Saturday, November 12, 2011

ज्वाला आणि फुले : एक जळजळीत काव्यसंग्रह

मित्रांनो,
४-५ दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. अर्धवटरावांना मी बंगळूरात एका संध्याकाळी भेटलो होतो. अर्ध्याचे ऑफिस काही केल्या सापडत नव्हते. दोन वेळा एकाच सिग्नलवरुन यू टर्न उपलब्ध नसताना पोलिसाच्या समोर गाडी दोन वेळा वळवून नेली होती. नशीब माझे पोलिसाची माझ्याकडे वक्रदॄष्टी नाही गेली. नंतर लक्षात आले की आपण चुकीचा यू टर्न घेत होतो. एक सिग्नल क्रॉस करायचे विसरलोच होतो . शेवटी आमची ती ऐतिहासिक भेट एकदाची झाली. अर्धवटरावांनी आमचे दर्शन होताच झुकून मुजराच केला. आधी कळालेच नाही की अर्ध्याने भर रस्त्यात मला मुजरा का केला. नंतर त्याने किस्सा सांगितला. बाबासाहेब पुरंदरे पहिल्यांदा ज्यांना भेटतात त्यांना असाच मुजरा करतात. शेवटी ती ऐतिहासिक भेट थोडक्यात आटोपून आम्ही पोटाच्या गरजेवर आलो. आम्ही दोघे शुद्ध शाकाहारी भोजनवेडे, तेव्हा पोटावर ताव मारण्यासाठी आम्ही कोरमंगलातील बार्बिक्यू नेशन्स मधे गेलो. इकडच्या तिकडच्या अनेक विषयांवरच्या गप्पा आम्ही मारल्या. आम्ही दोघे पुस्तकवेडे तेव्हा आमच्या दोघांच्या चर्चेत पुस्तकांचा विषय नसता तर नवलच होते.

माझा हा मित्र प्रचंड काव्यप्रेमी. उगाच तो स्वतःला अर्धवट म्हणवून घेतो. कित्येक कविता तर मुखोद्गत आहेत त्याला. साला इथे मला मी केलेल्या कविता पण लक्षात रहात नाहीत . अर्ध्यासारखी सरस्वती मला कधी प्रसन्न होणार???... तर बोलता बोलता विषय कवितांकडे वळाला. अनेक गाजलेल्या कवी आणि काव्यसंग्रह यांची चर्चा चालू असताना त्याने अचानकच बॉम्ब फोडला.मला विचारले तू बाबा आमटेंचे ज्वाला आणि फुले वाचले असशीलच. मी म्हणालो - नाही
त्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसलाच (खरे तर मनातून उखडला असावा - नंतर ती प्रतिक्षिप्त क्रिया किती योग्य होती ते मला नंतर कविता त्याच्या तोंडून ऐकल्यावरच पटली) . त्याला कारण माझे पुस्तकप्रेम आणि कविताप्रेम दोन्ही माहिती होते. तेव्हा अर्ध्याने त्या कवितासंग्रहातील एक कविता (जी त्याला मुखोद्गत होती) ती म्हणून दाखवली. त्यातील सोप्या, प्रचंड परिणाम साधणार्‍या आणि हृदयाला स्पर्श करणार्‍या अकृत्रिम शब्दांतून जो भाव प्रकट होत होता ते पाहून मलाच आश्चर्य वाटले. एवढी सुंदर कविता असलेला काव्यसंग्रह किती सुंदर असेल?

अर्ध्या पुढच्या वेळी बंगळूरात येईल तेव्हा हे पुस्तक माझ्यासाठी घेऊन येणार आहे.
आमची चर्चा संपली. तो त्याच्या मार्गाने गेला मी घरी आलो तरीसुद्धा मला राहवले नाही.
गेले २ दिवस मायाजालावर हे पुस्तक वा त्यातील कविता शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून ३ कविता सापडल्या. पण त्यातील एका कवितेने मला एवढे हादरवून सोडले की अशा दर्ज्याच्या कविता असलेला हा अत्भुत कवितासंग्रह प्रत्येक कविताप्रेमीकडे असावा - किमान या अप्रतिम कवितासंग्रहाची माहिती व्हावी - या हेतूने हे लेखन करतो आहे.

तर बाबा आमटे यांची "ज्वाला आणि फुले" संग्रहातील पुढील कविताच बोलकी आहे तेव्हा माझे शब्द इथे आवरते घेतो व कविता देतो.

शब्दसामर्थ्य जरुर पहा या कवितेतले.

======================
कवितेचे नाव : श्रम - सरितेच्या तीरावर
======================
वाल्मिकीच्या करुणेच्या काठाने वाटचाल करीत
निर्वेदाचे टोक गाठले.
कालिदासाने गिरिशिखरांवर वाकलेली शृंगार - मेघांची दाटी पाहिली
भूपालांच्या विजयवाहिनीसह युद्धघोष करीत
वीररसांच्या भाटांचे बेभान तांडेही निघाले
भाबड्या भक्तीचे पानमळेही अमाप फुलले
पण श्रम - सरितेच्या तीरावर आपल्या गीतांचे कलश भरण्यासाठी
कोणीच कसे आले नाही?
सांदीपनीच्या आश्रमात सुगंधाचे अद्भुत फुललेले ज्याने पाहिले
त्याला स्वेद - रसाची पुसट जाण असल्याची नोंद मात्र आहे.

निळ्या नदीच्या किनार्‍यावरील वाळूच्या अफाट सपाटीवर
पाषाणांचे उत्तुंग त्रिकोन उभारता उभारता
लक्षावधी छात्या रक्तबंबाळ झाल्या
मरणासाठी बादशाही बिळे बांधता बांधता
असंख्य जीवनांचा अंत झाला
ज्यांनी चिरे मस्तकावर वाहिले
ते चिर्‍यांच्या फटीफटीतून निःशब्द चिनले गेले
पण मृत्यूच्या वस्तीतही आपल्या वासनांची लक्तरे वाहून नेणारे
त्या बिळात अजून कायम आहेत!

चौदा प्रेमांचा चोथा करणार्‍या समआटाचे तकलूपी अश्रू
ज्यांनी पत्थरांतून चिरंतन केले
त्यांच्या आटलेल्या रक्ताची दखल
दरबारी भाटांनी घेतल्याचे ऐकिवात नाही!
बिगारीत बांधलेले मनोरे छातीवर जे घेऊन कोसळले
त्यांचे मृत्यू लेख अजून इतिहासाने वाचलेले नाहीत!
कलेचे वस्त्र बिनदिक्कत फेडणार्‍या
आणि प्रतिभेच्या हाटात रसांचा घाऊक सौदा करणार्‍या
भूपालांचा आणि सुलतानांचा काळ संपला!
आणि जिची वाट पाहिली जात होती ती पहाट
आज उंबरठ्यावर आहे
श्रमपालांच्या युगांतील स्वेद - रसांच्या साधनेसाठी
प्रज्ञेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे!

संथ नाजुक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे
मस्तकावर पाट्या वाहणार्‍या स्वेदगंधेच्या डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावाणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्‍याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे

भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्^न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत

भूमीच्या गर्भातून काळे सोने वर काढणारे श्रम - पुत्र
त्यांच्या सर्वांगावर काळीच झळाळी उधळलेली
भूगर्भातल्या गर्मीने भाजलेले
आणि ओझे वाहून मोडण्याच्या सीमेपर्यंत वाकलेले
त्यांच्या कण्यांचे मणके
त्यांना ताठ करण्यासाठी प्रतिभेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे
षोडशींच्या शरीरावरील रेशमी वस्त्रांची सळ्सळणारी वळणे पाहून
आता फक्त चांदण्यांचा चावटपणा त्यांना आठवू नये
अथवा उकळत्या पाण्यात शिजणार्‍या
कोषातील किड्यांची प्रेते आठवून
केवळ त्यांची अहिंसा व्याकूळ होऊ नये
तर आसामच्या अरण्यातील ते अर्धनग्न मजूर आठवून
त्यांच्या रक्तात उकळीही उठावी!
आणि मुलास अफू पाजून कोश गोळा करण्यास निघणार्‍या
मजुरणींचे आटलेले डोळे आठवून
त्या ज्वालारंगी वस्त्रांनी त्यांचेही डोळे जळावे
काश्मिरी कलाबतूंचे गालिचे पाहून
काश्मिरी माणसाच्या देहावरील
ठिगळांची कलाकुसरही त्यांना आठवावी
आणि मग त्यांच्यासाठी गालिच्याची ती मखमल कातेरी व्हावी!

खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!

[ज्वाला आणि फुले या काव्यसंग्रहातून]
=========================

6 comments:

  1. मला "नागीण", "नदीपार" ही पुस्तके हवी आहेत. चारुता सागर (म. भा. भोसले) यांची. मध्यंतरी कोल्हापुरात गेल्यावर मी यांचा शोध घेतला पण ती शिवाजी विद्यापीठात सुद्धा (फोटो कॉपी पुरते) मिळत नाहीत म्हंटल्यावर डोके फिरले. त्यांची "वर्दी"ने माझेसुद्धा पेकाट मोडले. अजून एक. बंगलोरात जुनी पुस्तके कुठे मिळतात? "blossom" हे एक नाव ऐकले आहे. Sylvia plath च्या Bell jaar च्या शोधात आहे.

    ReplyDelete
  2. "ज्वाला आणि फुले" चार-पाच दिवसात येईलच. "समिधा" वाचताना होणारी भावस्थितीसुद्धा गुढघे वितळवून टाकणारी. या देवदूतांच्या प्रत्यक्ष सानिध्यात आपल्या समिधा होण्याइतके भाग्य आम्हाला मिळाले नाही.

    ReplyDelete
  3. सचिन मित्रा, बंगळूरात मराठी पुस्तके तशी मिळणे अवघडच आहे. मी मूळचा पुण्याचा असल्यामुळे जेव्हा पुण्यात जातो त्यावेळी खरेदी करतोच, किंवा मग माझ्या ब्लॉग वर जे दुवे दिले आहेत त्या संकेतस्थळांवरुन इकडे बंगळुरात मागवून घेतो. चारुता सागर यांची बव्हंशी पुस्तके आता मिळतच नाहीत. मिळालीच तर फक्त जुन्या ग्रंथालयांमधून मिळू शकतील.
    समिधा देखील सुंदरच आहे. ज्वाला आणि फुले आता मिळते त्यामुळे त्यांतील शब्दसामर्थ्य आणि खोल आशय थेट मनाला भिडतो

    ...नगर वाचन मंदिरात चारुता सागर यांची पुस्तके नक्की मिळतील

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. तुम्हाला भेटायला आवडेल.
    sachinsgiri@gmail.com हा माझा इमेल.
    मी मार्थाहल्ली येथे हल्ली राहतो.
    कोणत्याही छान हॉटेलात भेटाल का ?

    ReplyDelete
  6. नक्की भेटूयात बाकी चर्चा ई-मेल वर करुयात :)

    ReplyDelete