Saturday, November 20, 2010

पुस्तक परिचय : नाझी भस्मासुराचा उदयास्त


नमस्कार मित्रांनो,


मी बरीच पुस्तके वाचली आहेत. "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.
मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच. नसेल तर अवश्य वाचा.लोकशाही कशी सरणावर जाते आणि हिटलरसारखे हुकुमशहा सत्तेवर कसे येतात याचा हा थरारक इतिहास आहे.मी काही हिटलरची भलावण नाही करत. पण त्याच्या काही गुणांना आपण मानलेच पाहिजे.शिवाय आपल्याला जो दुसर्‍या महायुद्धाचा जो इतिहास उपलब्ध आहे तो बराचसा जेत्यांनी लिहीलेला आहे.ही इतिहासाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती पहील्या महायुद्धात जर्मनीवर झालेल्या अत्याचारांची.कानिटकरांनी दुस-या महायुद्धाचा हा थरारक इतिहास लिहिताना याचे भान ठेवल्याचे जाणवते.

दुसर्‍या महायुद्धाचे बीज पहील्या महायुद्धातच पेरले गेले होते.अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते.फारसा मोठा लष्करी पराभव न पत्करता जर्मनी पहिले महायुद्ध हरले होते.हे युद्ध प्रत्यक्ष जर्मनीच्या भूमीवर थोडेसेच लढले गेले होते.कैसर राजाच्या पलायनाने जर्मनीला पराभव पत्करावा लागला.जर्मन जनतेच्या हे लक्षातच येत नव्हते की आपण युद्ध जिंकत असताना कसे हारलो.

जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले.जर्मनीला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली.
हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा त्याच्यापुढे किती प्रश्न होते ते पहा
- ६० लाख लोकांची बेकारी
- जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत अगदी हास्यास्पद झाली होती(जर्मनीचे चलन एवढे पडले होते की एक भाजीची जुडी घेण्यासाठी पोतेभर पैसे घेउन जावे)१ डॉलर= ७,००,००० जर्मन मार्क्स
अवघ्या तीन वर्षात त्याने या प्रश्नांचा निकालदेखील लावला आणि जर्मनीला स्वयंपूर्ण देखील केले
- पहिल्या महायुद्धाची भरपाई म्हणून दोस्त राष्ट्रांना अब्जावधी रुपयांची खंडणी द्यायची होती
- जर्मनीला एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य उभारायची परवानगी नव्हती
असे शेकडो प्रश्न त्याच्यापुढे उभे होते
हे सर्व प्रश्न त्याने ज्या पद्धतीने सोडवले, ते पाहता माणूस आश्चर्यचकीतच होतो कधी नमते, तर कधी धमकी तर कधी शांततेची तान.या सर्वांच्या जोरावर हिटलरने जगातील महाशक्ती समजल्या जाणा-या बड्या नेत्यांना असे झुलवले की त्याच्या मुत्सद्देगिरीची दाद त्याचे शत्रूदेखील देतात. जगाच्या रंगमंचावरचा हा अक्षरश: एकपात्री प्रयोग होता.

हिटलर १९३३ साली सत्तेवर आला तेव्हा त्याला बहुमत नव्हतेच। तरी तो सत्तेवर आला.सत्तेवर येताच त्याने तीन वर्षात जर्मनीला एवढे बलशाली केले की जर्मनीत त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.फक्त ३८% मते असताना तीन वर्षानंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९.९९ % बहुमत होते, यावरुन हे लक्षात यावे
- बेरोजगारी नावालाही शिल्लक उरली नाही
- जर्मनीचे चलन आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरावले
- व्हर्सायच्या तहाच्या चिंध्या केल्या व जाहीरपणे सांगितले की जर्मनी ही नुकसानभरपाई देण्यास बांधील नाही
- जर्मनीच्या सैन्याची आरमार विभागासकट पुनर्रचना केली
- युवकांना बलशाली करण्यावर कठोर मेहनत घेतली
(जेव्हा १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा शत्रूसैन्यापुढे जर्मन सैनिक एवढे बलशाली आणि ताकदवान दिसायचे की दोस्त राष्ट्राचे सैन्य जर्मनीला प्रतिकार करण्याच्या योग्यतेचे नव्हते आणि हिटलरला सहज चिरडू या भ्रमात राहण्यापेक्षा दोस्त राष्ट्रांनी सैन्य बांधणीस प्राधान्य द्यावयास होते असे हे बरेच इतिहासकार मान्य करतात)

हिटलरने रक्ताचा एक थेंबही न सांडता ३ भूभाग जर्मनीला जोडले.हे त्याच्या राजकीय ज्ञानाचे आणि आपल्या शत्रूंचे पाणी जोखण्याचे उत्तम उदाहरण आहे.दुसरे म्हणजे हिटलरची विलक्षण मानसिक शक्ती.त्याचे आडाखे इतके अचूक असत की त्याच्या पुढे त्याच्या सेनानींचा विरोध पूर्णपणे थंडावला.युरोपात जबरदस्त चढाई करुन १०-१५ दिवसांत एकेक देश जिंकून हिटलरने आपल्या शत्रूला जबरदस्त धडकी भरवली होती.हिटलरने रशियावर केलेली हिवाळ्यातील स्वारी त्याला खूप घातक ठरली.इतिहासकार हे खुल्या दिलाने मान्य करतात की हिटलरने रशियावर स्वारी केली नसती तर आज आपल्याला दुस-या महायुद्धाचा इतिहास वेगळाच दिसला असता.

अर्थात ज्यूंवरचे अत्याचार व गॅसचेंबर्समधील अमानवीपणा या पशूपेक्षाही हीन पातळीवरच्या योजनांनी हिटलरच्या आत लपलेल्या राक्षसाचेच दर्शन घडते. कदाचित दुसरे महायुद्ध जर्मनीने जिंकले असते तर भारत जर्मनीच्या गुलामगिरीत आला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. विल्यम शिरर याने स्वतःच्या डोळ्यांनी हिटलरचा उदय आणि अस्त पाहिला त्यावर त्याने "राईज अ‍ॅन्ड फॉल ऑफ द थर्ड राईश" हे अप्रतिम पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पीडीएफ स्वरुपात येथून उतरवून घेता येईल.

तर मित्रांनो, दुसर्‍या महायुद्धाचा हा अत्भुत इतिहास तुम्ही सर्वांनी अवश्य वाचा
तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल. Smile

Tuesday, November 16, 2010

पुस्तक परिचय : "पार्टनर" व.पु. काळे



एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले.

भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही.
पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो.

कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले. वैयक्तीक आयुष्यावर कदाचित अगणित कादंबर्‍या लिहिल्या गेल्या असतील.... वाचल्या गेल्या असतील... पण स्त्री-पुरुष , नवरा-बायको , आई - मुलगा, सासू - सून , भाऊ भाऊ, जिवाभावाचा मित्र, मालक-नोकर, विक्रेता-ग्राहक, दीर वहीनी या सर्व नात्यांवर कमी शब्दांत पण परिणामकारकपणे आणि विलक्षण प्रभावीपणाने क्वचितच कोणी लिहिले असावे.

पहिल्याच सार्वजनिक भेटीत ज्या सौंदर्यवतीला पाहताच एका सामान्य दिसणार्‍या तरुणाचे चित्त हरवते. तिला आपल्या खर्‍या प्रेमाची कबुली एकदम स्पष्टपणे देऊनही तिच्याशी लग्न होण्याची शक्यता नाही या वास्तवाचे भान आहे हे देखील तिलाच स्पष्टपणे सांगणे. तिच्याशी संसार फुलवताना प्रचंड समाधानाची भावना फक्त त्यालाच नव्हे तर तिलाही तितक्याच समर्पणाने जाणवते. तिला प्राप्त करताना त्याला मिळालेले समाधान, आणि त्याचबरोबर वाट्याला आलेला सख्ख्या आईसकट भाऊ व वहिनीचा तिरस्कार. असे कित्येक वेगवेगळे पण वेगवान घटनाक्रम वाट्याला येऊनही अधून मधून धूमकेतू सारखा अवतीर्ण होणारा 'पार्टनर'च त्याला प्रत्येक प्रसंगात जवळ कसा वाटतो. प्रेयसीचे रुपांतर आधी अर्धांगिनीत त्यानंतर मग आईत झाल्यावर तिच्या स्वभावातील बदल किती छोट्याशाच पण काळजाला चटका लावणार्‍या प्रसंगांतून वपुंनी दाखवून दिले आहे.

अर्थात कथानक हे 'पार्टनर' चे बलस्थान आहे की नाही माहिती नाही. किमान माझ्यामते तरी नाही. कारण घराघरात घडणार्‍या दाहक सत्याचेच पार्टनरमध्ये जळजळीत चित्रण केलेले आहे पण त्याहीपेक्षा अद्वितिय आणि मनात घर करुन बसणारी वपुंची योग्य वेळी केलेली योग्य वाक्यांची पेरणी आहे.
जसे
"पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही."
"आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक."
यातही 'नरक' या व्याख्येवर वपुंनी कोटी केली आहे. हाच नरक 'पार्टनर' मध्ये तीन वेगळ्या व्याख्यांनी दाखवलेला आहे. ते इथे सांगून या सुंदर पुस्तकाचा रसभंग नाही करत Smile
"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं."
"कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं."
ही असली सुंदर सुंदर वाक्ये पुस्तक हातातून खाली ठेवलं तरी मनात हिंदोळत असतात.
आणि त्याही पेक्षा मति गुंग करणारे म्हणजे क्वचित समोर येणार्‍या 'पार्टनर' चे विचार आणि त्याचे जीवन
"पार्टनर" केवळ एक कादंबरी नाहिये.... केवळ एक घटनाक्रम नाहिये.... तर एक सखोल चिंतन आहे.
मला वाटते यातच व.पुं.च्या 'पार्टनर' चे यश दडलेले आहे.

ज्याचे अनुभवविश्व समृद्ध झाले आहे त्याला पार्टनर कळला असे मी म्हणणार नाही तर त्याने 'पार्टनर' जगण्याचा अनुभव घेतला असेच म्हणेन. आणि म्हणूनच 'पार्टनर' हे लग्नानंतर काही वर्षांनंतर वाचायचे पुस्तक असे मी आवर्जून म्हणेन. Smile

Wednesday, November 3, 2010

माझी सर्वकालीन आणि सर्वात जवळची पुस्तके

माझा जो वाचनाचा मर्यादित आवाका आहे त्यातूनमाझी आवडती २० पुस्तके निवडताना मला सर्वात जवळची कोणती पुस्तके आहेत हा निकष लावलेला आहे. यातील पर्व सोडले तर बहुतेक सगळीच मी माझ्या बालपणापासून वाचत असल्यामुळे असेल कदाचित, पण ही पुस्तके वाचताना मी अगदी गुंग होऊन जातो. त्यामुळे जवळची पुस्तके हाच निकष लावला आहे मी. Smile
सर्वकालीन श्रेष्ठ २० पुस्तके तसे निवडणे कठीणच काम आहे. असो.. माझी यादी:

१. कोसला - भालचंद्र नेमाडे

२. युगान्त - इरावती कर्वे


३. वीरधवल - नाथमाधव


४. अवकाशाशी जडले नाते - जयंत नारळीकर 


५. वज्राघात - हरि नारायण आपटे


६. शकुंतला - आनंद साधले


७. पार्टनर - व.पु. काळे


८. सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर


९. पानिपत - विश्वास पाटील



१०. ययाति - वि.स.खांडेकर


११. अधःपात - गो.ना. दातारशास्त्री


१२. प्रेषित - जयंत नारळीकर


१३. नक्षत्रलोक - पं.महादेवशास्त्री जोशी


१४. मर्मभेद - शशी भागवत


१५. नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर


१६. छत्रपति शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर


१७. श्यामची आई - साने गुरुजी


१८. साद देती हिमशिखरे - गो.खं.प्रधान - अनु: रामचंद्र जोशी


१९. पर्व - एस.एल.भैरप्पा - अनु: उमा कुलकर्णी



२०. झुंज - ना.सं. इनामदार

ही यादी मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच केलेली होती. दोन-तीन पुस्तके सोडली तर यादी जवळपास तशीच राहिली आहे माझी  Smile

मराठी साहित्यविश्वाला लाभलेला "प्रेषित"

पुस्तकविश्व.कॉम च्या दिवाळी अंक २०१० मध्ये प्रकाशित 

लेखाचे नाव : मराठी साहित्यविश्वाला लाभलेला "प्रेषित"
पुस्तकाचे नाव : "प्रेषित"
लेखक : डॉ. जयंत नारळीकर
पुस्तकाचा प्रकार : विज्ञान कादंबरी





प्रेषित मी जेव्हा पहिल्या प्रथम वाचले तेव्हा नुसता थक्कच झालो नाही तर पूर्णपणे भारावून गेलो होतो. इतका की खगोलशास्त्रज्ञ होण्याची मी (दिवा)स्वप्नं पाहू लागलो. मला वाटते की डॉ.जयंत नारळीकर यांच्यासारख्या महान व्यक्तींची आपल्या देशाला खूप गरज आहे. नारळीकर केवळ संशोधनातच अद्वितीय नव्हते तर खगोलशास्त्र या विषयावर लोकांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी मातृभाषेतून समाजाला समजेल अशा भाषेत ( कथा - कादंबरी रुपाने) कित्येक पुस्तकांची देणगी दिली. प्रेषित मी माझ्या शालेय जीवनात वाचले तेव्हा केवळ खगोलशास्त्रज्ञ व्हायचे स्वप्न मनाशी बाळगून होतो. मी स्वतःवरुन नक्कीच सांगू शकतो की नारळीकरांनी मला माझ्या शालेय जीवनात प्रचंड प्रेरित केले होते. काही वैयक्तीक कारणास्तव मला माझी शिक्षणाची ही आवड जोपासून शिक्षणाला दिशा देणे शक्य नाही झाले. पण अजूनही मी खगोलशास्त्रावर जमेल तसे वाचन, चिंतन व लेखन करत असतो.

असो, तर हे सर्व सांगायचा मूळ हेतू जयंत नारळीकर यांच्या 'प्रेषित' या कादंबरीचे अवलोकन करणे हा आहे. 'प्रेषित' ने कित्येक शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात एक वेगळी दिशा दिली असणार याची खात्री आहे. ज्या मुलांना शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अशी मार्गदर्शक पुस्तके मिळतात ती मुले भाग्यवान होय.

तर 'प्रेषित' ची सुरुवात होते ती अमेरिकेतील जॉन प्रिंगल या एका शास्त्रज्ञाच्या वेगवान प्रवासाने. सायक्लॉप्स टाऊन या अवाढव्य परिसरात जेव्हा जॉन दाखल होतो तेव्हा सायक्लॉप्सच्या दुर्बिणीचे वर्णन थक्क करुन सोडणारे आहे. सायक्लॉप्स चे वर्णन करतानाच जॉड्रेल बँक या सर्वात मोठ्या दुर्बिणीची उपमा देऊन वाचकांच्या ज्ञानात बारीक सारीक माहितीची भर टाकण्यास जी सुरुवात करतात ती कादंबरी संपेपर्यंत सुरुच असते. असे असूनही कादंबरीतील थरार कुठेही कमी होत नाही.
तर हा धडाडीचा तरुण शास्त्रज्ञ जॉन प्रिंगल व त्याचा मित्र पीटर लॉरी यांच्या चर्चेतून राक्षसी तारे हे परकीय जीवसृष्टीचा शोध लावण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवून देताना वैज्ञानिक संशोधनाला सरकारी लाल फितींमध्ये कसे भरडले जाते याची काळी किनारही तितक्याच ताकदीने नारळीकर दाखवून देतात. पण या लाल फितीच्या हुकुमशाहीतही जॉन प्रिंगलसारखे हाडाचे वैज्ञानिक उपलब्ध असलेल्या दुर्बिणीचा विज्ञानासाठी योग्य पद्धतीने कसा वापर करतात. त्यातून काय फलनिष्पत्ती होते. सायक्लॉप्ससारखी अवाढव्य दुर्बिण ज्या हेतूने बांधली गेली होती तो मूळ हेतू जॉन प्रिंगल कसा साध्य करतो? जॉन प्रिंगलच्या त्या एका कृतीतून नक्की काय निष्पन्न होते? हे सर्व मुळातूनच वाचण्यासारखे आहे. त्याबद्दल अधिक सांगून रसभंग नाही करत.

तर जॉन प्रिंगलचे अचानक अपघाती निधन झाल्यावर अमेरिकेतील ही वेगवान कथा अवतीर्ण होते ती भारताच्या भूमीवर - महाराष्ट्रात सातारा-कराड महामार्गावर. सुधाकर आणि मालिनी या एका सुखी दांपत्याला रस्त्यावर एक मूल सापडते. त्यांच्या सुखात कमी असते ती फक्त अपत्याची ती देखील या सापडलेल्या मुलाच्या रुपाने पूर्ण होते. आलोक हे नाव ठेवले जाते या निसर्गाच्या देणगीचे.

आलोकच्या वाढत्या वयाबरोबरच सुधाकर आणि मालिनीला त्याच्या अफाट बुद्धीमत्तेची जाणीव होते. त्यानुसार सुधाकर आलोकच्या करियरसाठी योग्य ती तरतूद करतो. पण हा बालबृहस्पती एवढा विद्वान असतो की मिश्रांसारख्या कसलेल्या शिक्षकाचे मन जिंकून घेतो. त्यात आलोकला लहानपणापासून पाहणारे विद्वान डॉक्टर साळुंखे यांनी आलोकच्या बुद्धीमत्तेवर केलेले प्रयोग, त्यातून काढलेला निष्कर्ष, आलोकने स्पेस शटलमधून चंद्राची सफर करणे, जागतिक संघटनेत प्रवेश मिळवणे व त्यात आपली छाप पाडणे. या सर्व घडामोडींबरोबर आलोकच्या भावनिक बाजू जपणारी सँड्रा ही गर्लफ्रेंड व चेंग सारखा हरहुन्नरी मित्र घटनाक्रमात महत्वाची भूमिका बजावतात.

या सर्वांचा शेवट होताना कथानक पुन्हा भूतकाळाशी जोडले जाते व सर पीटर लॉरी यांची आलोक भेट घेतो ती कशासाठी? त्यातून काय साध्य होते? आलोकच्या बुद्धीमत्तेने प्रभावित होऊन डिक मम्फर्ड सारखा उच्चपदस्थ संचालक राष्ट्राध्यक्षांची सायक्लॉप्स वर काम करण्याची परवानगी आलोकसाठी का मिळवून देतो. आलोक या संधीचा पाठपुरावा कसा करतो? व का करतो? हे सर्व खूप खिळवून ठेवणारे व मनोरंजक आहे व मुळातूनच "प्रेषित" वाचून अनुभवण्याची गोष्ट आहे.

प्रेषित चे वाचन करताना जयंत नारळीकर हे किती उच्च श्रेणीचे शास्त्रज्ञ होते हे तर पटतेच पण स्वतःकडे असलेले ज्ञान पुस्तकरुपाने - ते ही मनोरंजक पद्धतीने - सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत कसे मांडायचे याची पुरेपुर जाणीव होती हे ही दिसून येते. 'प्रेषित' चे वाचन करताना सर्वसामान्य माणसाला अवकाशयुगाची नांदी कधीपासून सुरु झाली हा इतिहास तर कळतोच. पण चंद्रावरची सफर करण्यासाठी आधी किती वेळ लागायचा व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस होणार्‍या प्रगतीमुळे त्या वेगात वाढ कशी होणार आहे या भविष्यातील घटनेचा जणू आढावाच घेतलेला आढळतो. तसेच व्हिडिओ फोन, रेडिओ व ध्वनि तरंगाचे विज्ञान, रेकॉर्डींग क्षेत्रातील क्रांती. अशा कित्येक बारिकसारिक गोष्टींद्वारे विज्ञानाने सर्वसामान्यांच्या जीवनात केवढी मोठी क्रांती घडवून आणली आहे हे देखील नारळीकरांनी अतिशय सुंदर पद्धतीने दाखवून दिले आहे.

"प्रेषित" ची रचना खूप विचारपूर्वक झालेली जाणवते. पुस्तकाच्या अनुक्रमाणिकेपासूनच सुरुवात होते. प्रत्येक प्रकरणाला नारळीकरांनी खूप समर्पक नावे दिली आहेत हे प्रत्येक प्रकरण वाचताना जाणवते. जसे सायक्लॉप्स.... निसर्गाची देणगी .... स्पेस अ‍ॅकॅडमी.... सर पीटर.... टेपच्या शोधात...इ...इ...
जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते की "प्रेषित" या कादंबरीच्या रुपाने डॉ. जयंत नारळीकर यांनी मराठी साहित्यविश्वाला खूप अनमोल देणगी दिलेली आहे. या सुंदर पुस्तकाबद्दल डॉ. जयंत नारळीकर यांना मनःपूर्वक अनेक धन्यवाद.
- सागर

सदर लेखकाची अन्य वाचनीय व संग्राह्य पुस्तके :
कादंबर्‍या :
- अभयारण्य
- व्हायरस
- सूर्याचा प्रकोप
- वामन परत न आला
- अंतराळातील स्फोट
कथासंग्रहः
- यक्षांची देणगी
- अंतराळातील भस्मासुर
- टाइम मशीनची किमया
खगोलशास्त्रावरील माहितीपर पुस्तके:
- विश्वाची सहल
- विज्ञानाची गरुडझेप
- विज्ञान आणि वैज्ञानिक
- अंतराळ आणि विज्ञान
- अवकाशाशी जडले नाते
- याला जीवन ऐसे नाव

Wednesday, October 27, 2010

टॉप १० मराठी अनुवादित पुस्तके:

टॉप १० मराठी अनुवादित पुस्तके:

१. पॅपिलॉन - हेन्री शॅरियर - अनु: रविंद्र गुर्जर
२. द सेवन्थ सिक्रेट - आयर्विंग वॅलेस - अनु: विजय देवधर
३. अवलक्षणी बेत - जेम्स हॅडली चेस - अनु: अनिल गुजर
४. ब्लडलाईन - सिडने शेल्डन - अनु: विजय देवधर
५. दा विंची कोड - डॅन ब्राऊन - अनु: अजित ठाकूर
६. गॉडफादर - मारियो पुझो - अनु:रविंद्र गुर्जर
७. वारसा नॉस्ट्राडेमसचा - रेमंड लिओनार्ड - अनु: अनिल काळे
८. डेझर्टर - गंथर बान्हमान - अनु: विजय देवधर
९. तेथे गरुड उतरला - जॅक हिगिन्स - अनु: मोहनतारा पाटील
१०. मध्यस्थ - फ्रेडरिक फोर्सिथ - लीना सोहोनी

२७ साहित्य-नक्षत्रे

माझी सर्वकालीन आवडती मराठी पुस्तके: २७ साहित्य-नक्षत्रे :

१. कोसला - भालचंद्र नेमाडे
२. युगान्त - इरावती कर्वे
३. वीरधवल - नाथमाधव
५. वज्राघात - हरि नारायण आपटे
६. शकुंतला - आनंद साधले
७. पार्टनर - व.पु. काळे
८. सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर
९. पानिपत - विश्वास पाटील
१०. कोण्या एकाची भ्रमणगाथा - गो.नी. दांडेकर
११. आकाशाशी जडले नाते - जयंत नारळीकर
१२. प्रेषित - जयंत नारळीकर
१३. नक्षत्रलोक - पं.महादेवशास्त्री जोशी
१४. मर्मभेद - शशी भागवत
१५. नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर
१६. देवानाम् प्रिय - संजीवनी खेर
१७. श्यामची आई - साने गुरुजी
१८. मृत्युंजय - शिवाजी सावंत
१९. पर्व - एस.एल.भैरप्पा - अनु: उमा कुलकर्णी
२०. झुंज - ना.सं. इनामदार
२१. नित्य निरंजन - जगन्नाथ कुंटे
२२. ययाति - वि.स.खांडेकर
२३. साद देती हिमशिखरे - गो.खं.प्रधान - अनु: रामचंद्र जोशी
२४. छत्रपति शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर
२५. क्लिओपात्रा - संजय सोनवणी
२६. माझी जन्मठेप - विनायक दामोदर सावरकर
२७. ५५ कोटींचे बळी - गोपाळ गोडसे

Sunday, October 24, 2010

माझ्या ग्रंथसंग्रहातील अलिकडे घेतलेली छान छान पुस्तके

मी अलिकडेच घेतलेली पुस्तके

खरेदी पहिली :

जी.ए.कुलकर्णी
- काजळमाया
- रमलखुणा
- पिंगळावेळ
- सांजशकुन
गो.ना.दातार
- अधःपात
- इंद्रभुवनगुहा
- कालिकामूर्ति
गो.नी.दांडेकर
- कोण्या एकाची भ्रमणगाथा
- स्मरणगाथा
- महाराष्ट्रदर्शन
- रानभुली
- जैत रे जैत
- शितू
सुहास शिरवळकर
- गुणगुण
- अनुभव
- ऑर्डर ऑर्डर
- सायलेन्स प्लीज
- सूत्रबद्ध
- ट्रेलर गर्ल
- फलश्रुती
- थरारक
- ब्लॅक कोब्रा
भालचंद्र नेमाडे
- कोसला
विजय देवधर 
- डेझर्टर
अच्युत गोडबोले
- किमयागार
जगन्नाथ कुंटे
- साधनामस्त
- कालिंदी
- नित्य निरंजन
वि.स.खांडेकर
- ययाति
मूळ लेखकः पुपुल जयकर - अनुवाद: अशोक जैन
- इंदिरा गांधी
प्रदीप दळवी
- रक्तरेखा
मालती दांडेकर 
- चक्रवर्ति (अशोक)
अविनाश बिनिवाले
- पूर्वांचल
मूळ लेखकः डॅन ब्राऊन - अनुवाद: अशोक पाध्ये
- डिसेप्शन पॉईंट
बाळशास्त्री हरदास
- आर्य चाणक्य (भाग १)
रविंद्र गुर्जर 
- पॅपिलॉन
किरण नगरकर
- सात सक्कं त्रेचाळीस
- प्रतिस्पर्धी ('ककल्ड' या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद)
ना.सं.इनामदार
- राऊ
द.ग.गोडसे
- मस्तानी
व.पु.काळे
- पार्टनर
भालबा केळकर
- शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) बाल-वांड्ग्मय
मूळ लेखिका: डेबोरा एलिस अनुवादः अपर्णा वेलणकर
- ब्रेडविनर
- परवाना
मूळ लेखक: एस. एल्. भैरप्पा अनुवादः उमा कुलकर्णी
- पर्व

खरेदी दुसरी :
छावा - शिवाजी सावंत
झुंज - ना.सं.इनामदार
झेप - ना.सं.इनामदार
राशिचक्र - शरद उपाध्ये
पडघवली - गोनीदां
दुर्गभ्रमणगाथा - गोनीदां
शाळा - मिलिंद बोकील
आंधळी - शांता शेळके
सर्पगंध - अरुण ताम्हणकर
भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका - पु.ना.ओक
सत्तांतर (भाग १ नाही मिळाला २ व ३ मिळाले) - गोविंद तळवलकर
अग्निकांड - गोविंद तळवलकर
इफ टुमारो कम्स - सिडने शेल्डन - विजय देवधर
डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक - मंगला निगुडकर
समिधा - साधना आमटे

खरेदी तिसरी :
"सार्थ ज्ञानेश्वरी - आळंदीचे साखरे महाराज यांनी निरुपणासहीत विशद केलेली"

खरेदी चौथी :
१. एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
२. दूरदर्शी - माणिक कोतवाल - राजहंस प्रकाशन
३. प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
४. गांधीहत्या आणि मी - गोपाळ गोडसे
५. व्यासपर्व - दुर्गा भागवत
६. युगांत - इरावती कर्वे
७. ब्र - कविता महाजन
८. मी सायूरी - आर्थर गोल्डन - अनु: सुनंदा अमरापूरकर - मेहता पब्लिशिंग
९. एकलव्य - शरद दळवी

खरेदी पाचवी :
१. शक्तीपीठ - राजीव पटेल
२. उर्जेच्या शोधात - प्रियदर्शनी कर्वे
३. मला उत्तर हवे आहे : खगोलशास्त्र - मोहन आपटे
४. नांगरल्याविण भुई - नंदा खरे
५. मेमरिज ऑफ मिडनाईट - सिडने शेल्डन - विजय देवधर
६. तेथे गरुड उतरला - जॅक हिगिन्स - मोहनतारा पाटील

खरेदी सहावी :

१. कालगणना - मोहन आपटे सर
२. आर्यभटीय - मोहन आपटे सर

तुमची यादी देताय ना? Smile

पुस्तकवेडा ब्लॉगवर स्वागत

नमस्कार मित्रांनो,
मी पुस्तकवेडा या ब्लॉगच्या माध्यमातून मला आवडलेली व चांगली पुस्तके वाचकांना माहिती करुन देण्याच्या उद्देशाने हा ब्लॉग सुरु करत आहे

धन्यवाद,
सागर