Wednesday, November 3, 2010

मराठी साहित्यविश्वाला लाभलेला "प्रेषित"

पुस्तकविश्व.कॉम च्या दिवाळी अंक २०१० मध्ये प्रकाशित 

लेखाचे नाव : मराठी साहित्यविश्वाला लाभलेला "प्रेषित"
पुस्तकाचे नाव : "प्रेषित"
लेखक : डॉ. जयंत नारळीकर
पुस्तकाचा प्रकार : विज्ञान कादंबरी





प्रेषित मी जेव्हा पहिल्या प्रथम वाचले तेव्हा नुसता थक्कच झालो नाही तर पूर्णपणे भारावून गेलो होतो. इतका की खगोलशास्त्रज्ञ होण्याची मी (दिवा)स्वप्नं पाहू लागलो. मला वाटते की डॉ.जयंत नारळीकर यांच्यासारख्या महान व्यक्तींची आपल्या देशाला खूप गरज आहे. नारळीकर केवळ संशोधनातच अद्वितीय नव्हते तर खगोलशास्त्र या विषयावर लोकांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी मातृभाषेतून समाजाला समजेल अशा भाषेत ( कथा - कादंबरी रुपाने) कित्येक पुस्तकांची देणगी दिली. प्रेषित मी माझ्या शालेय जीवनात वाचले तेव्हा केवळ खगोलशास्त्रज्ञ व्हायचे स्वप्न मनाशी बाळगून होतो. मी स्वतःवरुन नक्कीच सांगू शकतो की नारळीकरांनी मला माझ्या शालेय जीवनात प्रचंड प्रेरित केले होते. काही वैयक्तीक कारणास्तव मला माझी शिक्षणाची ही आवड जोपासून शिक्षणाला दिशा देणे शक्य नाही झाले. पण अजूनही मी खगोलशास्त्रावर जमेल तसे वाचन, चिंतन व लेखन करत असतो.

असो, तर हे सर्व सांगायचा मूळ हेतू जयंत नारळीकर यांच्या 'प्रेषित' या कादंबरीचे अवलोकन करणे हा आहे. 'प्रेषित' ने कित्येक शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात एक वेगळी दिशा दिली असणार याची खात्री आहे. ज्या मुलांना शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अशी मार्गदर्शक पुस्तके मिळतात ती मुले भाग्यवान होय.

तर 'प्रेषित' ची सुरुवात होते ती अमेरिकेतील जॉन प्रिंगल या एका शास्त्रज्ञाच्या वेगवान प्रवासाने. सायक्लॉप्स टाऊन या अवाढव्य परिसरात जेव्हा जॉन दाखल होतो तेव्हा सायक्लॉप्सच्या दुर्बिणीचे वर्णन थक्क करुन सोडणारे आहे. सायक्लॉप्स चे वर्णन करतानाच जॉड्रेल बँक या सर्वात मोठ्या दुर्बिणीची उपमा देऊन वाचकांच्या ज्ञानात बारीक सारीक माहितीची भर टाकण्यास जी सुरुवात करतात ती कादंबरी संपेपर्यंत सुरुच असते. असे असूनही कादंबरीतील थरार कुठेही कमी होत नाही.
तर हा धडाडीचा तरुण शास्त्रज्ञ जॉन प्रिंगल व त्याचा मित्र पीटर लॉरी यांच्या चर्चेतून राक्षसी तारे हे परकीय जीवसृष्टीचा शोध लावण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवून देताना वैज्ञानिक संशोधनाला सरकारी लाल फितींमध्ये कसे भरडले जाते याची काळी किनारही तितक्याच ताकदीने नारळीकर दाखवून देतात. पण या लाल फितीच्या हुकुमशाहीतही जॉन प्रिंगलसारखे हाडाचे वैज्ञानिक उपलब्ध असलेल्या दुर्बिणीचा विज्ञानासाठी योग्य पद्धतीने कसा वापर करतात. त्यातून काय फलनिष्पत्ती होते. सायक्लॉप्ससारखी अवाढव्य दुर्बिण ज्या हेतूने बांधली गेली होती तो मूळ हेतू जॉन प्रिंगल कसा साध्य करतो? जॉन प्रिंगलच्या त्या एका कृतीतून नक्की काय निष्पन्न होते? हे सर्व मुळातूनच वाचण्यासारखे आहे. त्याबद्दल अधिक सांगून रसभंग नाही करत.

तर जॉन प्रिंगलचे अचानक अपघाती निधन झाल्यावर अमेरिकेतील ही वेगवान कथा अवतीर्ण होते ती भारताच्या भूमीवर - महाराष्ट्रात सातारा-कराड महामार्गावर. सुधाकर आणि मालिनी या एका सुखी दांपत्याला रस्त्यावर एक मूल सापडते. त्यांच्या सुखात कमी असते ती फक्त अपत्याची ती देखील या सापडलेल्या मुलाच्या रुपाने पूर्ण होते. आलोक हे नाव ठेवले जाते या निसर्गाच्या देणगीचे.

आलोकच्या वाढत्या वयाबरोबरच सुधाकर आणि मालिनीला त्याच्या अफाट बुद्धीमत्तेची जाणीव होते. त्यानुसार सुधाकर आलोकच्या करियरसाठी योग्य ती तरतूद करतो. पण हा बालबृहस्पती एवढा विद्वान असतो की मिश्रांसारख्या कसलेल्या शिक्षकाचे मन जिंकून घेतो. त्यात आलोकला लहानपणापासून पाहणारे विद्वान डॉक्टर साळुंखे यांनी आलोकच्या बुद्धीमत्तेवर केलेले प्रयोग, त्यातून काढलेला निष्कर्ष, आलोकने स्पेस शटलमधून चंद्राची सफर करणे, जागतिक संघटनेत प्रवेश मिळवणे व त्यात आपली छाप पाडणे. या सर्व घडामोडींबरोबर आलोकच्या भावनिक बाजू जपणारी सँड्रा ही गर्लफ्रेंड व चेंग सारखा हरहुन्नरी मित्र घटनाक्रमात महत्वाची भूमिका बजावतात.

या सर्वांचा शेवट होताना कथानक पुन्हा भूतकाळाशी जोडले जाते व सर पीटर लॉरी यांची आलोक भेट घेतो ती कशासाठी? त्यातून काय साध्य होते? आलोकच्या बुद्धीमत्तेने प्रभावित होऊन डिक मम्फर्ड सारखा उच्चपदस्थ संचालक राष्ट्राध्यक्षांची सायक्लॉप्स वर काम करण्याची परवानगी आलोकसाठी का मिळवून देतो. आलोक या संधीचा पाठपुरावा कसा करतो? व का करतो? हे सर्व खूप खिळवून ठेवणारे व मनोरंजक आहे व मुळातूनच "प्रेषित" वाचून अनुभवण्याची गोष्ट आहे.

प्रेषित चे वाचन करताना जयंत नारळीकर हे किती उच्च श्रेणीचे शास्त्रज्ञ होते हे तर पटतेच पण स्वतःकडे असलेले ज्ञान पुस्तकरुपाने - ते ही मनोरंजक पद्धतीने - सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत कसे मांडायचे याची पुरेपुर जाणीव होती हे ही दिसून येते. 'प्रेषित' चे वाचन करताना सर्वसामान्य माणसाला अवकाशयुगाची नांदी कधीपासून सुरु झाली हा इतिहास तर कळतोच. पण चंद्रावरची सफर करण्यासाठी आधी किती वेळ लागायचा व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस होणार्‍या प्रगतीमुळे त्या वेगात वाढ कशी होणार आहे या भविष्यातील घटनेचा जणू आढावाच घेतलेला आढळतो. तसेच व्हिडिओ फोन, रेडिओ व ध्वनि तरंगाचे विज्ञान, रेकॉर्डींग क्षेत्रातील क्रांती. अशा कित्येक बारिकसारिक गोष्टींद्वारे विज्ञानाने सर्वसामान्यांच्या जीवनात केवढी मोठी क्रांती घडवून आणली आहे हे देखील नारळीकरांनी अतिशय सुंदर पद्धतीने दाखवून दिले आहे.

"प्रेषित" ची रचना खूप विचारपूर्वक झालेली जाणवते. पुस्तकाच्या अनुक्रमाणिकेपासूनच सुरुवात होते. प्रत्येक प्रकरणाला नारळीकरांनी खूप समर्पक नावे दिली आहेत हे प्रत्येक प्रकरण वाचताना जाणवते. जसे सायक्लॉप्स.... निसर्गाची देणगी .... स्पेस अ‍ॅकॅडमी.... सर पीटर.... टेपच्या शोधात...इ...इ...
जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते की "प्रेषित" या कादंबरीच्या रुपाने डॉ. जयंत नारळीकर यांनी मराठी साहित्यविश्वाला खूप अनमोल देणगी दिलेली आहे. या सुंदर पुस्तकाबद्दल डॉ. जयंत नारळीकर यांना मनःपूर्वक अनेक धन्यवाद.
- सागर

सदर लेखकाची अन्य वाचनीय व संग्राह्य पुस्तके :
कादंबर्‍या :
- अभयारण्य
- व्हायरस
- सूर्याचा प्रकोप
- वामन परत न आला
- अंतराळातील स्फोट
कथासंग्रहः
- यक्षांची देणगी
- अंतराळातील भस्मासुर
- टाइम मशीनची किमया
खगोलशास्त्रावरील माहितीपर पुस्तके:
- विश्वाची सहल
- विज्ञानाची गरुडझेप
- विज्ञान आणि वैज्ञानिक
- अंतराळ आणि विज्ञान
- अवकाशाशी जडले नाते
- याला जीवन ऐसे नाव

No comments:

Post a Comment