'सिंहासन बत्तिशी' हे ह.अ.भावे संपादित पुस्तक पुन्हा एकदा वाचले.
सिंहासन बत्तीशीचे प्रामाणिक भाषांतर असेच या पुस्तकावर छापले आहे. (म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ नाही ना? असा चिकित्सक प्रश्न बाजूला ठेवूयात).
पण मूळ 'सिंहासन बत्तिशी' चा हा संक्षिप्त अनुवाद आहे हे उघड आहे. महाकवि गुणाढ्याने मूळ पैशाची भाषेत (या भाषेवर माहराष्ट्री प्राकृतचा बराच प्रभाव आहे) लिहिलेल्या ‘बृहत्कथां’चे संस्कृत रुपांतर ११व्या शतकात सोमदेवभट्टाने 'कथासरित्सागर'च्या रुपाने केले होते. त्यात या सर्व कथा विस्ताराने आलेल्या आहेत. सिंहासन बत्तिशीत थोड्या फार फरकाने याच सर्व कथा आलेल्या आहेत. सिंहासन बत्तिशी चे संपादक ह.अ. भावे यांनी संक्षेपाने या सर्व कथा दिलेल्या आहेत. या पुस्तकाचे बलस्थान आहे त्या दोन गोष्टी - एक म्हणजे प्रस्तावना आणि दुसरे म्हणजे संक्षेपाने आलेल्या या ३२ कथांचे सार.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ह.अ.भावे यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ती म्हणजे सिंहासन बत्तीशी हे मूळ कोणत्या भाषेत असावे? या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न. डॉ.एडगर्टन यांना सिंहासन बत्तीशी च्या ज्या चार प्रती मिळालेल्या होत्या त्या मूळ माहराष्ट्री प्राकृतावरुन घेतल्या गेलेल्या होत्या. सिंहासन बत्तीशीच्या या मराठी आवृत्तीच्या प्रस्तावनेत श्री. ह.अ.भावे यांनी सिंहासन बत्तीशीच्या मूळाचा शोध घेताना त्यांना मिळालेली माहिती दिली आहे. त्यात ते म्हणतात. "डॉ.एडगर्टन यांनी ज्या चार जैन हस्तलिखित प्रती तपासल्या त्यावरुन असे दिसते की कोणी, क्षेमंकर मुनीने सिंहासन बत्तीशीची प्रत मूळ माहराष्ट्री प्राकृत वरुन सिद्ध केलेली आहे. क्षेमंकर हा एक श्वेतांबर आचार्य होता व त्याने 'षट्पुरुषचरित्र' नावाचा आणखी एक ग्रंथ लिहिला आहे. मध्ययुगीन चरित्रकोशात या मुनीचा काळ इ.स.१४७० चा सुमार असा दिला आहे. सिंहासनावरील पुतळ्यांनी भोज राजाला या सर्व कथा सांगितल्या आहेत. याबाबत या सर्व प्रतींची एकवाक्यता आहे. भोज परमाराचा (राजाचा) काल अंदाजे इ.स.१०१० ते १०६० असा आहे. सातव्या गोष्टींत हेमाद्रीच्या दानखंडाचा उल्लेख आला आहे. ... हेमाद्री उर्फ हेमाडपंत या देवगिरीच्या यादव सम्राटांचा मंत्री. याचा अंदाजी काल १२६० ते १२७५ असा आहे"
या उल्लेखावरुन सिंहासन बत्तिशीची रचना ही १३ व्या शतकाच्या अखेरीच्या सुमारास झाली असली पाहिजे असा तर्क श्री.ह.अ.भावे देतात.
पुढे प्रस्तावनेत श्री. ह.अ. भावे असेही म्हणतात की शालिवाहन शकाच्या पहिल्या शतकात महाकवि गुणाढ्याने कथासरित्सागरची रचना केली. या कथासरित्सागरमधील अनेक कथा सिंहासन बत्तीशीत जशाच्या तशा वा थोड्या फार फरकाने आल्या आहेत. कथासरित्सागर आणि सिंहासन बत्तीशी हे दोन्ही ग्रंथ महाराष्ट्रात तयार झाले आहेत असे सिद्धही झाले आहे हेही ते सांगतात. या सर्व कथांमधून भेटणारा विक्रमादित्य म्हणजे नक्की कोण? याविषयी संशोधकांत मतभेद आहेत. काहींच्यामते तो गौतमीपुत्र सातकर्णी असावा. काहींच्या मते चंद्रगुप्त विक्रमादित्य असावा.
या उल्लेखावरुन सिंहासन बत्तिशीची रचना ही १३ व्या शतकाच्या अखेरीच्या सुमारास झाली असली पाहिजे असा तर्क श्री.ह.अ.भावे देतात.
पुढे प्रस्तावनेत श्री. ह.अ. भावे असेही म्हणतात की शालिवाहन शकाच्या पहिल्या शतकात महाकवि गुणाढ्याने कथासरित्सागरची रचना केली. या कथासरित्सागरमधील अनेक कथा सिंहासन बत्तीशीत जशाच्या तशा वा थोड्या फार फरकाने आल्या आहेत. कथासरित्सागर आणि सिंहासन बत्तीशी हे दोन्ही ग्रंथ महाराष्ट्रात तयार झाले आहेत असे सिद्धही झाले आहे हेही ते सांगतात. या सर्व कथांमधून भेटणारा विक्रमादित्य म्हणजे नक्की कोण? याविषयी संशोधकांत मतभेद आहेत. काहींच्यामते तो गौतमीपुत्र सातकर्णी असावा. काहींच्या मते चंद्रगुप्त विक्रमादित्य असावा.
वर दिलेली ही सर्व माहिती वाचून हा एडगर्टन म्हणजे नक्की कोण? याचा शोध घेता घेता कळाले की याचे पूर्ण नाव फ्रँकलीन एडगर्टन (Franklin Edgerton) आहे. या फ्रँकलिन एडगर्टनने १९२६ साली 'विक्रमा'स अॅडव्हेंचर्स ऑर द थर्टी टू टेल्स ऑफ द थ्रोन" (Vikrama's adventures: or, The thirty-two tales of the
throne) हा ग्रंथ लिहिला होता.
या ग्रंथात आणखी सूर मारता मारता मला अशीही माहिती मिळाली की 'राजशेखर'ने लिहिलेला कर्पूरमंजिरी हा ग्रंथ देखील मूळ प्राकृत भाषेतच होता. या कर्पूरमंजिरीचा काळ इसवीसन ९०० च्या सुमारासचा मानला जातो.
वरील माहिती व फ्रँकलीनच्या ग्रंथातील माहिती यावरुन असे स्पष्ट दिसते की प्राकृतातच विपुल साहित्य निर्माण झाले होते आणि तेच साहित्य संस्कृतातही भाषांतरीत होत होते.
प्रश्न हा आहे की माहराष्ट्री प्राकृत म्हणवल्या जाणार्या भाषेतच जर सिंहासन बत्तीशी व कथासरित्सागरासारखे अनमोल ग्रंथ तयार झाल्याचे सिद्ध होत असेल तर आजची मराठी भाषा ही तत्कालीन माहराष्ट्री प्राकृतचेच रुप नव्हे काय?
वरील माहितीत श्री. ह.अ.भावे असे म्हणतात की सिंहासन बत्तीशीत आलेला हेमाद्रीच्या दानखंडाचा उल्लेख पाहता तो विजयनगर साम्राज्यातील हेमाडपंत असावा. पण या हेमाडपंतापूर्वी दुसरा हेमाद्री असू शकणार नाही काय? हा एक विचार करण्याचा आणि संशोधनाचा मुद्दा आहे. याचे कारण असे की कथासरित्सागर शालिवाहन शकाच्या पहिल्या शतकात लिहिले गेले. तेही महाराष्ट्रात. त्यातील अनेक कथा जर सिंहासन बत्तीशीत येत असतील आणि दोघांचा नायक विक्रमादित्य हाच असेल (हा विक्रमादित्य म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीच असण्याची शक्यता जास्त आहे. कारण या गौतमीपुत्र सातकर्णीने शकांचा पूर्ण नायनाट केला ज्याची साक्ष आजही नाशिक व परिसरातील आजही उपलब्ध असलेले अनेक शिलालेख देत आहेत.) तर या दोन ग्रंथांच्या काळात १२०० वर्षांचा फरक कसा?
सिंहासन बत्तीशीतील हेमाद्री हा मला तेराव्या शतकातील हेमाडपंत वाटत नाही कारण कथासरित्सागरातील कित्येक कथा जशाच्या तशा त्यात किरकोळ फरकाने आल्या आहेत. पहिल्या शतकातील कथासरित्सागर ते तेरावे शतक हा १,२०० वर्षांचा प्रदीर्घ काळ आहे. ज्यात प्रचंड बदल होतात. पण सिंहासन बत्तीशीत असे मोठे बदल दिसत नाहीत. तेव्हा सिंहासन बत्तीशी ही कथासरित्सागराइतकी प्राचीन नसली तरी तिच्या जवळपास जाणारी कलाकृती असावी. मला व्यक्तीशः सिंहासन बत्तीशीची निर्मिती इ.स.३०० ते ४०० च्या काळातील वाटत आहे. एडगर्टन साहेबांना जी माहराष्ट्री प्राकृताची सिंहासन बत्तीशीची प्रत सापडली ती कदाचित इ.स.१,३०० च्या अखेरीस कोणा विजयनगर साम्राज्याच्या प्रभाविताने लिहिलेली असावी. व आपल्या वेद, पुराणे यांच्यातील घालघुसडीचा इतिहास पाहता हेमाद्रीच्या दानाचा उल्लेख त्यात घुसवणे काही अशक्य नाही. त्या उल्लेखावरुन सिंहासन बत्तीशीचा निर्मितीकालच इ.स.तेराव्या शतकाच्या अखेरीसचा ठरवणे थोडे धाडसाचे ठरेल. अर्थात हा संशोधनाचा भाग आहे. जेवढे खणत जाऊ तितकी मुळे सापडत जातील
वादग्रस्त मुद्दे थोडे बाजूला ठेवले तरी सिंहासन बत्तिशी या ह.अ.भावे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे महत्त्व खूप मोठे आहे.
जुन्या काळी स.आ.जोगळेकर यांनी "सिंहासन बत्तिशी" हा भलामोठा ग्रंथ लिहिला होता. अलिकडेच पद्मगंधा प्रकाशनाने स.आ.जोगळेकरांचाच दुसरा भलामोठा ग्रंथ 'गाथा सप्तशति' हा पुन्हा प्रकाशित केला आहे. तसाच सिंहासन बत्तिशी हाही ग्रंथ प्रकाशित झाला तर वाचकांना या सर्व कथा विस्ताराने वाचता येतील. या ओघाने सिंहासन बत्तीशीत आलेल्या सर्व ३२ पुतळ्यांची नावेही आपल्याला कळतात.
तूर्तास वाचकांचे मनोरंजन करण्यास २,००० वर्षांपूर्वीच्या काळातील कथा ह.अ.भावे यांनी संपादित केलेले 'सिंहासन बत्तीशी' हे पुस्तक समर्थ आहे असे मला वाटते
-धन्यवाद,
सागर
सागर, '...फ्रँकलीन एडगर्टन साहेबांचा मूळ ग्रंथ येथून उतरवून घ्यावा' यातली एडगर्टनच्या पुस्तकाची लिंक चालत नाही आहे. काही प्रॉब्लेम आहे का? इथली पोस्ट वाचून एडगर्टनचा मूळ ग्रंथ वाचण्याची उत्सुकता जागी झाली आहे.
ReplyDeleteगणेशप्रसाद सर,
Deleteमूळ स्रोत कदाचित डोमेन मुदत संपल्यामुळे दिसत नसावी सुदैवाने मी या सर्व pdf उतरवून घेतल्या होत्या. त्या पुढील लिंक वरून बघता येतील
https://drive.google.com/drive/folders/1S2Jw75L1TfXF85DNXrplD_HqAzGqPGcY?usp=sharing