापेक्षा कथानक स्वरुपातच शेवट दाखवला असता तर अधिक प्रभावी ठरला असता.
पहिल्या पुस्तकापासून शेवटच्या भागापर्यंत लेखकाने कथानकातील लयबद्धता टिकवली असल्याने आणि धक्का तंत्राचा बर्‍यापैकी यशस्वी वापर केला असल्यामुळे ही मालिका वाचनीय आहे हे नक्की.

सध्या व्यस्ततेमुळे थोडक्यात लिहिले आहे. पुढेमागे पूर्ण तिन्ही भागांवर (शिवा ट्रिलॉजीवर ) सविस्तर एक लेख लिहीन.

धन्यवाद,
- सागर

Tuesday, May 27, 2014

आगामी परिक्षणे

नमस्कार मित्रांनो,

खूप दिवसांत मी पुस्तकांवर लेखन केलेले नव्हते. कारण वाचनच कमी झाले होते.
यापुढे मात्र नियमित लेखन करणार आहे.

लवकरच मी पुढील पुस्तकांची परिक्षणे वा परिचय टाकेन.

१. वायुपुत्रांची शपथ (अथवा शिवा ट्रिलॉजी ) - पहिल्या भागावर मी एक परिक्षण लिहिले आहेच. पण शेवटचा भाग सध्या वाचतो आहे. त्यामुळे या शेवटच्या भागावर आणि संपूर्ण मालिकेवर एक लेख लवकरच लिहिन

२. शशी भागवत लिखित मर्मभेद या अत्भुतरम्य कादंबरीची समीक्षा

३, गर्जा महाराष्ट्र - सदानंद मोरे

४. हिरण्यदुर्ग - संजय सोनवणी - ही अत्भुतरम्य कादंबरी या महिन्यात प्रकाशित होणार आहे. पहिल्या काही प्रतींपैकी एक प्रत मला मिळणार आहे. आणि अत्भुतरम्य कादंबरी हा माझा तसाही जिव्हाळ्याचा विषय आहे. तेव्हा या कादंबरीचे परिक्षण नक्की

५. पानिपत असे घडले - संजय क्षीरसागर (समीक्षा)

६. कोटास - विज्ञान कादंबरी - लेखक - शैलेन्द्र काळे

७. कथासरित्सागर - १ ते ५ खंड (ह. अ. भावे आणि दुर्गा भागवत) (यावर सविस्तर समीक्षा करण्याचा मानस आहे. या ५ खंडांसाठी वापरण्यात आलेले मूळ स्त्रोत मी मिळवले आहेत. व त्यांचाही अभ्यास लवकरच सुरु करेन. व एकेक खंडावर समीक्षा लिहिन.

८. अधून मधून सुहास शिरवळकर , संजय सोनवणी, सदानंद मोरे, शेषराव मोरे, गुरुनाथ नाईक, नरहर कुरुंदकर, या प्रतिथयश व मान्यवर लेखकांची पुस्तके व मधुकर रामटेके यांचे आम्ही मडिया देखील वाचणार आहे. पुस्तक वाचले की त्याचे परिक्षण टाकत जाईन.

धन्यवाद,
-सागर