Sunday, October 4, 2015

२०१५ - दिवाळी अंकांची तयारी


वाचकहो,

यंदाच्या वर्षी दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच जोमाने आणि अतिशय मुबलक प्रमाणात येत आहेत.
वाचकांना दिवाळी अंकांच्या या भाऊगर्दीत नेमके कोणते दिवाळी अंक वाचायचे हा प्रश्न नेहमीच पडतो. मी स्वतः बाजारात उपलब्ध असलेले जवळपास सर्व दिवाळी अंक पाहून मगच कोणते अंक घ्यायचे वा वाचायचे हे ठरवतो. सहसा माझा अंदाज आजपर्यंत चुकत नाही असा माझा अनुभव आहे. माझा हा अनुभव याही वर्षी दिवाळी अंकांच्या निवडीसाठी तुम्हा वाचकांसोबत वाटून घेणार आहे.
अनेक नवनवीन दिवाळी अंक अतिशय दर्जेदार साहित्य घेऊन येत आहेत. तर जुने दिवाळी अंक जुन्याच पण प्रतिथयश लेखकांना घेऊन दिवाळी अंक सादर करत आहेत. एकूणच मेजवानी वाट बघते आहे दिवाळीत.
माझी दिवाळी अंकांची निवड मी आतापासूनच सुरु केली आहेत. तरीही सर्व दिवाळी अंक बाजारात दिवाळी सुरु झाल्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत येऊन जातात. काही अपवादाने दिवाळीच्या शेवटी शेवटी बाजारात येतात. असो. माझी दिवाळी अंकांची ही सहल तुम्हा सर्वांना लवकरच सांगायला सुरुवात करेन.

धन्यवाद,
सागर 


Friday, July 31, 2015

जी,ए.कुलकर्णी यांच्या "रमलखुणा" च्या अर्पणपत्रिकेचे मर्म

जी,ए.कुलकर्णी यांच्या "रमलखुणा" च्या अर्पणपत्रिकेचे मर्म

जी.ए.कुलकर्णी  यांच्या "रमलखुणा" या अवघ्या दोनच पण दीर्घकथा असलेल्या सुंदर पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेतच जी.एं.ची गुंफण सुरु होते.
अवघ्या एका ओळीची अर्पणपत्रिका पण मनांत उत्सुकता निर्माण करणारी. 


   "बेळगांव नावाच्या गावास....पावले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती सतत जवळ राहिली आहे..." 



रमलखुणाच्या अर्पण पत्रिकेत आलेल्या बेळगांव या गावाबद्दलच्या ओळीमुळे जी.एं.बद्दल आलेल्या थोड्या गोष्टी येथे सांगणे अवश्य वाटते. कारण त्याशिवाय रमलखुणाच्या अर्पणपत्रिकेची उकल होणार नाही. 
बेळगांव येथील जी.एं.चे वास्तव्य हे क्लेशदायक होते. त्यामुळे जी.ए. पुढे धारवाडला स्थायिक झाले. बेळगांव मधील अनुभवांतून बेळगांवबद्दल जी.एं.च्या मनात एक अढी बसली. इतकी की त्यामुळे मधे एका कोर्टाच्या कामासाठी बेळगांवला जावे लागले असता त्यांनी गावात पाऊलही टाकले नाही. जी.एं.ची पुढील वाक्ये त्यांच्या या वेदनेचा प्रत्यय देतील. जसे,
"काही घरांनाच शापित चेहरा असतो की काय कुणास ठाऊक?"


"आपणाला मिळालेले आयुष्य पुन्हा जसेच्या तसेच जगण्याची तयारी असलेली माणसे भाग्यवानच म्हटली पाहीजेत. मी त्या भाग्यवंतांपैकी नाही"



"एखाद्या फरारी गुन्हेगाराला पकडण्यासाठी शिपाई टपून असावेत, त्याप्रमाणे तेथे जुन्या आठवणी टपून आहेत. खरे सांगायचे म्हणजे त्या आठवणींची जन्मठेप झालेलाच मी एक माणूस आहे" 

 

विजया राजाध्यक्ष यांना लिहिलेल्या एका पत्रात जी.एं.नी त्यांच्या या वेदना मांडलेल्या आहेत. 'जी.एं.ची निवडक पत्रे - खंड -४ मध्ये त्या सविस्तरपणे वाचायला मिळतील'.
याच पत्रात जी.एं.नी रमलखुणाच्या अर्पणपत्रिकेचे मर्मही सांगितले आहे. 

 
"मी माझे एक पुस्तक बेळगावला अर्पण केले आहे. त्यात माझा स्वतःचा एक अर्थ म्हणजे ते केवळ अर्पण नसून तर्पण आहे, असा आहे" 


जी.एं.च्या गारुडाचा हा प्रवास चालूच राहणार आहे. 
या अर्पण पत्रिकेवर लेखनाचा योग आला तो आमचे अशोक पाटील काका यांच्यामुळे. जी.ए.कुलकर्णींवर अधिकारवाणीने फेसबुकवर त्यांनी एक भरगच्च लेख लिहिला व त्यामुळे मी हे तोडलेले थोडेफार तारे. एवढेच. बाकी रमलखुणाची सगळी जादू जी.एं.ची

Tuesday, February 10, 2015

हिरण्यदुर्ग - एक रोमांचकारी संघर्षाचा प्रवास



८ फेब्रुवारी २०१५ च्या रविवार "महाराष्ट्र टाईम्स" च्या 'संवाद' पुरवणीत मी लिहिलेले हिरण्यदुर्ग या संजय सोनवणी लिखित पुस्तकाचे परिक्षण
जागेच्या अभावी सुरुवातीचा काही भाग छापून आलेल्या लेखात नाहिये. वाचकांसाठी मूळ लेख जसाच्या तसा देत आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/article…/46157310.cms
-------------------------------------------- 
हिरण्यदुर्ग  - एक रोमांचकारी संघर्षाचा प्रवास
- सागर भंडारे

अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार तसा मराठी साहित्याला नवा नाहीये. पण दुर्दैवाने मराठी साहित्यात या कादंबरी प्रकारात फारसे काम लेखकांकडून झालेले नाही. मुळात कथानक गुंफण्याचं विलक्षण कसब असणारा लेखकच या अद्भुताच्या विश्वात प्रवेश करायला धजावतो. हा साहित्यप्रकार मराठीत सुरु कसा झाला हा एक खरोखर एक उत्सुकतेचा विषय आहे.

मराठीत अद्भुतरम्य कादंबर्‍यांची सुरुवात गो.ना.दातार, ना.ह आपटे अशा लेखकांपासून सुरु झालेली असली तरी या लेखकांनी प्रामुख्याने रेनॉल्ड्स च्या इंग्रजी कादंबर्‍यांना मराठी वातावरणात बसवून सुरुवात केली. म्हणजे वस्त्र मराठी असले तरी आतला आत्मा विदेशीच होता. असे असूनही या सर्व लेखकांचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. गो.ना. दातार यांनी रेनॉल्ड्स या पाश्चात्य लेखकाच्या कादंबर्‍यांची भारतीय रुपांतरे मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे व त्या कादंबर्‍या लोकप्रिय झाल्यावर अद्भुतरम्य कादंबर्‍या अनेक मराठी लेखक लिहू लागले. पण त्या सर्व कादंबर्‍यांचे सांगाडे विदेशी लेखकांचे असत. पण मराठीत या साहित्यप्रकाराचा जणू दुष्काळच पडला. अधे-मधे अनेक प्रयत्नही झाले. पण शशी भागवतांखेरीज अन्य लेखकाचे नाव स्मरणात रहावे असे काम झाले नाही. काही दशकांपूर्वी 'मर्मभेद'कार म्हणून गौरविले गेलेल्या शशी भागवतांच्या या कादंबरीतले अद्भुत ऐयार त्यांच्याही आधी दोन दशकांपूर्वीच देवकीनंदन खत्रींच्या 'चंद्रकांता' या हिंदी कादंबरीत आले होते. 'चंद्रकांता'त ऐयार कुठून आले हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. पण बाळसे धरु लागलेला अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्य प्रकार आता संपुष्टात येतो की काय असे चित्र असतानाच आणि २०१४ वर्ष संपत असताना लेखक संजय सोनवणी यांची हिरण्यदुर्ग ही कादंबरी प्रकाशित झाली. हिरण्यदुर्ग मुळे अद्भुतरम्य कादंबरी या साहित्य प्रकाराचे नुसते पुनरुज्जीवनच झाले असे नव्हे तर या साहित्यप्रकाराला मराठी भाषेत संपूर्णपणे देशी बनावटीचे रुप बहाल केले. विदेशी सांगाडा आणि आत्मा पूर्णपणे फेकून देऊन लेखक संजय सोनवणी यांनी हिरण्यदुर्गची निर्मिती केली. यामुळेच ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मानदंड ठरणारी कादंबरी आहे. गेल्या कित्येक दशकांत प्रकाशित झालेल्या ढीगभर पुस्तकांत "हिरण्यदुर्ग" खरोखर सोन्याच्या तेजस्वितेने तळपणारे पुस्तक आहे.





या पार्श्वभूमीवर संजय सोनवणी लिखित 'हिरण्यदुर्ग' ही अद्भुतरम्य कादंबरी आहेच, पण त्या प्रकारात मानदंड ठरावी, अशी आहे. कारण आतापर्यंतच्या अद्भुतरम्य कादंब‍ऱ्या भारतीय रुपातल्या असल्या, तरी बहुतेकांचे कथासूत्र बव्हंशी विदेशी व क्वचित इतर भाषांतील कादंब‍ऱ्यांवरुन घेतलेले होते. म्हणूनच कथानकाचा सांगाडा व जडणघडण संपूर्णपणे मराठी असलेली 'हिरण्यदुर्ग' ही मराठीतील पहिली अद्भुतरम्य कादंबरी म्हणायली हवी.
सातवाहनांचा गौरवशाली काळ हा खरेतर महाराष्ट्राच्या व आपल्या देशाच्या इतिहासाचाही मानदंड असायला हवा होता. पण यावर दुर्दैवाने आपल्या संशोधक वा इतिहासकारांकडून म्हणावी तशी भरीव कामगिरी झाली नाही. स्वतः लेखक संजय सोनवणी हे इतिहास संशोधकही असल्याने सातवाहनांच्या काळाची पार्श्वभूमी 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीसाठी वापरुन त्यांनी एक प्रकारे वाचकांसाठी महाराष्ट्राच्या सातवाहन राजांच्या वैभवशाली इतिहासाची कवाडेच जणू उघडून दिली आहेत.

'हिरण्यदुर्ग' या कादंबरीत असे काय आहे की ज्यासाठी वाचक पुस्तकाला चिकटून राहतो? अद्भुत, वीर, रौद्र, बीभत्स, भय, रोमांच, थरार, शौर्य, प्रेम, वासना, थरकाप, हिडिस, घृणा, प्रेरणा, चेतना, आशा, निराशा, जय, पराजय, सुष्ट, दुष्ट, हिंसा, अहिंसा, संहार, प्रतिकार, अशा कित्येक प्रकारच्या मनोभावनांचा परिचय वाचकांना 'हिरण्यदुर्ग' ही अद्भुतरम्य कादंबरी करुन देते. कादंबरीचे नाव 'हिरण्यदुर्ग' असल्यामुळे हिरण्यदुर्ग या कादंबरीत केंद्रस्थानी असणार हे उघड आहे. तरीही कादंबरीची सुरुवात होते, ती सिंहभद्र आणि केतुमाल या दोन आगंतुक प्रवाशांबरोबर. हे दोन्ही प्रवासी वाट चुकून सूर्य मावळल्यानंतर हिरण्यदुर्गाच्या परिसरात येतात आणि त्यांचे खूप आदरपूर्वक स्वागत होते. प्रवासाने थकलेले हे दोघे प्रवासी हिरण्यदुर्गाची श्रीमंती पाहत सुग्रास भोजन करुन मदनमंजि‍ऱ्यांच्या गोड सहवासात रात्री गाढ झोपी जातात. सकाळी दोघे जागे होतात आणि पूर्णपणे हादरतात ते उध्वस्त भिंती... गच्च झुडपांचे रान... ढासळलेले बुरुज ...असा दुर्ग पाहून. काय असते हिरण्यदुर्गाचे हे भयंकर रहस्य? पुढे हिरण्यदुर्गाच्या कक्षेतून बाहेर पडून सिंहभद्र आणि केतुमाल हे प्रवास करु लागतात. वाटेत एक गूढ जटाधारी भेटून त्यांना आसरा देतो. त्याच्या साहाय्याने एका गुप्त गुहेच्या मार्गाने दुस‍ऱ्या बाजूने ते दोघे बाहेर येतात. या दरम्यान धनगरांकडून मिळालेली धक्कादायक वागणूक वाचकांना आश्चर्याच्या गर्तेत ढकलते. खुद्द सिंहभद्रदेखील त्या वागणुकीने चक्रावतो. जसजसा त्या निष्पाप व मोकळ्या मनाच्या धनगरांच्या सहवासात राहून सिंहभद्र गोष्टी ऐकत जातो तसतसा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. स्वतःच्या आजच्या अस्तित्वाची पाळेमुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या भयंकर संग्रामात दडलेली आहेत, हे जाणून स्वतः सिंहभद्र आणि पर्यायाने केतुमाल दोघांचाही थरकाप उडतो.

पुढे कादंबरीतील खलपुरुष पुलोम्याच्या सर्व शक्ती जागृत होतात आणि तो प्रकटतो. पुलोमा अवतीर्ण झालाय आणि सिंहभद्र अजूनही स्वतःच्या अस्तित्वाची पाळेमुळे शोधतो आहे. अशा विपरीत अवस्थेत भयंकर रणसंग्रामाला सुरुवात होते. असंख्य लोहपीसांचा वर्षाव करणारा लोहपक्षी, त्याच्याशी लढणारा सिंहभद्राच्या आज्ञेतील त्रिशूळ. सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच त्याला नष्ट करण्याच्या हेतूने अवाढव्य पर्वतच्या पर्वत उध्वस्त करणारा पुलोमा. पाताळगंगेचे रहस्य, विनाशकारी परिस्थितीत तेर नगरीतील सर्पांच्या राजाकडे सुरक्षित ठेवलेले गूढ आणि रहस्यमयी बाड. ते बाड मिळून सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच पुलोम्याने नागांच्या राणीला आपल्या सापळ्यात अडकवून बाड नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न. बाडाच्या रक्षणासाठी झटणा‍ऱ्या शक्तीश्री महाराजांना आलेले अपयश. अशातच गोंधळलेल्या सिंहभद्राच्या आयुष्यात देवसेनेचा अचानक झालेला प्रवेश. पुलोम्याला देवसेनेचा पडलेला मोह. अशा अनेक धक्क्यांमागून धक्के देणारे हे अद्भुतरम्य कथानक वाचकाची उत्कंठा शेवटच्या पानापर्यंत ताणून धरण्यात यशस्वी ठरते.

सिंहभद्र कोण असतो? देवसेना कोण असते? पुलोमा कसा अवतरतो? सिंहभद्राला जागे करु शकणारे बाड नष्ट होते का? त्यात काय असते? लोहपक्ष्याशी त्रिशूळ कसा लढतो? त्रिशूळ सिंहभद्राच्याच आज्ञेत का असतो? हिरण्यदुर्गाचे रहस्य काय असते? हिरण्यदुर्गाच्या पोटात असे काय रहस्य दडले असते की सर्वशक्तिमान पुलोमाही त्यात प्रवेश करु शकत नसतो? सिंहभद्राला त्याच्या शक्तींचे भान येते का? युद्धात कोण जिंकतो? पुलोमा की सिंहभद्र? तेर नगरीतील सर्प सातवाहनांच्या चरणी वाहिलेली आपली जन्मोजन्मीची निष्ठा पाळतात का? पाताळगंगेचे रहस्य काय असते? सातवाहनांच्या राजांची सिंहभद्र आणि पुलोमाच्या संघर्षात काय भूमिका असते? सातवाहन ते बाड एवढे का जपत असतात? शक्तिश्री राजाची कन्या देवसेनेचे एक रहस्य काय असते? कुबड्या कोण असतो? त्याचे रहस्यमय वागणे शेवटी कसे उकलते? कोण असतो हिरण्यदुर्गाचा खरा स्वामी? धर्मपाल आणि महाधम्मरक्ख (बौद्ध भिक्खू) सिंहभद्राला कोणती मदत करतात? शक्तीश्रीमहाराजांचे एकनिष्ठ सेवक आमोदक आणि गंगाधर बाडासाठी शेवटपर्यंत कसे झुंझतात? हिरण्यदुर्गाच्या परिसराचे रहस्य उकलते का? मरुगण नेमके कोण असतात? ते कोठून आलेले असतात? त्यांचा सिंहभद्राशी काय संबंध असतो? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पानोपानी उत्कंठा ताणून धरणा‍ऱ्या 'हिरण्यदुर्ग' या अद्भुतरम्य कादंबरीत मिळतात.
अद्भुतरम्य कादंबरी मध्ये धक्कातंत्र प्रभावीपणे वापरणे, हे अतिशय कौशल्याचे काम असते आणि त्यात 'हिरण्यदुर्ग' कादंबरीचे लेखक संजय सोनवणी यशस्वी झालेले आहेत. ही कादंबरी वाचताना वाचकाला पानोपानी धक्के बसतात. जेव्हा वाचक भानावर येतो तेव्हा लक्षात येते की आपली कादंबरी वाचून पूर्ण झालेली आहे. हेच 'हिरण्यदुर्ग'चे अद्भुत यश आहे. वाचकाला अजून काय हवे असते? 'हिरण्यदुर्ग' वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाच्या मनात उरतो तो एका थरारक व रोमांचकारी प्रवासाचा आनंद. .........

पुस्तकाचे नाव : हिरण्यदुर्ग.
साहित्य प्रकार : अद्भुतरम्य कादंबरी.
लेखक : संजय सोनवणी.
मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी.
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे.
पृष्ठं : ३५२
किंमत : ३५० रु.