Friday, January 4, 2013

मेलुहाचे मृत्युंजय - शिवाची थरारक कहाणी


'मेलुहाचे मृत्युंजय'  हा 'द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा' या अमिश त्रिपाठी यांच्या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद काल रात्रीच वाचून झाला. डॉ. मीना संभू-शेटे यांनी मराठी अनुवाद कसदार केला आहे. 
पुस्तकातील तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष करुन आणि एक फिक्शन (कल्पनाविलास) म्हणून वाचले तर हे पुस्तक चित्तवेधक आहे. खिळवून ठेवण्याची क्षमता या कादंबरीत नक्कीच आहे. तसेच ही कादंबरी वाचकाला पुढील भाग वाचण्यास उद्युक्तही करते. आता पुढील मराठी भाग कधी प्रकाशित होतोय याकडे लक्ष आहे.
कादंबरीत शिवाचे पात्र अतिशय सक्षमपणे रंगवलेले आहे. महादेव, रुद्र या विभिन्न व्यक्तीरेखांनंतर शिव हा महादेवाची जबाबदारी स्वीकारणारा श्रीरामानंतरच्या काळातला नायक आहे. महादेवाची जबाबदारी तो पेलू शकेल की नाही याबद्दल शिवाच्या मनातील आंदोलने अतिशय ताकदीने कादंबरीत उतरवलेली आहेत. मेलुहाच्या लोकांची जीवनपद्धती देखील वाचकाला प्रभावित करते. सतिचे पात्र अतिशय प्रभाव टाकते. तसेच कनखला, पार्वतेश्वर व आयुर्वती ही देखील या कादंबरीची लक्षात राहणारी ठळक पात्रे. दक्षाची भूमिका पटत नसली तरी त्याची व्यक्तीरेखा फारसा प्रभाव सोडत नाही. मेलुहाचे लोक सूर्यवंशी व प्रभू श्रीरामाच्या आदर्श नियमांना काटेकोर पणे मानणारे असतात व त्यांचे चंद्रवंशी लोकांशी वितुष्ट असते. कादंबरीत दक्षकन्या सतिवर दोनवेळा हल्ला करणारी व अधून मधून वावरणारी बुरखाधारी नाग व्यक्ती कथानकात रहस्य व उत्कंठा निर्माण होण्यास बर्‍याच वेळा हातभार लावते. जिचा उलगडा कादंबरीच्या दुसर्‍या भागात 'द सिक्रेट ऑफ नागाज' यामध्ये होईल. कथानकाचा मूळ ढांचा चांगला असल्यामुळे पुस्तक एक थरारक वाचनानंद नक्की देते. पुस्तकाच्या सुरुवातीच्या १०० पानांत अनुवादिका चाचपडत आहे असे वाटते, पण नंतर मात्र अनुवादिकेने चुका कमी करत नेत योग्य ती पकड वाचकाला मिळवून दिली आहे. 

ही कादंबरी वाचणार असाल तर थोड्या सूचना :
१. पहिली शंभर-सव्वाशे पाने नेटाने वाचावी लागतील
२. तांत्रिक चुका वा आजच्या काळातल्या मीटर, हेक्टर यांसारख्या वापरलेल्या परिमाणांकडे दुर्लक्ष करा
३. अनुवादिकेने या कादंबरीचा अनुवाद करण्यासाठी बरेच परिश्रम केले आहेत पण सुरुवातीला तिच्या अनुवादांमधील किरकोळ चुकांकडे प्रयत्नपूर्वक काणाडोळा करा. पुढील दोन्ही भागांचे अनुवाद याच अनुवादिकेने केले तर ती जास्त योग्य न्याय देऊ शकेल असे वाटते.
४. चिकित्सक भूमिकेतून हवे तर वाचा पण एक फिक्शन म्हणून वाचले तर कादंबरी खरोखर वाचनानंद देते.

मेलुहाचे मृत्युंजय या कादंबरीविषयी मी वर जे लिहिले आहे ते अर्थातच माझे वैयक्तीक मत आहे. कोणाचा अनुभव वेगळा असेल तर माहिती करुन घ्यायला अवश्य आवडेल.