आजच एक महत्त्वाची माहिती मिळाली ती ही की कित्येक दशके दुर्मिळ असलेले अतिशय महत्त्वाचे असे एक पुस्तक जून मधे प्रकाशित झाले आहे.
"गाथा सप्तशति" - स.आ.जोगळेकर
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
किंमत : १,०००/- रुपये
सवलत मूल्य : ७५०/- रुपये. (फार तर ८००/-)
स.आ. जोगळेकर हे नाव आजच्या पिढीला कदाचित माहिती नसेल पण खंद्या वाचकांना त्यातही इतिहासात गोडी असणार्यांना मात्र स.आ.जोगळेकरांची किर्ती नक्कीच माहिती असेल.
स.आ. जोगळेकरांची ५०० पानांची प्रदीर्घ आणि अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना गाथा सप्तशति या ग्रंथाला लाभलेली आहे. 'गाथा सप्तशति' काय आहे? तर वाचकांचा दुर्गा सप्तशती आणि या ग्रंथात घोळ होण्याचा संभव आहे म्हणून हा खुलासा.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात "हाल सातवाहन" याने तत्कालीन सर्व उत्तम गाथांचे संकलन करुन "गाथा सप्तशति" या अत्भुत ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथाचा प्रभाव म्हणा किंवा मोह म्हणा इसवीसनाच्या १२व्या शतकापर्यंत कायम होता. त्यातील सुरस गाथा आजही वाचकांना मोह पाडतील.
२,००० वर्षांपूर्वीचा हा अनमोल ठेवा प्रत्येक मराठी घरा-घरात असायला हवा एवढा हा ग्रंथ बहुमोल आहे.
आपल्या सर्वांना कथासरित्सागर ऐकून माहिती असेल. महाकवि गुणाढ्याच्या बृहत्कथेचा तो अनुवाद आहे. त्याच मोलाचा हा ग्रंथ आहे. २,००० वर्षांपूर्वीचा समाज, बोली-चाली, रिती या सर्व आज समजून घेण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग तर होतोच होतो. पण महाराष्ट्राची संस्कृती कशी घडत गेली याचे मूळ या ग्रंथामुळे समजून घेण्यासाठी खूप मदत होते व इतिहासाची आवड असणार्यांना व नसणार्यांनाही या 'गाथा सप्तशति' चा हा अनमोल ग्रंथ महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचे गतवैभव समजून घेण्यासाठी खूपच उपयोगी ठरेल यात शंकाच नाही. या ग्रंथाच्या वाचनाने आजच्या समाजातले आपले वागणे कसे आहे आणि २,००० वर्षांपूर्वीच्या समाजाचे कसे होते? यातील तौलनिक फरक 'गाथा सप्तशति'च्या वाचनाने जेव्हा वाचकाच्या लक्षात येते तेव्हा वाचक थक्क होतो.
अशा अनमोल ग्रंथाचे वाचकांनी स्वागत करावे आणि महाराष्ट्राची संस्कृती घडवण्यात मोलाचा हातभार लावणार्या सातवाहन साम्राज्याच्या अतिशय वैभवाच्या काळात निर्मिती झालेल्या "गाथा सप्तशति" या अमूल्य ग्रंथाचे वाचकांनी स्वागत करावे ही मनापासूनची विनंती.
पुण्याच्या अक्षरधारा मधे हा ग्रंथ उपलब्ध आहे. इतर ठिकाणी प्रकाशकाचे नाव विक्रेत्याला सांगितले तरी हे पुस्तक मिळवणे सोपे पडावे.
अन्यथा पुढे प्रकाशकांचा पत्ता व संपर्क क्रमांक देत आहे. त्याची मदत व्हावी
पद्मगंधा प्रकाशन
36/11, Dhanwantari Co-op Hog. Soc.
Pandurang Colony, Erandawane, Pune-411038
Maharashtra, India.
Phone No-+91-20-25442455
Email-feedback@padmagandha.com
धन्यवाद,
- सागर
No comments:
Post a Comment