Showing posts with label भैरप्पा. Show all posts
Showing posts with label भैरप्पा. Show all posts

Monday, February 9, 2026

पर्व - भैरप्पांच्या महाभारतावर आधारित कादंबरीचे वाचन कसे करावे ? याबद्दल काही विचार

पर्व ही कादंबरी वाचण्यासाठी बराच संयम लागतो.
सुरुवातीची १२०-१५० पाने अशीच नेटाने वाचून काढावी लागतात. मग महाभारताचा विस्तृत पण वास्तवाच्या जवळ जाणारा पट आपल्यासमोर उलगडत जातो. 
महाभारतावर मी वाचलेली पर्व ही सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. 
एवढ्या विस्तृत महाभारताचा आवाका एका कादंबरीत घेणे तसे अशक्यच आहे. पण पर्व या कादंबरीची मी कित्येक पारायणे केली आहेत. महाभारत हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे असेल कदाचित. पण वास्तवाच्या जवळ नेणारी मांडणी करणारी, प्रत्येक पात्राच्या भूमिकेचा आणि भूमिकेमागच्या कारणांचा शोध घेऊन केलेली मांडणी. आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून केलेली मांडणी या साहित्य कृतीला एक वेगळेच वजन मिळवून देते.
साहित्यिक दृष्टीने पर्व कादंबरीची उंची खूप मोठी आहे. ही कादंबरी समजून घेण्यासाठी पूर्वीचे सर्व वाचन आणि आपले दैवी किंवा अदैवी आकलन बाजूला ठेऊनच या महाभारत कथेच्या प्रवाहात उतरावे लागते. कथानकासोबत तुम्ही वाचत राहा आणि प्रवास करत रहा... शेवट वाचून वाचन प्रवास पूर्ण होतो तेव्हा तुमच्या मनात हा वाचन प्रवास पूर्ण झाल्याचे समाधान उमटले आणि हा प्रवास संपल्याची रुखरुख लागली तर पर्व तुम्ही आनंद घेत वाचली असे म्हणता येईल. 
तुलना करू बघाल तर कादंबरीचा रसभंग वाट्याला येईल. 
किरण नगरकर यांची प्रतिस्पर्धी ही मोठी कादंबरी तर केवळ तीन व्यक्तिरेखांच्या भोवती फिरते पण समजायला तिथे बरेच समरस व्हावे लागते. पर्व त्यामानाने सहज समजू शकतो. 
पुरुष म्हणून वाचन करणे आणि एक स्त्री म्हणून वाचन करणे यात वैचारिक फरक काही प्रमाणात असू शकेल. तरीही भैरप्पांनी स्त्री व्यक्तिरेखांवर अन्याय नाही केलेला. महाभारत आपल्याला जे माहिती आहे ते वास्तवाच्या जवळ नेण्याचा भैरप्पांनी पूर्ण प्रयत केलेला आहे. १२ वर्षे महाभारत घडले असू शकलेल्या प्रत्येक ठिकाणी स्वतः भेट देऊन महाभारत कसे घडले असावे याचा पूर्ण पट त्यांनी उभा केला. शिवाय शिक्षक असल्यामुळे भैरप्पांनी या मांडणीत एक शिस्तबद्ध सुसूत्रता आणली असे असले तरीही साहित्यिक रसास्वाद कुठेही या कलाकृतीत कमी पडलेले मला जाणवले नाहीत. 
भीम आणि सालकटंकटा यांच्यातील लहानसे कथानक पण मनावर मोठा प्रभाव सोडते. 
उघड्या मनाने, अनपेक्षित समोर आले तरीही त्या कथानकाच्या दिशेने वाचत राहा. एकदा लय सापडली की पर्व मय होऊन जाल. 🙂🙏🏻