Wednesday, February 16, 2011

संक्षिप्त आवृत्त्या - मराठी साहित्याला लागलेली एक कीड


अलिकडेच मी काही जुनी पुस्तके नव्याने छापून बाजारात आली म्हणून उत्साहाच्या भरात विकत घेतली.
मी खरेदी करताना एकतर ऑनलाईन किंवा फोनवरुन ऑर्डर देऊन इकडे बंगळूरात मागवतो. अशा वेळी हा धोका लक्षात येत नाही. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेतल्यावर किमान कळते तरी की हातात काय कलाकृती आली आहे ते. असो पण मुद्दा तो नाहिये.
मुळात कोणत्याही कादंबरीचा अथवा पुस्तकाचा संक्षेप करणे हे योग्य आहे की अयोग्य?
माझ्यामते तरी कोणत्याही साहित्यकृतीचा दुसर्‍या लेखकाने संक्षेप करणे ही प्रचंड आक्षेपार्ह बाब आहे आणि संक्षिप्त आवृत्त्या या मराठी साहित्याला लागलेली ही कीड आहे.
मी स्वतःच तीन उदाहरणे पाहिली आहेत. अजून किती असतील आणि किती येणार आहेत ते प्रकाशकांनाच ठाऊक.
नाथमाधवांसारख्या प्रतिभावान लेखकाने छत्रपति शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या स्वराज्य मालिकेतील ७-८ पुस्तके असो. किंवा हरि नारायण आपटेंचे 'चंद्रगुप्त' हे पुस्तक असो किंवा मग भा.रा. भागवतांनी ज्यूल्स व्हर्नच्या कथा मराठीत अनुवादीत केल्या तो २० पुस्तकांचा संच असो.
प्रकाशकांनी नाव मूळ लेखकाचे वापरायचे व आत कोठेतरी संक्षेप केलेल्या लेखकाचे नाव द्यायचे याला बाजारू वृत्ती नाही तर काय म्हणावे? मराठी माणसाच्या हातात पैसा खेळू लागला आणि तो पुस्तके विकत घेऊन वाचू लागला म्हणजे त्याच्या हातात सुंदर कलाकृती विकृत करुन द्यायचा हक्क तुम्हाला कोणी दिला? ज्याने रसनिर्मिती केली त्या लेखकाच्या कलाकृतीचे मूल्यमापन त्या लेखकापेक्षा जास्त दुसरे कोण करु शकेन?
भा. रा. भागवतांनी ज्यूल्स व्हर्नच्या सुंदर वैज्ञानिक कथांचा सुरस अनुवाद मराठीत २० पुस्तकांच्या संचाच्या रुपाने आणला होता. मुळात ही पुस्तके लहान आकाराचीच होती, त्यांचाही संक्षेप करण्याचे प्रयोजन ना प्रकाशकांनी दिले ना संक्षेप करणार्‍या लेखकाने. भा.रा. भागवतांनी बाल-कुमार वयोगटाला समोर ठेवून जी साहित्य निर्मिती केली त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. भागवतांचे बाल-कुमार वयोगटाला मोहून टाकण्याचे कौशल्य त्या कधीही नाव न ऐकलेल्या लेखकाकडे आहे की नाही हे कोण ठरवणार? संक्षेप करणारे लेखक पात्रतेने आणि योग्यतेने महान असतीलही. पण म्हणून दुसर्‍या लेखकाची साहित्यकृती विद्रूप करुन वाचकांना देणे हा अक्षम्य अपराध आहे.
तीच गोष्ट ह.ना.आपटे यांच्या चंद्रगुप्त या कादंबरीची. हिंदी अनुवाद आजही विकत घेण्यासाठी उपलब्ध आहे. पण मराठीत मात्र हे सुंदर पुस्तक बाजारात मिळत नाही. सध्या मिळते आहे ते केवळ ३०-३५ पानांचे पुस्तक. जे बाल वयोगटातील वाचकांना समोर ठेवून संक्षेप केलेले आहे.
आपण वेळीच या संक्षिप्त आवृत्त्यांच्या किडीवर उपाय नाही केला तर उद्या नाथमाधवांची वीरधवल अवघ्या ८०-१०० पानांत बघावयास मिळेल. छावा १००-१५० पानांत दिसेन. जी एंची अनेक पुस्तके एकत्र संक्षिप्त मिळतील. यापुढे कल्पनाच करु इच्छीत नाही.
एखाद्या कादंबरीचा रस त्यातील वर्णनांतून वाचकाला लेखक आपल्या शैलीतून एका वेगळ्या स्वप्न-विश्वात नेतो. विबिध वर्णनांनी वाचकाचे भावविश्व निर्माण होते. साहित्याच्या सौंदर्याचा हा आत्माच या संक्षिप्त आवृत्त्या मलीन करतात.
संक्षेपात वातावरणनिर्मितीला तडा जातो हा मुख्य भाग आहे. तसेही एखादे मोठे पुस्तक वाचताना आपल्याला नको तो भाग वगळण्याचे...न वाचण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असतेच की... पण आपल्याला (वाचकाला) पुस्तकातील कोणता भाग नको आहे हे दुसर्‍या कोणी ठरवावे हे मला वाटते कोणालाही मान्य नसावे. मूळ कलाकृतीतील नको तो भाग वगळण्याचे स्वातंत्र्य केवळ वाचकाच्याच हातात असावे असे माझे मत आहे. सार वाचण्यासाठी संक्षिप्त आवृत्त्यांचा उपयोग होईलच की. त्याने हे केले तो तिथे गेला, त्याला ती भेटली, त्याने युद्ध केले अशा संक्षेपानेदेखील कथानक कळतेच की. पण वाचन करताना रसस्वाद भंग होतो त्याचे काय?
उदाहरणादाखल, चंद्रगुप्त या ह.ना.आपटेंच्या सुंदर कादंबरीचा ज्या बाल वयोगटातील मुलांसाठी संक्षेप केला गेलाय, त्या पुस्तकात पहिल्या ३ पानांत ह.ना.आपटेंनी वातावरणनिर्मितीसाठी रचलेले वर्णन जसेच्या तसे दिलेले आहे, आणि पुढील संक्षेप घाईघाईत उरकला गेला आहे. जी रसमाधुरी मोठ्या कादंबर्‍यांतून असते ती संक्षेपात खास करुन लहान वयोगटातील वाचकांना लक्ष्य करुन देऊन उपयोग काहीच नाही. कारण ती रसमाधुरी दीर्घपल्ल्याच्या कादंबरीसाठी निर्माण केली गेली होती.
केवळ चांदण्या रात्री अमके तमके झाले असे पण संक्षेपात झाले असतेच की.
संक्षेपात मूळ कलाकृतीचे सौंदर्य लोपते यावर माझा जास्त आक्षेप आहे. संक्षेप योग्य असता तर लेखकानेच तो भाग कशाला लिहिला असता?
अर्थात काय आवडावे काय न आवडावे हा सर्वस्वी वैयक्तीक अनुभवावर आधारीत भाग आहे. पण साहित्यसौंदर्य लोपेल अशा संक्षिप्त आवृत्त्या फोफावू लागल्या तर लोक वाचनातील जी रसमाधुरी आहे तीच विसरुन जातील. मग वाचन हे यांत्रिक होईल.
एक सुंदर विचार येथे आठवतो आहे तो देतो आणि थांबतो
कोणतेही व्यसन केव्हा सुटते???? ................. व्यसन लागण्याआधी....
तद्वतच साहित्यसौंदर्य जपायचे असेन तर ते ....कीड लागण्याआधीच जपले पाहिजे.....
संक्षेपाची सुरुवात एकदा मान्य झाली की केव्हा त्यामुळे साहित्यसौंदर्य केव्हा पोखरले गेले ते कळणार पण नाही.
वेळीच आवरले नाही तर ही संक्षिप्त आवृत्त्यांची कीड पसरायला वेळ नाही लागणार.....
*** सर्व लेखकांना, प्रकाशकांना विनंती की अशा प्रकारची संक्षिप्त आवृत्त्यांची कीड मराठी साहित्यात आणू नका ***

*** सर्व पुस्तकप्रेमींनी संक्षिप्त आवृत्यांवर बहिष्कार टाकणे हे एकमेव शस्त्र वाचकांच्या हातात आहे. तेव्हा सर्व वाचकांनी संक्षिप्त आवृत्ती दिसली की ती घेऊच नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. ***

10 comments:

 1. बापरे.. संक्षिप्त आवृत्ती?? हा प्रकार तर ऐकलाही नव्हता. पण तुमची एकूणएक मतं पटली. या प्रवृत्तीचा आणि कृत्याचा निषेध !

  ReplyDelete
 2. स्मृतीचित्रे, सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्यसमर, अशी नवनवीन नावे कळत आहेत आता.
  प्रतिसादाबद्दल धन्यवाद हेरंबसाहेब :)

  अशा संक्षिप्त आवृत्त्या आपण न घेणं हाच एकमेव उपाय आहे त्यावर

  ReplyDelete
 3. नमस्कार सागर
  मराठी साहित्यात हा देखिल एक प्रकार आहे हे आज नव्याने समजले.कदाचित स्वतः मॅजेस्टिक किंवा आयडियल मधुनच पुस्तके घेण्याची सवय असल्यामुळे असेल ...पन अश्याप्रकारे कुठल्याही साहित्यांचे रुपांतर संक्षिप्त आवृत्तीत करणे खरेच गैर आहे.....यापुढे पुस्तक घेताना काळजी घेईन.

  ReplyDelete
 4. अनामिकाजी दुर्दैवाची बाब हीच आहे की नावाजलेले प्रकाशकच अशा गोष्टी करु लागले आहेत.
  वरदा बुक्सने नाथमाधवांची स्वराज्य पुस्तकमालिका अशीच संक्षिप्त केली आहे

  ReplyDelete
 5. नमस्कार सागर,
  प्रथमच तुझ्या ब्लॉगवर आले. छान आहे. संक्षिप्त आवृत्ती हा प्रकार मलाही नविनच आहे. मी सुद्धा बहुतांश पुस्तकं अप्पा बळवंत चौक, डेक्कन जिमखाना, आचार्य अत्रे याठीकाणांहूनच विकत घेते. त्यामुळे घेतानाच बघुन घेते. पण ह्या माहीती बद्धल आभारी आहे. आता अधिक जागरूकतेने विकत घेईन.

  ReplyDelete
 6. धन्यवाद शांतीसुधा. खरेदी करताना वाचकांना जागरुकतेने खरेदी करता यावे यासाठीच हा लेख लिहिला होता. मुळात आवृत्ती संक्षिप्त करण्यामागे कोणतेही ठोस आणि पटणारे कारण संक्षिप्तकर्ते देत नाहीत. हा सरळ सरळ वाचनस्वातंत्र्यावर हल्ला आहे.आपण काय वाचायचे हे दुसर्‍या कोणी ठरवावे हे योग्य नाही म्हणूनच हा लेख प्रपंच. धन्यवाद

  ReplyDelete
 7. I have heard this before. But always go for the original version. Mahnon me pratyek pustak 3-4 velaa baghunach gheto. Aaj kaal tar tyachyaa don pratee suddha padataaloon baghato.

  ReplyDelete
 8. अभिजित मित्रा, कित्येक वाचक पुस्तकाचे नाव आणि लेखक पाहूनच विकत घेतात, संक्षिप्त आवृत्ती हा काय प्रकार आहे हे वाचकांच्या ध्यानात यावे यासाठीच हा लेख लिहिला आहे.
  खास करुन नेट वरुन खरेदी करणार्‍या माझ्यासारख्या पुस्तकवेड्यांना या संक्षिप्त आवृत्त्यांची जास्त झळ पोहोचते.
  हा प्रकार स्वतः प्रकाशकांनी मनात आणला तरच थांबू शकेन
  अन्यथा आपण वाचकांनी अशा संक्षिप्त आवृत्त्या नाकारणे हा एकमेव पर्याय उरतो

  ReplyDelete
 9. अगदी हृदयातला प्रश्न मांडला आपण! काश्मीर एक शापित नंदनवन एक अतिशय दुर्मिळ पुस्तक, आता संक्षिप्त आवृत्ती ! मला आपला ब्लॉग पण खूप भावला, खूप वेगळा आहे. :) धन्यवाद !

  ReplyDelete
  Replies
  1. मोहिनीजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उशीरा प्रतिसाद देतोय त्याबद्दल क्षमस्व

   Delete