Saturday, June 2, 2012

"नर्मदेऽऽ हर हर"
लेखकः जगन्नाथ कुंटे
प्रकाशकः प्राजक्त प्रकाशन
किंमत : रुपये २२०/-

अलिकडेच माझ्या एका मैत्रिणीने पुस्तकविश्व.कॉम या संकेतस्थळावर "नर्मदेऽऽ हर हर" या पुस्तकावर हा पुस्तक परिचय लिहिला होता. त्या अनुषंगाने मला या पुस्तकावर काही लिहावेसे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.

या पुस्तकातून नेमके घ्यायचे काय? हा एक खूप मोठा प्रश्न दोन्ही प्रकारच्या (आस्तिक आणि नास्तिक) वाचकांपुढे असतो. एकूणच या पुस्तकातून सर्व प्रकारच्या वाचकाला जे हवे ते मिळेल. कोणाला टीका करण्याची सामग्री दिसू शकेन तर कोणाला जीवनाचे सत्य. पण टीका व्हावी कारण टीकेमुळे नेमक्या गोष्टी स्पष्ट होतात. जालावर अनेकदा मी वाचलेलेही आहे की कुंटेंनी सिगारेट ओढली, चहा पिला. यंव केलं त्यंव केलं. अशाच गोष्टी भरलेल्या आहेत. अशा टीकाकारांबद्दल आदरही आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की कुंटेंनी जे लिहिले आहे ते स्वतः अनुभवले आहे. आपण आपल्या स्वतःच्या (विशेषतः नर्मदा परिक्रमेचा अनुभव नसताना मर्यादित) अनुभवांच्या चष्म्यातून त्यांच्या अनुभवांचं मूल्यमापन करणे कितपत योग्य आहे? त्यापेक्षा जीवनाचं सत्य त्यातून उलगडतं की नाही? त्याविषयक काही चिंतन आपल्या विचारांना मिळतं की नाही? या दिशेने "नर्मदेऽऽ हर हर" चे वाचन केले तर कदाचित काहितरी गवसू शकेल. शेवटी देव म्हणजे तरी काय? मानला तर देव नाहीतर दगड.

"शहरी सवयींना सोकावलेल्या आपल्या शरीरांना सोसणारे आहे का?" हा प्रश्न शेवटी वाचकाला नक्की अंतर्मुख करुन जाईन.

"नर्मदेऽऽ हर हर" कडे मुख्यतः वाचकांचे दुर्लक्ष होते ते मुख्यतः याच प्रमुख कारणामुळे. एकदा टीका करण्याची सामग्री दिसली की पूर्वग्रह निर्माण होतो. पूर्वग्रह निर्माण झाला आणि पुस्तकाचे वाचन झाले तरीसुद्धा आपले चाणाक्ष मन टीका करण्याची सामग्रीच त्यात शोधत असते. त्यातून काही मोती आपल्या नकळत कधीच गळून गेल्याचेही लक्षात येत नाही. सोन्याच्या खाणीत मणभर मातीचा ढीगारा उपसल्यावर सोन्याचा कण सापडतो त्याचप्रमाणे पुस्तकाच्या वाचनाचे असते. नेमके सोन्याचे कण कोणते? हे शेवटी ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. तरीपण तरल मनाने कोणत्याही पुस्तकाचे वाचन केले की हे सोन्याचे कण आपोआप आपल्या झोळीत स्वतःहून पडतात.

जगन्नाथ कुंटेंची "नर्मदेऽऽ हर हर" व्यतिरिक्त नित्य निरंजन आणि साधनामस्त ही २ पुस्तके मी स्वतः वाचली आहेत. त्यामुळे या लेखकाचे अनुभव पूर्णपणे ओघवते आहेत एवढे नक्की सांगू शकतो. किमान मला तरी कुंटेबुवांच्या या अनुभवांत लबाडीचा लवलेशही कुठे दिसला नाही. "नर्मदेऽऽ हर हर" मधील आपल्याला पटत नसलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले की आपोआप या पुस्तकातील प्रत्यक्ष अनुभवांचे सौंदर्य जाणवेल. साधनामस्त मधे साधनेच्या अनुभवांबद्दल जास्त लिहिले आहे. पण "नर्मदेऽऽ हर हर" हे मुख्य करुन प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेतील अनुभवांवर आधारित आहे. तेव्हा एका प्रवाश्याचे अनुभव म्हणून जरी याकडे पाहिले तरी ही नर्मदा परिक्रमा वाचकांना आवडेल असे मला वाटते. जिज्ञासूंनी जगन्नाथ कुंटे यांची ही नर्मदा परिक्रमेची अनुभवयात्रा अवश्य वाचावी. Smile

No comments:

Post a Comment