Thursday, September 11, 2025

२०२५ मध्ये अलीकडे घेतलेल्या नव्या पुस्तकांची ओळख

 

गेले कित्येक महिने कामाच्या व्यापातून स्वतःला जे आवडते ते करण्यासाठी म्हणजे वाचन करण्यासाठी वेळ मिळत नाहीये. तरीही चांगल्या पुस्तकांची माहिती घेणे आणि ती गोळा करणे हे काही थांबत नव्हते. अधून मधून समोर येणाऱ्या फेसबुक पोस्टवर व्यक्त होणे एवढाच काय तो संचार.
मग विचार केला अशा व्यर्थ गोष्टींत अडकायला तसाही वेळ मिळत नाहीये. मग वाचनासारख्या व्यासंगासाठी हा थोडाफार मिळणारा वेळ सत्कारणी का लावू नये ?
 
शेवटी ठरवले की अशी पुस्तके ठरवून घ्यायची आणि ती लवकरात लवकर वाचायची.
या २/३ आठवड्यात घेतलेली ही पुस्तके. मी अजून वाचली नसली तरीही ही सर्व पुस्तके दर्जेदार आणि अत्यंत वेगवेगळा वाचन अनुभव देणारी आहेत याची खात्री एक दर्दी वाचक म्हणून नक्कीच देऊ शकतो.
पुस्तकांचा सविस्तर परिचय पुढे केव्हातरी. सध्या प्रत्येक पुस्तक नेमके कशावर आहे ? पुस्तकाची थोडक्यात माहिती आणि हे पुस्तक का घेतले ? हेही थोडक्यात सांगतो. 
 
१. निबिरू ग्रह और पृथ्वी का गहरा संबंध
मूळ लेखक : झेकारिया सितचिन
सदर पुस्तक हे मूळ पुस्तक "The Lost Book of Enki" या पुस्तकाचा हिंदी अनुवाद आहे.
 
मराठी वाचकांना या पुस्तकाची ओळख कदाचित नसेलही. पण विलास सारंग यांचे "एन्कीच्या राज्यात" हे पुस्तक किमान ऐकून माहिती असेल. तर या पुस्तकात आलेली एन्की जिथून प्रेरित आहे त्याचे हे मूळ म्हणता येईल.
ज्ञात मानव संस्कृतीत अनुनाकी या निबिरू ग्रहावरून आलेल्या परग्रहवासीयांचा ६०,००० वर्षांपूर्वीचा इतिहास लिपीबद्ध स्वरूपात सुमेरियन संस्कृतीने जतन करून ठेवला होता. त्याचे पुढे बॅबिलोनियन क्युनिफॉर्म मध्ये रुपांतर करण्यात आले. जे आजही तिथल्या म्युझियम ची शोभा वाढवते.
या इतिहासावर सदर लेखकाची ६ पुस्तके आहेत. अनुनाकी हे परग्रहवासी पृथ्वीवर लांबच्या एका ग्रहावरून निबिरू वरून आले याची सविस्तर मांडणी करणारी ही पुस्तके आहेत. आणि ती इंग्रजी भाषेतून उपलब्ध आहेत. पण पुस्तके महाग आहेत. त्यामुळे तुलनेने स्वस्त असा हा हिंदी अनुवाद मी फुल नाही तर फुलाची पाकळी या नात्याने घेतला आहे. मराठीत या पुस्तकांचा अनुवाद उपलब्ध नाही. कोणाला मूळ पुस्तक इंग्रजीतून वाचायचे बघायचे असल्यास ऍमेझॉन वर पाहू शकता.
 
 
२. सफेद रात्री - फ्योदर दस्तोयवस्की 
 
लेखकाचे नावच पुरेसे आहे. हे अतिशय छोटे आणि एका बैठकीत वाचून होणारे पुस्तक आहे. दस्तोयवस्की ची क्राईम अँड पनिशमेंट, द इडियट अशी मोठी पुस्तके वाचली आहेत. पण हे सुटले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
३. निळावंती -- अ स्टोरी ऑफ अ बुक हंटर
 
हे पुस्तक अलीकडेच आकस्मिक आपल्यातून गेलेले एक सर्जनशील लेखक नितीन भरत वाघ यांचे आहे. निळावंती या गूढ प्राचीन पोथी च्या शोधाची ही एक कथा आहे. माझ्याकडचे हे पुस्तक कोणीतरी वाचायला घेतलेले परत आले नाही म्हणून हे पुस्तक मी घेतले असले तरी हेही पुस्तक वाचणार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 ४. The Metamorphosis - Franz Kafka
 
काफ्काबद्दल लिहिणे जरा अवघड आहे. पण काफ्का ज्यांनी वाचला नाही. किंवा वाचायचा आहे. पण सुरुवात कुठून करावी असे प्रश्न पडणाऱ्यांसाठी हे छोटेसे पुस्तक उत्तर आहे.
हे पुस्तक वाचून फ्रान्झ काफ्का याच्या वाटेला जायचे की नाही हे वाचकांच्या लक्षात यावे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
५. "गुरु" हे नितीन कोत्तापल्ले यांचे हे पुस्तक आहे.
 
या पुस्तकाबद्दल मी प्रत्यक्ष ज्यांना भेटलो नाही पण ज्यांच्या जवळपास प्रत्येक पोस्ट आवर्जून वाचतो त्या मोजक्या लोकांपैकी एक असलेल्या गणेश हनुमंत दिघे सरांमुळे या पुस्तकाची ओळख झाली. एका पुस्तकाची एका महिन्यात अनेक पारायणे जेव्हा दिघे सरांसारखा एखादा संवेदनशील व्यक्ती करतो तेव्हा अशा पुस्तकात वाचकाला मिळण्यासारखे, गवसण्यासारखे खूप काही भांडार असते. आकाराने मोठे असलेले हे पाचवे पुस्तक खूप काही देणार हे नक्की. कदाचित स्वतःला स्वतःशी भेट घडवून आणण्याचे एक आध्यात्मिक काम या पुस्तकामुळे व्हावे. जवळपास १०० पानी टिपणे सरांनी यावर काढली आहेत.
दिघे सरांच्या मित्र यादीत असलेल्यांना त्यांचे गुरू या पुस्तकावरचे लेखन इथे वाचता येईल : https://www.facebook.com/share/p/1JYyYhNCXU/
 
 
 
 
 
 
 
 
 
६. त्रिकोणी साहस - प्रगती पाटील या लेखिकेने समर्थपणे लिहिलेली विज्ञान कादंबरी. 
 
हेही पुस्तक आकाराने मोठे आहे. आणि म्हणूनच ही कादंबरी वेगळी ठरते. कारण विज्ञान कादंबरी लिहिण्यासाठी अभ्यास पण तेवढाच करावा लागतो. सर्व संदर्भ तपासून बघावे लागतात. ६०० पानी विज्ञान कादंबरी लिहिणे म्हणजे जवळपास ती एका आयुष्याची तपश्चर्या असते. कथानक मांडताना ...ते पुढे नेताना.. विज्ञान देखील त्यात मांडावे लागते. हेही पुस्तक वाचकांना वाचनानंद देणारे आहे.
मी वरील पुस्तकांचा आस्वाद पुढील काही दिवसांत , महिन्यांत घेणार आहेच. पण चांगल्या आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांची ओळख पुस्तकप्रेमींना देखील व्हावी यासाठी ही पोस्ट. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@highlight
धन्यवाद,
- सागर
 













 

 

No comments:

Post a Comment