Tuesday, November 16, 2010

पुस्तक परिचय : "पार्टनर" व.पु. काळे



एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले.

भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही.
पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो.

कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले. वैयक्तीक आयुष्यावर कदाचित अगणित कादंबर्‍या लिहिल्या गेल्या असतील.... वाचल्या गेल्या असतील... पण स्त्री-पुरुष , नवरा-बायको , आई - मुलगा, सासू - सून , भाऊ भाऊ, जिवाभावाचा मित्र, मालक-नोकर, विक्रेता-ग्राहक, दीर वहीनी या सर्व नात्यांवर कमी शब्दांत पण परिणामकारकपणे आणि विलक्षण प्रभावीपणाने क्वचितच कोणी लिहिले असावे.

पहिल्याच सार्वजनिक भेटीत ज्या सौंदर्यवतीला पाहताच एका सामान्य दिसणार्‍या तरुणाचे चित्त हरवते. तिला आपल्या खर्‍या प्रेमाची कबुली एकदम स्पष्टपणे देऊनही तिच्याशी लग्न होण्याची शक्यता नाही या वास्तवाचे भान आहे हे देखील तिलाच स्पष्टपणे सांगणे. तिच्याशी संसार फुलवताना प्रचंड समाधानाची भावना फक्त त्यालाच नव्हे तर तिलाही तितक्याच समर्पणाने जाणवते. तिला प्राप्त करताना त्याला मिळालेले समाधान, आणि त्याचबरोबर वाट्याला आलेला सख्ख्या आईसकट भाऊ व वहिनीचा तिरस्कार. असे कित्येक वेगवेगळे पण वेगवान घटनाक्रम वाट्याला येऊनही अधून मधून धूमकेतू सारखा अवतीर्ण होणारा 'पार्टनर'च त्याला प्रत्येक प्रसंगात जवळ कसा वाटतो. प्रेयसीचे रुपांतर आधी अर्धांगिनीत त्यानंतर मग आईत झाल्यावर तिच्या स्वभावातील बदल किती छोट्याशाच पण काळजाला चटका लावणार्‍या प्रसंगांतून वपुंनी दाखवून दिले आहे.

अर्थात कथानक हे 'पार्टनर' चे बलस्थान आहे की नाही माहिती नाही. किमान माझ्यामते तरी नाही. कारण घराघरात घडणार्‍या दाहक सत्याचेच पार्टनरमध्ये जळजळीत चित्रण केलेले आहे पण त्याहीपेक्षा अद्वितिय आणि मनात घर करुन बसणारी वपुंची योग्य वेळी केलेली योग्य वाक्यांची पेरणी आहे.
जसे
"पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही."
"आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक."
यातही 'नरक' या व्याख्येवर वपुंनी कोटी केली आहे. हाच नरक 'पार्टनर' मध्ये तीन वेगळ्या व्याख्यांनी दाखवलेला आहे. ते इथे सांगून या सुंदर पुस्तकाचा रसभंग नाही करत Smile
"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं."
"कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं."
ही असली सुंदर सुंदर वाक्ये पुस्तक हातातून खाली ठेवलं तरी मनात हिंदोळत असतात.
आणि त्याही पेक्षा मति गुंग करणारे म्हणजे क्वचित समोर येणार्‍या 'पार्टनर' चे विचार आणि त्याचे जीवन
"पार्टनर" केवळ एक कादंबरी नाहिये.... केवळ एक घटनाक्रम नाहिये.... तर एक सखोल चिंतन आहे.
मला वाटते यातच व.पुं.च्या 'पार्टनर' चे यश दडलेले आहे.

ज्याचे अनुभवविश्व समृद्ध झाले आहे त्याला पार्टनर कळला असे मी म्हणणार नाही तर त्याने 'पार्टनर' जगण्याचा अनुभव घेतला असेच म्हणेन. आणि म्हणूनच 'पार्टनर' हे लग्नानंतर काही वर्षांनंतर वाचायचे पुस्तक असे मी आवर्जून म्हणेन. Smile

2 comments:

  1. Majhya sarvaat avadatya lekhakach...maajh ek avadt pustak....grttttttttt book by d grttt V.Pu :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुप्रियाजी... वपुंचे लेखन आहेच तेवढे वास्तव :) ग्रेट लेखक

      Delete