Wednesday, August 3, 2011

पुस्तक परिचय : ... आणि पानिपत (कादंबरी) - एक सखोल चिंतन...


पुस्तकाचे नाव :  .... आणि पानिपत (कादंबरी)
लेखक : संजय सोनवणी
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन, पुणे
किंमत: ४०० रुपये
पृष्ठसंख्या : ४७२
लेखकाचा ब्लॉग : http://sanjaysonawani.blogspot.com/

पानिपताचे युद्ध आणि त्याची कारण मीमांसा यावर कित्येक कादंबर्‍या आणि संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत.
अलिकडेच मी संजय सोनवणी यांची " ... आणि पानिपत " ही कादंबरी वाचली.  संजय सोनवणी हे संशोधन करुन पुराव्याच्या आधारे  लेखन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
सदाशिवराव भाऊंचा तोतया , जनकोजी शिंदेचा तोतया याकडे ऐतिहासिक ग्रंथांनी जरी काणाडोळा केला तरी त्यांची स्फोटकता या कादंबरीत जाणवते.

सन  १६८० ते १७६१ एका दलित कुटुंबियाच्या चार अख्ख्या पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला हा थरारक इतिहास काल्पनिक वाटतच नाही एवढा जळजळीत वास्तव वाटतो.
भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला', किरण नगरकर यांची 'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या त्या काळात त्यांनी प्रचंड खळबळ उडविली होती. "...आणि पानिपत" ही देखील अशीच खळबळजनक कादंबरी आहे. "...आणि पानिपत " चे लेखक संजय सोनवणी हे वादग्रस्त विधाने करणारे लेखक म्हणून ओळखले जात असले तरी स्वतः संशोधन करुन पुराव्यासकट विचार वाचकांपुढे ठेवतात.    आता कादंबरीकडे वळूयात.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल्या "...आणि पानिपत" या नावापासूनच खरी सुरुवात होते. वाचकाच्या मनात सुरुवातीची तीन टिंबे "..." ( खरं तर अश्रूंचे थेंब) घर करुन बसतात. आणि कादंबरी वाचून खाली ठेवल्यावर तर "...आणि पानिपत" असे आपसूकच वाचकाच्या मनात उमटते. मला वाटते हेच "...आणि पानिपत" या कादंबरीचे यश आहे.

कादंबरी सुरु होते ती सिदनाक महार या पात्रापासून. तत्कालीन महार समाज कसा रहात होता व तत्कालीन बोलीभाषा वापरल्यामुळे थोडी शिवराळ भाषा वाटत असली तरी त्यामुळे कादंबरीला एक जिवंतपणा येतो. सुरुवातीची काही पाने वाचताना वाचकाला वाटते की सिदनाक महार हे मुख्य पात्र असणार. पण जसजसे कथानक पुढे सरकत जाते तसतसे सिदनाकचा पिता आणि भिमनाक महाराचा मुलगा रायनाक हे पात्र कादंबरीचा प्राण व्यापून टाकते. सद्सद्विवेकबुद्धी , सत्य-असत्य, योग्य-अयोग्य, पात्र-अपात्र अशी कित्येक मानसिक आंदोलने लेखकाने या कादंबरीतून समर्थपणे उभी केली आहेत. आजचा समाज प्रगत आहे आणि लायकी हाच निकष लावून समाजात कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला स्वतःचे स्थान निर्माण करता येते. पण  पेशवाईच्या काळात,
महारांना सकाळ आणि संध्याकाळ पुणे शहरात पाऊल टाकायची परवानगी नव्हती. का तर त्यांची सावली अंगावर पडते. आणि त्यामुळे विटाळ होतो. या असल्या खुळचट समजुतीपायी एका महाराने प्राण गमावले (हा सत्य प्रसंग आहे व याचे ऐतिहासिक दाखले देखील आहेत)
तसेच विकत घेऊन बाई ठेवण्याच्याही प्रथा होत्या.
भाऊंचा तोतया नव्हताच असे मानण्यापेक्षा ते खरे भाऊ असू शकतील काय? ही शक्यताही पडताळून तर बघितलीच पाहिजे. कारण पानिपताच्या युद्धात भाऊंचे प्रत्यक्ष प्रेत कोणीही पाहिल्याचा पुरावा नाहीये.
सिदनाक महाराच्या  पात्रापासून कादंबरीची सुरुवात झाल्यावर कादंबरीच्या मध्यानंतर पुन्हा त्याचे आगमन होते, या काळात लेखकाने रायनाक महाराच्या वैचारीक प्रगल्भतेवर प्रकाश टाकला आहे. एक स्त्री केवळ निराधार झाल्यामुळे  तिचा मोह नाकारण्याएवढा संयम दाखवणारा रायनाक पाहिला की गदगदून येते. त्याउलट रायनाकचा मुलगा सिदनाक लग्नानंतर त्याची बायको पोटुशी होते व बाळंतपणासाठी  माहेरी जाते. तेवढ्यात सिदनाकच्या खास मित्राची बायको त्याला एकांतात घरात गाठते, त्यावेळचा त्यांचा रांगडा प्रणय वाचकाला उत्तेजित करता करता स्त्रीचा मोह नाकारणार्‍या रायनाकला अगदी उत्तुंग करुन टाकते. त्यावेळी रायनाकचे मोठेपण वाचकाला जाणवते.
पुढे  सिदनाकची पुण्यात एका ब्राह्मणाच्या अंगावर सावली पडल्यामुळे हत्या होते  आणि त्याचा मुलगा भिमनाक (हे पणजोबांचेच नाव ठेवलेले असते) पोरका होतो. त्यावेळी रायनाकच्या मनात त्याच्या भावाची येळनाकची विचारसरणी पटू लागते.
भिमनाक महाराला २ मुले असतात. एक रायनाक आणि दुसरा येळनाक. येळनाक संताजी-धनाजी जोडगोळीपैकी संताजी घोरपडेंच्या तैनातीत असतो आणि प्रचंड शौर्यही गाजवतो. पण रायगडाजवळच्या एका लढाईत एक मुसलमान सरदार अशरफीखान येळनाकच्या शौर्यावर भाळतो व त्याला जिवंत कैद करवतो. आणि त्याला मुसलमान होण्याचे निमंत्रण देतो व त्याचा  योग्य तो सन्मान करतो. हसन अली या नावाने येळनाकचे नामकरण होते. हा कादंबरीतील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यावरुन आपल्याला लक्षात येते की भारतात मुसलमान हे मूठभर आक्रमक असूनही त्यांची संख्या अमाप कशी वाढली? लेखकाने या प्रश्नाचा अप्रत्यक्षरित्या वेध घेतल्याचे जाणवते.
कादंबरी संपायला येते त्याबरोबर रायनाक , भिमनाक ही पात्रे गौण होऊ लागतात आणि येळनाक (हसन अली) या पात्रावर प्रकाशझोत जातो. पण नंतर पुढे दिल्लीचे राजकारण आणि पानिपत युद्धाचा वेध घेणे हा प्रमुख हेतू या कादंबरीमागे असल्याने तो ही विरळ होत जातो. पण तो शेवटपर्यंत असतो.
युद्धासाठी जाणार्‍या लव्याजम्यात भिमनाक त्याची नवी नवरी बाळी बरोबर जातो, त्यात त्याचा खास मित्र पेशव्यांच्या सैन्यात असतो. तो वारंवार भिमनाकला भेटायला येत असतो त्यातच बाळी त्याच्यावर भाळते व पुढे त्यांचे जमते देखील. त्यावेळीही वाचकाला सिदनाकचा रांगडा प्रणय पुन्हा एकदा दिसणार असे वाटते. पण लेखकाने याचे भान ठेवल्याचे जाणवते. ज्या गोष्टीला जेवढे महत्त्व द्यायचे तेवढेच महत्त्व संजय सोनवणी यांनी दिले आहे. शेवटी शेवटी कादंबरी विस्तारीत जाते तशी ती थोडी विस्कळीत वाटू लागते. पण पानिपताच्या युद्धातील प्रश्नांचा आढावा घ्यायचा असल्यामुळे तेवढे वाचक समजू शकतो.

कादंबरी वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी वाचकाच्या मनात पूर्वी वाचलेला पानिपताचा भव्य दिव्य इतिहास उभा राहतो. विश्वास पाटील यांनी 'पानिपत' ही कादंबरी लिहून 'तत्कालिन उपलब्ध साधनांच्या आधाराने पानिपत' युद्धाचा इतिहास एका थरारक स्वरुपात वाचकांच्या समोर ठेवला.  पण या कादंबरीत जे प्रश्न हाताळले गेले नाहित ते हाताळण्याचे धाडस संजय सोनवणी यांनी दाखवले आहे. आणि मला वाटते की इथेच "...आणि पानिपत" चे वेगळे पण सुरु होते.
पानिपताचा इतिहास म्हटले की मराठ्यांचा पराक्रम आणि पेशव्यांचे कर्तृत्त्व यापलिकडे काही वाचल्याचे आपल्याला आठवते का बघा. सर्वसामान्यांच्या आयुष्यात पानिपताच्या युद्धाने केवढे मोठे वादळ निर्माण केले याचे एक परखड अवलोकन "...आणि पानिपत" च्या माध्यमातून लेखकाने केले आहे. अर्थात या कादंबरीत पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे असेल कदाचित पण लेखकाने पानिपताच्या युद्धाच्या अनुषंगाने सगळ्याच अंगाला स्पर्श केला आहे असे नाही म्हणता येणार. पण जे लिहिले आहे त्याला तोड नाही.

   "...आणि पानिपत "  ही कादंबरी  अनेक वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकते आणि क्रांतिकारक विचार देखील देते. कोणत्याही वेगळ्या विचारांचे स्वागतच व्हायला हवे. वाचकांनी ते करावे एवढीच विनंती. जात पात बाजूला ठेवून एका सर्वसामान्य गरीब रयतेच्या दृष्टीकोनातून या कादंबरीचे वाचन वाचकाने केले तर "...आणि पानिपत" या कादंबरीला तुम्ही न्याय देऊ शकाल. एका जातिविशेष अभिमानातून अथवा पूर्वग्रह ठेवून हे पुस्तक वाचले तर तो "...आणि पानिपत" या कादंबरीवर अन्याय ठरेल. खरे तर तो विचारस्वातंत्र्यावरील अन्याय ठरेल.  मला वाटते की त्यांच्या मतांशी भिन्नता असणार्‍या संशोधकांनी वा लेखकांनी त्यांनी उभे केलेल्या प्रश्नांना हॅ... काहीतरीच असे उडवून लावण्यापेक्षा लेखनाच्या माध्यमाद्वारेच उत्तरे दिली पाहिजेत. अशा बौद्धिक आणि पुराव्यांसकट मांडल्या जाणार्‍या मतांमुळे इतिहासातील देवत्व दिलेल्या व्यक्ती खरोखर तशाच होत्या किंवा नाही यामागील सत्य उलगडण्यास सर्वांनाच मदत होईल.

तर सर्वसामान्य आणि सर्व बुद्धीवंत अशा सर्व वर्गातील वाचकांनी अवश्य वाचावी अशीच ही कादंबरी आहे. वाचकाची अजिबात निराशा होणार नाही हे खात्रीने म्हणू शकतो.
"...आणि पानिपत" वाचा आणि कशी वाटली ते अवश्य कळवा. :)

5 comments:

  1. नमस्ते सर,

    मी मनोज घाटगे मला तुमची मदत हवी आहे. मिळाल्यास मी तुमच जन्मभर आभारी आहे. मला समांतर हें पुस्तक कोठे मिळेल? मला pustakvishwa.com या साईट वरून आणि तुमच्या संभाषणातून तुमचा पत्ता लागला :) [ त्याची एखादी प्रत स्कॅन केलेली ती जरी मिळाली नाहीतर तुमच्याकडील प्रत मी स्कॅन करून तुम्हाला परत करेन.] तुमच्या कडेल असेल तर प्लीज मला कळवा. माझा मेल ID आहे rajeghatage@gmail.com मोबाइल नंबर आहे ९६२३८६४१०३. मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय.

    ~धन्यवाद~

    ReplyDelete
  2. sir tumcha blog pn sundar ahe awadla mala :)

    ReplyDelete
  3. धन्यवाद मनोज. तुम्हाला हवी ती माहिती मिळाली असल्यामुळे तुम्हाला माझ्याकडून अल्पशी मदत झाली असेल असे गृहीत धरतो :)

    ReplyDelete
  4. अत्यंत सुंदर समीक्षा आणि रसग्रहण! वेगळ्याच दृष्टीने ह्या सर्वांचा विचार केलेला पाहून छान वाटलं. ब्लॉग लेखकाची सूक्ष्म निरीक्षण करणारी शैली आवडली.. छान.

    ReplyDelete
  5. उस्फूर्त प्रतिसादाबद्दल आभारी आहे निरंजन.
    तुझ्या प्रतिसादावरुन ही कादंबरी तू वाचली असावी असे वाटते आहे. पण नसेल वाचली तर अवश्य वाच.

    ReplyDelete