Saturday, August 18, 2012

"प्रे (सावज)" एक थरकापवून टाकणारी विज्ञान कादंबरी


पुस्तकाचे नावः प्रे (सावज)
मूळ लेखकः मायकल क्रायटन

अनुवादकः प्रमोद जोगळेकर
प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत : रु. ३००/-

मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये.

जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्‍या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्‍यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच. पण त्याच्या जोडीला तो विज्ञान आणि निसर्गाचे नियम यांची अशी जबरदस्त तर्कशुद्ध जोड देतो की त्याच्या कादंबर्‍या या कल्पना वाटतच नाहीत. तर अगदी जवळच्या काळात हे सर्व वास्तवात येणार आहे असे वाचकाला मनोमन वाटून देण्यात तो कमालीचा यशस्वी झालेला आहे. थरारक कादंबर्‍यांमधून वाचकांचे सोप्या भाषेत ज्ञान संवर्धन करणे ही एक अत्भुत कला फार कमी लेखकांकडे असते. अशा हाडाच्या लेखकांपैकी मायकल क्रायटन आहे असे म्हटले तर ते योग्यच ठरेल.


असो... लेखकपुराण पुरे करतो आणि आता आपण मायकल क्रायटनच्या "प्रे (सावज)" या कादंबरीकडे वळूयात.

सर्वात आधी कादंबरीच्या नावाची थोडी उकल करतो. "प्रेड-प्रे" (प्रेडेटर-प्रे अर्थात "शिकारी-शिकार") या मूळ शब्दातून या कादंबरीचे साजेसं व समर्पक नाव लेखकाने दिलेले आहे हे कादंबरी वाचतानाच वाचकाला जाणवत राहतं. कादंबरीच्या गाभ्याशी आहे ते नव्याने उदयास आलेले नॅनो तंत्रज्ञान. नॅनो तंत्रज्ञानामुळे काय होऊ शकेल हे या कादंबरीत अतिशय छानपणे व कारणांसहित सर्वसामान्य वाचकाला सहज कळते. ही कादंबरी वाचताना फक्त एक आठवड्यांतील अत्यंत वेगवान घटनाक्रमाचा थरार वाचक अनुभवणार आहे, तेव्हा थोडक्यात कादंबरीबद्दल सांगतो.

तर या कादंबरीची सुरुवात होते ती कादंबरीचा नायक जॅक आणि त्याची पत्नी ज्युलिआ यांच्यापासून. जॅक एक उत्कृष्ट दर्जाचा संगणकातले प्रोग्रॅम्स तयार करणारा तज्ज्ञ असतो. आणि त्याने तयार केलेल्या प्रेड-प्रे (शिकारी=शिकार) तत्त्वावर बेतलेल्या मल्टी-एजंटच्या प्रोग्रॅम्सची कोणीतरी चोरी करतो. त्यामुळे त्याच्या कंपनीतून त्याला नोकरी गमवावी लागते व गेले सहा महिने तो बेकार असतो. अशा परिस्थितीत जॅकची पत्नी झायमॉस टेक्नॉलॉजीज् या कंपनीत काम करत असते व गेले काही आठवडे ती अतिशय व्यस्त झालेली असते. अशा परिस्थितीत जॅक या दांपत्याची नऊ महिन्यांची मुलगी अमाण्डा, आठ वर्षांचा मुलगा एरिक व बारा वर्षांची मुलगी निकोल या तिघांना अतिशय छान संभाळत असतो. पण कथानकाला सुरुवात होते तीच मुळी जॅकची पत्नी ज्युलिआच्या विक्षिप्त वागण्याने. जॅकला कळत नसते की ज्युलिआ असे का वागते आहे. बाहेरुन आल्यावर कधीही शॉवरखाली स्नान न करणारी ज्युलिआ ऑफिसातून आल्यावर स्वतःच्या नऊ महिन्याच्या मुलीला हातही न लावता आधी स्नान करु लागते. मग ज्युलिआ जॅकला एक व्हिडिओ डेमो दाखवते. झायमॉस टेक्नॉलॉजीला अमेरिकेच्या पेन्टॅगन या संरक्षण व्यवस्था पाहणार्‍या सरकारी संस्थेकडून एक कंत्राट मिळालेले असते. शत्रूच्या परिसरात जाऊन हवेतून हवी ती छायाचित्रे मिळवण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करोडो कॅमेर्‍यांचा समूह तयार करायचा अशा प्रकारचे ते काम असते.

ज्युलिआचे वागणे दिवसेंदिवस संशयास्पद होऊ लागलेले असते. ती ड्रायव्हिंग करताना तिच्या शेजारच्या सीटवर कोणीही नसते, त्यानंतर गाडी वळताना जॅक त्याच सीटवर एका माणसाला पाहतो. तेथून जॅकची चलबिचल सुरु होते. ज्युलिआचे कोणाशी अफेअर तर नाही ना? हा संशय बळावतो. मुलगी निकआई, मुलगा एरिक व छोटीशी अमाण्डा आपल्या आईचे बदललेले वागणे लगेच ओळखतात व त्यांना तिच्याबद्दल ममता वाटेनाशी होते. ज्युलिआ एवढी बदललेली असते की अमाण्डा का रडते आहे हेही अनेकदा तिच्या लक्षात येत नाही, अशा वेळी जॅक पुढे होऊन अमाण्डाला शांत करत असतो. दिवसेंदिवस ज्युलिआचे चिडचिडेपण वाढत असते. तसेच जॅकचाही संशय बळावत जातो की ज्युलिआचे ऑफिसमधील कोणाशी तरी अफेअर चालू आहे. मग तो सल्ला घेण्यासाठी आपल्या बहिणीचा सल्ला घेतो. फोनवर बोलताना त्याची बहीण एलेन त्याच्या मदतीसाठी त्याच्या घरी यायचे स्वतःच घोषित करते आणि जेणेकरुन कोर्टात घटस्फोटाची केस दाखल झाली तर जॅकची बाजू बळकट राहीन व तिन्ही मुले जॅककडेच राहतील.

पुढे या प्रयोगात काहीतरी गोंधळ होतो व चूक होते. त्या चुकीला निस्तरण्यासाठी जॅकलाच मदतीसाठी त्याच्या जुन्या कंपनीतून सल्लागार म्हणून पाचारण करण्यात येते. (जॅकची जुनी कंपनीच झायमॉसला तंत्रज्ञ पुरवत असते. झायमॉस टेक्नॉलॉजीमध्ये जॅकचे प्रोग्रॅम्स वापरले गेले आहेत हे तोपर्यंत त्याच्या लक्षात आलेले असते. पण तरीसुद्धा प्रॉब्लेम काय आहे हे त्याला स्पष्टपणे शेवटपर्यंत कोणीही सांगत नाही. ही ऑफर स्वीकारावी की नाही या द्विधा मनःस्थितीत जॅक असतो. पण त्या परिस्थितीत जॅकची पत्नी ज्युलिआचा अपघात होतो व तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावे लागते. अशा परिस्थितीत जॅकवर घराची जबाबदारी पण आलेली असते. जॅक त्याची बहीण एलेनावर जबाबदारी सोपवून झायमॉसची ऑफर स्वीकारतो व ताबडतोब नेवाडातील वाळवंटात असलेल्या झायमॉस च्या अवाढव्य प्रकल्पाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतो. त्यावेळी केवळ एक आठवड्यात अतिशय वेगवान व नाट्यमय घटनाक्रमाचा तो सूत्रधार असणार आहे हे त्यावेळी त्याला अजिबात जाणवलेले नसते.

झायमॉसच्या प्रकल्पापाशी पोहोचताच त्याला धोक्याची जाणीव होते. त्याचा खास मित्र रिक तेथे असतो हे पाहून त्याला बरे वाटते. आधीच्या कंपनीतून जॅकला हाकलून देण्यापूर्वी त्याच्या टीमचे सर्व सदस्य झायमॉसच्या या प्रकल्पावर काम करत असतात. नॅनो तंत्रज्ञान वापरुन केसाच्याही जाडीपेक्षा अत्यंत सूक्ष्म आकाराचे नॅनो रोबो तयार करुन त्यांचे काम एकत्रित रित्या एका थव्यासारखे करवून घेण्यासाठी जॅकच्या मूळ प्रोग्रॅम्सचा वापर या प्रकल्पात झालेला असतो. आकाराने अतिशय लहान असल्यामुळे वाळवंटातील वेगवान वार्‍यांत या नॅनोकणांच्या थव्याचा टिकाव लागत नसतो. पेन्टॅगॉनने या समस्येवर झायमॉसला उत्तर मिळणार नसेल तर प्रकल्पासाठीचा पैसा ताबडतोब थांबवण्याची धमकी दिलेली असते. त्यामुळे झायमॉसपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला असतो. जॅक एका सल्लागाराच्या भूमिकेत झायमॉसच्या नेवाडा वाळवंटातील प्रकल्पात गेलेला असतो (जिथे त्याची पत्नी देखील ज्युलिआ कित्येक दिवस काम करत असते). पत्नीचा प्रियकर कोण आहे हे शोधून काढायच्या हेतूने जॅकने ही ऑफर स्वीकारलेली असते. पण पुढील वेगवान घटनाक्रम जॅकला सत्य काय आहे ते दाखवतो.

नेवाडाच्या वाळवंटातील झायमॉसच्या या प्रकल्पात पाय ठेवताक्षणीच जॅकचे स्वागत अतिशय वेगवान हवेच्या मार्‍यांनी त्याला शुद्ध करणार्‍या बंद खोलीवजा प्रवेशद्वारापासून होते. विंस नावाच्या व्यक्तीशी परिचय झाल्यावर पुढे जॅकला त्याचा चांगला मित्र रिक भेटतो, तो पुढे प्रकल्पातील इतरांशी ओळख करुन देतो. रोझी कास्ट्रो, डेव्हीड ब्रूक्स, बॉबी लेम्बेक, मे चॅंग , चार्ली डेव्हनपोर्ट अशा लोकांशी जॅकची ओळख होते.

नॅनोकणांचा एक ढग चुकून हवेत निसटला आहे असे रिक जॅकला सांगतो आणि त्यांच्यात स्वतः शिकणार्‍या एजंटचा प्रोग्रॅम बसवलेला असल्यामुळे आणि जैवतंत्रज्ञानाची जोड देऊन स्वतःचे पुनरुत्पादन करण्याची क्षमता दिलेली असल्यामुळे हा थवा हळूहळू अत्यंत घातक झालेला असतो. याची प्रचिती एका सशाची शिकार किती सूत्रबद्ध व योजनाबद्ध पद्धतीने हा नॅनोकणांचा थवा करतो तेव्हा जॅकला येते. पुढे जॅकला असेही लक्षात येते की या नॅनोकणांच्या ढगाचे आयुष्य फक्त ३ तासांचे असते. पण त्यांच्यात पुनरुत्पादन क्षमता दिलेली असल्यामुळे त्यांची पुढील पिढी आधीपेक्षा प्रगत असते, त्यामुळे माणसाच्या आयुष्याच्या तुलनेत ते अतिशय लवकर शिकत असतात. त्या नॅनोकणांच्या ढगात सामूहिकपणे मेमरी टिकवण्याची क्षमता असते, व प्रेड-प्रे प्रोग्रॅममुळे घटनाक्रमातून लवकर शिकतही असतात. आधी द्विमिती मग त्रिमिती प्रतिमा तयार करणे, सावजाला योजनाबद्ध पद्धतीने जाळ्यात अडकवणे अशा अनेक घटनाक्रमांनी या कादंबरीत लेखकाने थरार निर्माण केलेला आहे. शेवटी शेवटी जॅकची पत्नी ज्युलिआ अपघात झालेला असूनही एमआरआय स्कॅन नाकारुन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेते व तेथे येते. तोपर्यंत प्रकल्पातील काही जणांचे प्राण गेलेले असतात व जॅकच्याही जिवावर एकदा नाही तर दोनदा बेतते. अशा परिस्थितीत तेथील एक महिला कर्मचारी मे चॅंग हीच जॅकला मदत करते. जॅकचा चांगला मित्र असलेल्या रिकचे वागणे अधिकाधिक संशयास्पद झालेले असते. रिक, ज्युलिआ, विंस, बॉबी अशा चौघांसाठी झायमॉसचा हा प्रकल्प खूप महत्त्वाचा का असतो? पुढे काय होते? ज्युलिआचे अफेअर असते का? ज्युलिआ एमआरआय स्कॅन का नाकारते? सर्वात शेवटच्या जीवघेण्या घटनेतून कोण कोण वाचते? नॅनोकणांचे पुढे काय होते? शेवटपर्यंत झायमॉसची प्रयोगशाळा न सोडणार्‍या रिकची भूमिका व नॅनोकणांचे ढग या सर्वांत काय दुवा असतो? जॅक तुझे सर्वात चांगले करण्याचा मी प्रयत्न करतो आहे असे रिक त्याला सांगत असतो त्यामागचे रहस्य काय असते? या प्रश्नांची उत्तरे सर्वात शेवटीच वाचकाला मिळतात.

अशा कित्येक मेंदूला मुंग्या आणणार्‍या प्रश्नांची उकल करण्यासाठी मायकल क्रायटनची ही थरारक कादंबरी "प्रे-सावज" वाचलीच पाहिजे.
सर्वात शेवटी पण तेवढेच महत्त्वाचे - मराठी साहित्यात विदेशी कादंबरीचा अनुवाद तितक्याच ताकदीने आणणे हे एक आव्हानच असते आणि ते प्रमोद जोगळेकरांनी अतिशय समर्थपणे पेलल्याचे या कादंबरीच्या वाचनात पदोपदी जाणवते. प्रमोद जोगळेकरांचे कौतुक फक्त त्यासाठीच नाही तर कादंबरीच्या शेवटी त्यांनी मूळ लेखकाने दिलेल्या संदर्भांची यादी व कादंबरीतील तंत्रज्ञान सहज लक्षात यावे यासाठी सोप्या भाषेत दिलेल्या २८ टिपांच्या परिशिष्टासाठीदेखील केले पाहिजे.

कादंबरीच्या शेवटी हे नॅनो तंत्रज्ञान योग्य प्रकारे हाताळले नाही तर त्यातून केवढा मोठा विनाशकारी आणि भयानक प्रसंग उद्भवेल अशा पद्धतीचा संदेश लेखकाने त्याच्या इतर कादंबर्‍यांप्रमाणे दिलाच आहे. हा संदेश आपल्याला अंतर्मुख नक्कीच करतो. वैज्ञानिक पार्श्वभूमीवरच्या कादंबर्‍या आवडणार्‍या वाचकांसाठी मायकल क्रायटनची "प्रे - सावज" ही एक मेजवानी आहे असे म्हणेन.

धन्यवाद,

- सागर