एवढ्यांतच दुर्गाबाई भागवत यांचे 'पैस' वाचले. त्यानिमित्ताने वाचकांना थोडीशी ओळख करुन द्यायचा हा प्रयत्न. एकूण १३ ललित लेखांचा हा संग्रह. कोणतेही पान उघडावे आणि वाचावे असा. पण प्रत्येक प्रकरण वाचकाला एका वेगळ्याच विश्वात नेऊन सोडते. उदाहरणापुरता 'पैस' मधील एक उतारा देतो आहे. हा उतारा 'द्वारकेचा राणा' या पाचव्या लेखातला आहे. त्यावरुन दुर्गाबाई भागवतांनी 'पैस' ला दिलेली खोली लक्षात यावी.
उतारा :
श्रीकृष्णाने उत्तर दिले - हसतहसत उत्तर दिले, "खरे आहे तुमचे म्हणणे. पण शंकर वर देतो नि त्यातून उत्पात झाले की मलाच ते निस्तरावे लागतात ना? मोहिनीचे रुप मी का घेतले? मी माझ्या भक्तांना सुख देत नाही. दु:ख देतो. दारिद्र्य देतो. मुद्दामच करतो मी ते. पराभक्तीचे सुख मानवमात्राला मिळावे, मला भक्ताशी एकरुप होण्याचे भाग्य मिळावे, म्हणून मी तसे करतो. तिळभर जरी आशा माझ्या भक्ताला राहिली तरी मी ती मोडतो. त्याला निराश करणे मला आवडते. कारण, निराशेची शीग गाठल्याशिवाय, ऐहिक वासना मेल्याशिवाय परमसुखाचा कोंबही कुठे रुजत नाही. ऐहिक सुख हा मी आणि माझे भक्त यांच्यामधला अंतराय आहे; तो मी दूर करतो. माझ्या भक्तांना निर्वाणीच्या घडीला, आर्त झाल्यावर, माझ्याशिवाय अन्य आसरा राहू नये म्हणून मी फार जागरुक असतो. म्हणूनच दु:खांची पेरणी करुन मी त्याला दुखावतो नि टोचून, तापवून माझ्याकडे वळवतो. एकदा माझ्याकडे आल्यावर नि माझ्याशी तद्रूप झाल्यावर ही दु:खे, ही दैन्ये, हे क्लेश मिटतात. कायमचे मिटतात. तिथून सुख फुटते."
'पैस' या ललित लेखांच्या संग्रहातील लेख या आधी मौज, साधना, केदार, सत्यकथा इत्यादी मासिकांतून आधी प्रकाशित झालेले होते. दुर्गाबाई भागवत या एक विदुषी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे प्रत्येक कार्य सखोलपणे केलेले असते. दुर्गाबाईंच्या प्रदीर्घ प्रस्तावनांमुळेही अनेक वाचकांना त्या माहिती आहेत. 'पैस' या ललित पुस्तकात जे दुर्गाबाईंचे निवडक लेख निवडले आहेत तो एक वेगळाच आस्वाद आहे. सर्व लेख एका खास साच्यातले आहेत त्यामुळे कोणतेही प्रकरण वाचले तरी पुस्तक वाचनाचा निखळ आनंद घेता येतो.
"गोदावरी आणि प्रवरा ... या दोन नद्यांमधल्या एका लहानशा भागातल्या, अती साध्या गावात एक अद्भुत प्रतीक आहे. खांबाचे .... खांब, तोही ओबडधोबड आणि लहानखुरा .... पण त्या खांबावरचा एक अदृश्य भाग एका समाधिस्त जीवाला त्याच्या जीवनावधीतच भासमान झाला. तो भाग - चारी क्षितिजांना भेदून आरपार जाणारा, आकाशालाही उंच ओढून त्याच्या वर, थेट चैतंन्याच्या बेंबीला भिडणारा भाग - त्या दोन डोळ्यांनी अक्षरश: पाहिला. त्याला त्या साक्षात्कारी युवकाने 'पैस' असे नाव दिले. अजूनही ज्ञानेश्वरी वाचा की त्या खांबाच्या वर पैसाचा पारदर्शक पिसारा उभारलेला तुम्हाला दिसेल. म्हणून या खांबाचे नाव 'पैसाचा खांब' .... यालाच टेकून ज्ञानोबाने पैसाची मर्यादा पाहिली, काल व अवकाश यांची सीमारेषा जोखली आणि मानवाच्या अंत:स्थ गहनतेची अमर्यादिता अनुभवली. खोली आणि उंची, रहस्य आणि खुलेपणा, गूढ व प्रांजळ, वेदना व सुख, मृत्यू आणि जीवन, भोळेपणा व ज्ञान यांतले ऐक्य टिपले..." अशी 'पैस' ची भूमिका दुर्गाबाई स्पष्ट करतात.
'पैस' मध्ये एकूण १३ लेख आहेत. वर मी दिलेला उतारा 'द्वारकेचा राणा' या कृष्णावर आधारीत प्रकरणातला असला तरी,पंढरीचा विठोबा', 'ख्रिस्त-संगत', 'बुद्ध-प्रलोभन' अशी शीर्षके वाचकाला चक्रावून टाकण्यासाठी पुरेशी आहेत.
दुर्गाबाईंनी त्यांच्या खास ठेवणीच्या शैलीत प्रत्येक प्रकरणात जी शब्दांची पेरणी केली आहे ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. ललित लेखन वाचताना दुर्गाबाई आपल्याला एका वेगळ्याच उंचीवरचे तत्त्वज्ञानही देतात.
'पैस' बद्दल अजून काय लिहावे? शब्दांत त्याची गोडी वर्णन करण्यापेक्षा 'पैस' हा एक अनुभुतिचा भाग आहे.
ललित वाचनाचा निखळ आनंद असे मी दुर्गाबाई भागवत यांच्या 'पैस' चे वर्णन करेन. 'पैस' या पुस्तकासाठी दुर्गा भागवत यांना १९७१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे.
तेव्हा वाचकांनो पैस अवश्य वाचा आणि कसे वाटले ते नक्की सांगा
आपल्या प्रदीर्घ, विद्वत्तेने भरलेल्या, साध्या सरळ शब्दांत व अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रस्तावना लिहिणार्या दुर्गा भागवत यांना मी आदराने प्रस्तावनाबाई म्हणतो. दुर्गाबाईंची प्रत्येक प्रस्तावना वाचनीय असते. त्यांनी लिहिलेल्या कित्येक पुस्तकांच्या प्रस्तावना प्रसिद्ध आहेत. ब.रा.हिवरगांवकर यांच्या कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथाची प्रस्तावना, कथासरित्सागराला दिलेली प्रस्तावना व त्यांच्या अशा अनेक प्रस्तावना प्रसिद्ध आहेत. दुर्गाबाईंची ग्रंथसंपदा मोजकी असली तरी त्यांचे प्रत्येक पुस्तक म्हणजे एक सुखाची अनुभूति असते.
धन्यवाद,
सागर
दुर्गा भागवत यांचे इतर वाचनीय साहित्यः
व्यासपर्व
ऋतुचक्र
डूब
भावमुद्रा
रुपरंग
लोकसाहित्याची रुपरेषा
बाणाची कादंबरी
रसमयी
कदंब
दुपानी
No comments:
Post a Comment