Tuesday, January 17, 2012

जी.ए.कुलकर्णींचा काळीज हेलावणारा "निरोप"काही महिन्यांपूर्वीच मी जी.एं.चे 'कुसुमगुंजा' हे पुस्तक वाचले होते.
बाकी सर्व कथा फारश्या स्मरणात राहिल्या नाहीत याचे प्रमुख कारण म्हणजे पुस्तकाच्या शेवटी जी.ए.कुलकर्णी यांनी घेतलेला "निरोप".
अवघं दीड पान, पण काळीज हेलावून टाकतं.
या 'निरोपा'चं वैशिष्ट्य म्हणजे जी.एं.च्या आवाजात त्यांनी त्यांच्या मृत्युबद्दलचे विचार व्यक्त केले होते. त्या ध्वनिफितीवरुन हा 'निरोप' घेऊन 'कुसुमगुंजा' या पुस्तकात समाविष्ट केला गेला होता.

"निरोप" किती काळीज कापणारा आहे हे वाचा जी.एं.च्याच शब्दांत -

सीमा ओलांडून पलीकडे जाण्याची वेळ येत आहे. पण मला नेण्यासाठी पताका लावलेला रथ येणार नाही. मी जात असता तुतारी निनादावी अगर मला येताना पाहून चौघडे वाजू लागावेत असे काही भव्य मी निर्माण केले नाही. मी लावलेल्या रोपट्यांचे आकाशस्पर्शी देवदार झाले नाहीत, की माझ्या शब्दांनी दिव्यत्वाशी नाते जोडणारे महाकाव्य निर्माण झाले नाही. येथे माझ्यासाठी महाद्वार उघडले जाणार नाही. माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे. परंतु माझ्यासाठी लहान दिंडी उघडणाऱ्या द्वारपालांनो, मी हीन-दीन दरिद्री होऊन तुमच्याकडे आलो नाही, ही गोष्ट ध्यानात असू द्या. सर्वत्र पसरलेल्या जळजळीत सूर्यप्रकाशात, क्षणभर तरी का होईना, मी माझा स्वतःचा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेची एक गोकुळसरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिली आहे. येत असताना माझे हात रिकामे दिसले तरी ते रिते नाहीत. त्यांच्या बोटांना मारव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेताना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांचा एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे. मी एक क्षुद्र याचक म्हणून येथे येत नाही. मी माझ्या पायभार खेड्यासाठी विनादैन्य येथे पाऊल टाकत आहे.

म्हणून द्वारपालांनो, माझ्यासाठी दिंडी उघडताना तुमच्या वागण्यात थोडी नम्रता असू दे. तुमच्या शब्दात थोडा आदर दिसू दे. कारण धुळीने भरलेल्या अनवाणी पण रोख पावलांनी मी येथे येत आहे. आता मी निघालो आहे म्हणून हे कालपुरुषा, तू मला स्वच्छ निरंजन मनाने निरोप दे. तू माझ्यापासून खूप हिरावून घेतलेस. माझ्या आशा, माझी स्वप्ने, माझी आवडती माणसे तू माझ्याकडून लुबाडून घेतलीस, आणि मला निर्दयपणे दरिद्री केलेस. त्यामुळे मी तुझ्यावर अनेकदा संतापलो, द्वेषाने जळत राहिलो हे खरे आहे. पण त्याचा कसलाही सल आता मनात ठेवू नकोस. आता निघण्याच्या क्षणी तर माझ्या मनात कसलेच वैषम्य उरले नाही. शिवाय पूर्वी देखील मी उगाचच तुझा द्वेष केला, ही जाणीव आता मला झाली आहे. मला जे सुख मिळाले ते तुझा माझ्यावर विशेष लोभ होता म्हणून नव्हे, त्याचप्रमाणे ज्या यातना मला भोगाव्या लागल्या त्या देखील तुझा माझ्यावर राग होता म्हणून नव्हे. मी तुझ्यासमोर असाहाय्य होतो, पण तू देखील एका अविरतपणे फिरणाऱ्या चक्राला बांधलेला असल्यामुळे असाहाय्य होतास. त्या त्या गोष्टी तू घडविल्या नाहीस, त्या गोष्टी तुझ्याकडून घडवल्या गेल्या. दर क्षणाला अनंत बुडबुडे नष्ट होतात, त्यामुळे प्रवाहात काही रितेपणा येत नाही.

तर एक विशेष ध्यानात घे. जीवन इतके अनंतरुप आहे की अगदी संपूर्णपणे माझ्यासारखेच आयुष्य असलेला माणूस पूर्वी कधी झाला नाही व पुन्हा कधी होणार नाही. त्या दृष्टीने प्रत्येक सामान्य माणूस देखील अद्वितीय असतो. मी गेल्यानंतर एक अव्दितीय भावविश्व पूर्णपणे विरुन जाणार आहे. ते पुन्हा कधी जन्मणार नाही. तेव्हा त्याला निरोप देताना तुझा मनात आता कसलीही कसर ठेवू नकोस. मी येथून कोठे जाणार ते मला माहीत नाही. मी कदाचित शून्यातून शून्य होऊन जाईल किंवा इथल्यापेक्षा जास्त अर्थपूर्ण आणि सुसंगत अशा ठिकाणी जाईन. त्या ठिकाणी एक तर तुला येता येणार नाही किंवा तू आलास काय, नाही आलास काय, याला 'आला वारा गेला वारा' यापेक्षा जास्त अर्थ आणि साफल्य असणार नाही. मी पुन्हा या वाटेने कधी येणार नाही. म्हणजे ही आपली शेवटची भेट आहे.

काही झाले तरी माझ्या आयुष्यभर तू सांगाती सहप्रवास केलास. आता आपले मार्ग निराळे होत आहेत. अशा या अंतिम क्षणी तू मला मुक्त मनाने निरोप दे. कारण आता मी निघालो आहे. मला स्वच्छ निरंजन मनाने निरोप दे.

- जी.ए.कुलकर्णी
"कुसुमगुंजा"तून "निरोप"