Wednesday, February 16, 2011

संक्षिप्त आवृत्त्या - मराठी साहित्याला लागलेली एक कीड


अलिकडेच मी काही जुनी पुस्तके नव्याने छापून बाजारात आली म्हणून उत्साहाच्या भरात विकत घेतली.
मी खरेदी करताना एकतर ऑनलाईन किंवा फोनवरुन ऑर्डर देऊन इकडे बंगळूरात मागवतो. अशा वेळी हा धोका लक्षात येत नाही. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेतल्यावर किमान कळते तरी की हातात काय कलाकृती आली आहे ते. असो पण मुद्दा तो नाहिये.
मुळात कोणत्याही कादंबरीचा अथवा पुस्तकाचा संक्षेप करणे हे योग्य आहे की अयोग्य?
माझ्यामते तरी कोणत्याही साहित्यकृतीचा दुसर्‍या लेखकाने संक्षेप करणे ही प्रचंड आक्षेपार्ह बाब आहे आणि संक्षिप्त आवृत्त्या या मराठी साहित्याला लागलेली ही कीड आहे.
मी स्वतःच तीन उदाहरणे पाहिली आहेत. अजून किती असतील आणि किती येणार आहेत ते प्रकाशकांनाच ठाऊक.
नाथमाधवांसारख्या प्रतिभावान लेखकाने छत्रपति शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या स्वराज्य मालिकेतील ७-८ पुस्तके असो. किंवा हरि नारायण आपटेंचे 'चंद्रगुप्त' हे पुस्तक असो किंवा मग भा.रा. भागवतांनी ज्यूल्स व्हर्नच्या कथा मराठीत अनुवादीत केल्या तो २० पुस्तकांचा संच असो.
प्रकाशकांनी नाव मूळ लेखकाचे वापरायचे व आत कोठेतरी संक्षेप केलेल्या लेखकाचे नाव द्यायचे याला बाजारू वृत्ती नाही तर काय म्हणावे? मराठी माणसाच्या हातात पैसा खेळू लागला आणि तो पुस्तके विकत घेऊन वाचू लागला म्हणजे त्याच्या हातात सुंदर कलाकृती विकृत करुन द्यायचा हक्क तुम्हाला कोणी दिला? ज्याने रसनिर्मिती केली त्या लेखकाच्या कलाकृतीचे मूल्यमापन त्या लेखकापेक्षा जास्त दुसरे कोण करु शकेन?
भा. रा. भागवतांनी ज्यूल्स व्हर्नच्या सुंदर वैज्ञानिक कथांचा सुरस अनुवाद मराठीत २० पुस्तकांच्या संचाच्या रुपाने आणला होता. मुळात ही पुस्तके लहान आकाराचीच होती, त्यांचाही संक्षेप करण्याचे प्रयोजन ना प्रकाशकांनी दिले ना संक्षेप करणार्‍या लेखकाने. भा.रा. भागवतांनी बाल-कुमार वयोगटाला समोर ठेवून जी साहित्य निर्मिती केली त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. भागवतांचे बाल-कुमार वयोगटाला मोहून टाकण्याचे कौशल्य त्या कधीही नाव न ऐकलेल्या लेखकाकडे आहे की नाही हे कोण ठरवणार? संक्षेप करणारे लेखक पात्रतेने आणि योग्यतेने महान असतीलही. पण म्हणून दुसर्‍या लेखकाची साहित्यकृती विद्रूप करुन वाचकांना देणे हा अक्षम्य अपराध आहे.
तीच गोष्ट ह.ना.आपटे यांच्या चंद्रगुप्त या कादंबरीची. हिंदी अनुवाद आजही विकत घेण्यासाठी उपलब्ध आहे. पण मराठीत मात्र हे सुंदर पुस्तक बाजारात मिळत नाही. सध्या मिळते आहे ते केवळ ३०-३५ पानांचे पुस्तक. जे बाल वयोगटातील वाचकांना समोर ठेवून संक्षेप केलेले आहे.
आपण वेळीच या संक्षिप्त आवृत्त्यांच्या किडीवर उपाय नाही केला तर उद्या नाथमाधवांची वीरधवल अवघ्या ८०-१०० पानांत बघावयास मिळेल. छावा १००-१५० पानांत दिसेन. जी एंची अनेक पुस्तके एकत्र संक्षिप्त मिळतील. यापुढे कल्पनाच करु इच्छीत नाही.
एखाद्या कादंबरीचा रस त्यातील वर्णनांतून वाचकाला लेखक आपल्या शैलीतून एका वेगळ्या स्वप्न-विश्वात नेतो. विबिध वर्णनांनी वाचकाचे भावविश्व निर्माण होते. साहित्याच्या सौंदर्याचा हा आत्माच या संक्षिप्त आवृत्त्या मलीन करतात.
संक्षेपात वातावरणनिर्मितीला तडा जातो हा मुख्य भाग आहे. तसेही एखादे मोठे पुस्तक वाचताना आपल्याला नको तो भाग वगळण्याचे...न वाचण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असतेच की... पण आपल्याला (वाचकाला) पुस्तकातील कोणता भाग नको आहे हे दुसर्‍या कोणी ठरवावे हे मला वाटते कोणालाही मान्य नसावे. मूळ कलाकृतीतील नको तो भाग वगळण्याचे स्वातंत्र्य केवळ वाचकाच्याच हातात असावे असे माझे मत आहे. सार वाचण्यासाठी संक्षिप्त आवृत्त्यांचा उपयोग होईलच की. त्याने हे केले तो तिथे गेला, त्याला ती भेटली, त्याने युद्ध केले अशा संक्षेपानेदेखील कथानक कळतेच की. पण वाचन करताना रसस्वाद भंग होतो त्याचे काय?
उदाहरणादाखल, चंद्रगुप्त या ह.ना.आपटेंच्या सुंदर कादंबरीचा ज्या बाल वयोगटातील मुलांसाठी संक्षेप केला गेलाय, त्या पुस्तकात पहिल्या ३ पानांत ह.ना.आपटेंनी वातावरणनिर्मितीसाठी रचलेले वर्णन जसेच्या तसे दिलेले आहे, आणि पुढील संक्षेप घाईघाईत उरकला गेला आहे. जी रसमाधुरी मोठ्या कादंबर्‍यांतून असते ती संक्षेपात खास करुन लहान वयोगटातील वाचकांना लक्ष्य करुन देऊन उपयोग काहीच नाही. कारण ती रसमाधुरी दीर्घपल्ल्याच्या कादंबरीसाठी निर्माण केली गेली होती.
केवळ चांदण्या रात्री अमके तमके झाले असे पण संक्षेपात झाले असतेच की.
संक्षेपात मूळ कलाकृतीचे सौंदर्य लोपते यावर माझा जास्त आक्षेप आहे. संक्षेप योग्य असता तर लेखकानेच तो भाग कशाला लिहिला असता?
अर्थात काय आवडावे काय न आवडावे हा सर्वस्वी वैयक्तीक अनुभवावर आधारीत भाग आहे. पण साहित्यसौंदर्य लोपेल अशा संक्षिप्त आवृत्त्या फोफावू लागल्या तर लोक वाचनातील जी रसमाधुरी आहे तीच विसरुन जातील. मग वाचन हे यांत्रिक होईल.
एक सुंदर विचार येथे आठवतो आहे तो देतो आणि थांबतो
कोणतेही व्यसन केव्हा सुटते???? ................. व्यसन लागण्याआधी....
तद्वतच साहित्यसौंदर्य जपायचे असेन तर ते ....कीड लागण्याआधीच जपले पाहिजे.....
संक्षेपाची सुरुवात एकदा मान्य झाली की केव्हा त्यामुळे साहित्यसौंदर्य केव्हा पोखरले गेले ते कळणार पण नाही.
वेळीच आवरले नाही तर ही संक्षिप्त आवृत्त्यांची कीड पसरायला वेळ नाही लागणार.....
*** सर्व लेखकांना, प्रकाशकांना विनंती की अशा प्रकारची संक्षिप्त आवृत्त्यांची कीड मराठी साहित्यात आणू नका ***

*** सर्व पुस्तकप्रेमींनी संक्षिप्त आवृत्यांवर बहिष्कार टाकणे हे एकमेव शस्त्र वाचकांच्या हातात आहे. तेव्हा सर्व वाचकांनी संक्षिप्त आवृत्ती दिसली की ती घेऊच नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. ***

Saturday, February 5, 2011

२००० ते २०१० या दशकातील मला आवडलेल्या पुस्तकांची यादी


विचार न करता पहिली सहा लगेच डोळ्यांसमोर आली, व बाकीची शोधावी लागली. त्यात अनुवादीत पुस्तके जास्त आहेत याचा नक्कीच खेद आहे मला. पण ही वस्तुस्थिती आहे. बहुतेक अजून ५-६ महिन्यांनी मला मागील दशकातील पुस्तके जास्त अधिकाराने देता येतील.
२००० ते २०१० या दशकातील मला आवडलेल्या पुस्तकांची यादी

१. प्रतिस्पर्धी - किरण नगरकर (ककल्ड चा अनुवाद) - रेखा सबनीस - पहिली आवृत्ती : २००८
२. ब्र - कविता महाजन - पहिली आवृत्ती : मे २००५


३.१ अभयारण्य - डॉ. जयंत नारळीकर - (पहिली आवृत्ती : २००२ )

३.२ व्हायरस - डॉ. जयंत नारळीकर


४. पूर्वांचल - अविनाश बिनिवाले (जबरदस्त आणि प्रत्येकाने वाचावे असेच पुस्तक)


५. दा विंची कोड - डॅन ब्राऊन - अनु: अजित ठाकूर


६. एन्जेल्स अ‍ॅन्ड डेमन्स - डॅन ब्राऊन - अनु: बाळ भागवत
७. द अल्केमिस्ट - पाओलो कोएलो - अनु: नितीन कोत्तापल्ले


८. नभात हसरे तारे - जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, अजित केंभावी


९. कालगणना - मोहन आपटे


१०.किमयागार - अच्युत गोडबोले.


११.साधनामस्त - जगन्नाथ कुंटेअजून वाचले नाहीत पण २००० - २०१० या दशकातील सर्वोत्तम माझ्या यादीत नक्की आले असते याची खात्री असल्याने ही पण यादी देतो आहे.
१. शाळा - मिलिंद बोकील
२. बारोमास - सदानंद देशमुख
३. आदिबंध - बापू करंदीकर
४. नांगरल्याविण भुई - नंदा खरे
५. उर्जेच्या शोधात - प्रियदर्शनी कर्वे
६. प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
७. समिधा - साधना आमटेFriday, February 4, 2011

पुस्तक परिचय : "असूरवेद" - संजय सोनवणी

नुकतेच 'असूरवेद' ही कादंबरी वाचून संपवली. हो संपवली म्हणजे हातातली कामे बाजूला ठेवून प्रसंगी टाळून ही कादंबरी संपवली इतकी ती ओघवती कादंबरी आहे. पण फक्त ओघवती कादंबरी आहे म्हणून मी 'असूरवेद' बद्दल लिहित नाहिये. तर या कादंबरीने मला एक सखोल चिंतन करण्यास भाग पाडले म्हणूनही मी या आगळ्या वेगळ्या कादंबरीबद्दल लिहित आहे. संजय सोनवणी हे तसे वादग्रस्त लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. पण या कादंबरीद्वारे त्यांनी कादंबरी लेखनात एक क्रांतिकारी पायंडा पाडला आहे. सर्वमान्य जे आहे त्यापेक्षा स्वतः संशोधन करुन जे निष्कर्ष काढले आहेत (त्यावर त्यांनी स्वतंत्र पुस्तके देखील लिहिली आहेतच) त्याआधारे कादंबरी रचण्याचा प्रयोग करणे हा एक धाडसी प्रयोगच म्हणावा लागेल. कारण कादंबरी चे रुप सर्वसामान्य जनतेच्या मनावर जेवढी पकड घेते तेवढी पकड संशोधनात्मक ग्रंथ घेत नाहीत हे खेदाने म्हणावे लागेल. याचे कारण सर्वसामान्य वाचकवर्ग कादंबरी, कथा व कविता या साहित्यप्रकारांत जेवढा रमतो तेवढा संशोधनग्रंथ, पुरातत्त्व विद्या यासारख्या विषयांत रस असल्याशिवाय अशी पुस्तके हातातही घेत नाही.
असूरवेद या कादंबरीतून वैदिक कालीन इतिहासाची रंजक प्रकारे मांडणी करुन लेखकाने वाचकांमध्ये या काळातील सर्व ग्रंथांचे मूल स्वरुप समजून घेण्याची जिज्ञासा जागृत केली आहे.   प्राचीन काळी सर्वमान्य असलेले चारच वेद अस्तित्त्वात नव्हते तर त्यांना वेदांचे स्वरुप कसे आले आणि त्याकाळी कित्येक ग्रंथ सामग्री उपलब्ध होती. व कोणत्या कारणांसाठी अनेक पुरातन धर्मग्रंथांचा नाश केला गेला? असे अनेक प्रश्न मनांत उभे राहतात. त्यासाठी ही धार्मिक थरारकथा अवश्य वाचायला हवी

सर्वसामान्य वाचकच नव्हे तर सर्व प्रकारच्या वाचकांना समोर ठेवून संजय सोनवणी यांनी असुरवेद ही सुंदर कादंबरी देताना वाचकांना एका मागोमाग एक परंपरागत समजुतींना धक्के देतानाच एक सखोल चिंतनही करायला लावतात. आणि मला वाटते की हेच या कादंबरीचे खरे यश आहे. धर्माने उभ्या केलेल्या जातियवादाच्या भिंती देखील 'असूरवेद' मधून साकारलेल्या प्रमुख पात्रांच्या  माध्यमातून तोडायचे धाडस लेखक संजय सोनवणी यांनी केलेले आहे. यासाठी त्यांची प्रशंसा जरुर केली पाहिजे