Sunday, November 9, 2025

द स्पाय हू केम इन फ्रॉम कोल्ड - जॉन ल कारे...

 

 


द स्पाय हू केम इन फ्रॉम कोल्ड - जॉन ल कारे...

 जालावर मी अनेक वर्षे द स्पाय हू केम इन फ्रॉम कोल्ड या जॉन ल कारे लिखित अफलातून गुप्तहेर कादंबरीचा मराठी अनुवाद शोधत आहे. त्याला कधी यश येईल ते येवो. 
ही कादंबरी मी माझ्या शालेय जीवनात असताना वाचली होती. आणि एकदम भारावून गेलो होतो. पुढे कामानिमित्त दुसरीकडे स्थलांतर झाले आणि मराठी पुस्तकांच्या वाचनावर खूप मर्यादा येऊ लागल्या. मग जसे जमेल तसा पुस्तक संग्रह करू लागलो. त्यातच मराठीत पूर्वी वाचलेले पण इंग्रजी साहित्यातही अतिशय अभिजात समजली जाणारी 

The Spy Who Came in from the Cold ही  John le Carré यांनी लिहिलेली English आवृत्ती मला मिळाली आणि विकत घेऊन वाचली सुद्धा. पुन्हा तोच थरार अनुभवता आला. असे असले तरीही मराठी अनुवाद वाचण्यासाठी मी आजही तेवढाच आतुर आहे. 

मराठी वाचकांना या अद्भुत कादंबरीचा परिचय व्हावा यासाठी एका संकेतस्थळावर मिळालेला लेख देतो आहे. 
मूळ स्रोत आणि लेखाच्या शेवटी लेख ज्यांनी लिहिला त्यांचा इमेल आयडी देखील दिलेला आहे. 

मूळ लेख माझ्या ब्लॉग वर जसाच्या तसा कॉपी पेस्ट यासाठी करतो आहे की भविष्य काळात कोणत्या कारणाने मूळ स्रोत असलेली लिंक नाहीशी झाली तरी वाचकांना या कादंबरीचे महत्व सांगणारा हा लेख वाचता यावा.  

------------------------------------------ 

Source: https://divyamarathi.bhaskar.com/news/mag-book-review-spy-who-came-in-from-the-cold-4202933-nor.html 

अभिजात आणि लोकप्रियसुद्धा...

''सर्वसाधारणपणे गुप्तहेर कथा उत्कंठावर्धक असतात. रहस्यांचे भांडार असतात. वेगवान घटना-प्रसंगांची न संपणारी शृंखलाही असतात. त्यांच्या वाट्याला अमाप लोकप्रियतासुद्धा येते, परंतु अभिजातता आणि लोकप्रियता वाट्याला येणारी जॉन लकारलिखित ‘द स्पाय हू केम इन फ्रॉम कोल्ड’सारखी कादंबरी लाखात एकच असते...''

‘स्पाय हू केम इन फ्रॉम कोल्ड’ ही जॉन लकार या लेखकाची दुसरी कादंबरी 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली. ‘टाइम’ने त्याचा समावेश जगातील सर्वोत्कृष्ट 100 कादंबºयांमध्ये केला, तर ‘पब्लिशर्स विकली’ने आजपर्यंतची सर्वात थोर गुप्तहेरकथा म्हणून तिला गौरवले आहे. या कादंबरीत असं काय होतं? याअगोदर अनेक वर्षे इयान फ्लेमिंग, लेन डिलिटनपर्यंतच्या अनेक लेखकांनी गुप्तहेरकथा लिहिल्या आहेत. ग्रॅम ग्रीनसारख्या अभिजात कादंबरीकारानेही गुप्तहेरकथा लिहिल्या होत्या, अशा वेळी ‘स्पाय हू...’च्या लोकप्रियतेचे आणि यशाचे रहस्य शब्दात मांडणे कठीण आहे. सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की आजवरच्या गुप्तहेरकथा म्हणजे पुरुषी फँटसीचा आविष्कार होता. रहस्य, रोमांच किंवा साहसी वृत्ती, सुंदर स्त्रिया, धाडसी प्लॉट, प्रेमकथेची गुंफण व मोठ्या शक्तींच्या विरोधात लढणे, ही याच्या खपाची मूल्ये होती. साहजिकच ‘स्पाय हू...’मध्ये हे सगळे असूनही यापेक्षाही काहीतरी वेगळे होतेच. एक म्हणजे तिचा अस्सलपणा. ‘स्पाय हू...’ अगदी ‘ट्रू टू लाइफ’ वाटावी अशी कादंबरी होती. त्यात रंजक प्लॉट होता. प्रेमकथा होती. रहस्य होते. मोठ्या शक्ती होत्या आणि त्यात सामान्य माणसाचे पिचलेले जगणेही होते. जॉन लकार हे डेव्हिड कॉरनॉल यांचे टोपणनाव. ब्रिटिश गुप्तहेर खात्यात काम करत असल्याने त्यांनी हे टोपणनाव घेतले. कादंबरी यशस्वी झाल्यावर ते पूर्णवेळ लेखक म्हणून काम करू लागले. 5 वर्षांचे असताना त्यांना आई सोडून गेली. त्यांचे वडील इन्शुरन्स घोटाळ्यामुळे तुरुंगात गेले. त्यामुळे त्यांचे बालपण अत्यंत कठीण अवस्थेत गेले. इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. ते त्यांना कधीच आवडले नाही. 1950 मध्ये त्यांनी ब्रिटिश गुप्तहेर विभागात काम सुरू केले. कम्युनिस्ट देशांमधून पळून आलेल्या परागंदा लोकांच्या मुलाखती ते परदेशी भाषांतून घेत. इथेच त्यांना कादंबरीची काही सामग्री गवसली. या कादंबरीतून जॉर्ज स्मायली हा विलक्षण बुद्धिमान व थंड डोक्याचा ब्रिटिश गुप्तहेर आपल्याला भेटतो. प्लॉटच सांगायचा तर 1950 ते 60 या काळात ब्रिटिश गुप्तहेर खात्यातले अनेक गुप्तहेर पूर्व जर्मनीत मारले जातात. अलेक लेमस हा एकमेव गुप्तहेर उरतो. त्याला परत बोलावून घेतले जाते आणि ‘शेल्फ’वर म्हणजे काही न करता राहा, असे सांगून पगार वाटण्याच्या फालतू कामावर नेमण्यात येते. पण हे काम त्याला गुप्तपणे करायचे असते. परंतु इथूनच लेमसचे पतन सुरू होते. तो उधार-उसनवार करायला लागतो. दारू प्यायला लागतो. एक दिवस पैसे घेऊन गायब होतो. त्यानंतर तो एका लायब्ररीत काम करू लागतो. तिथे एका मुलीच्या प्रेमात पडतो. काही दिवस आजारी पडल्यावर तो तीही नोकरी सोडतो. व्यक्तिगत आयुष्यात उद््ध्वस्त झालेल्या लेमसला एक गूढ व्यक्ती भेटते. ती त्याला पूर्व जर्मनीत भेटल्याचे सांगते. याच दरम्यान ब्रिटिश गुप्तहेर बॉस कंट्रोल त्याला भेटतात आणि पूर्व जर्मनीत झालेल्या खुनांमागे असलेल्या मुंट या जर्मन गुप्तहेराचा निकाल लावण्याची योजना आखतात. मुंट हा डबल एजंट आहे आणि तो ब्रिटिशांसाठी काम करतो, असे सिद्ध करण्याची योजना असते. दरम्यान, जर्मन गुप्तहेरांच्या बाजूने अलेक लेमसशी संपर्क करण्यात येतो आणि त्याला जर्मनीत नेण्यात येते. फिडलर हा जर्मन गुप्तहेर मुंटच्या विरोधात असतो. मुंटची चौकशी सुरू होते. मुंट जेव्हा जेव्हा परदेशात होता, तेव्हा एका खात्यातून मोठी रक्कम काढली गेली आहे, हे चौकशीत पुढे येते. मुंट डबल एजंट आहे, हे सिद्ध होणार आणि लेमस मोकळा होणार, असं वाटताना फिडलरला अटक होते. लेमस ज्या मुलीच्या प्रेमात असतो, तिलाही चौकशीसाठी बोलावण्यात येते. तिचे नाव असते लिज! ती सांगते की, जॉर्ज स्मायलीने तिला अमुक एक रक्कम भाडे भरण्यासाठी दिली होती. शिवाय लेमसने केलेल्या अनेक गोष्टी ती सांगते. थोडक्यात, मुंटला अटक व्हावी म्हणून ब्रिटिशांनी मोठे ऑपरेशन रचल्याचे उघड होते. भांडे फुटले म्हणून लेमस किमान लिजला त्रास होऊ नये, अशी मागणी करतो व तिला सर्व ऑपरेशन समजावून सांगतो. खरी गोष्ट लेमसच्या लक्षात येते ती म्हणजे मुंट हा खरंच ब्रिटिश एजंट असतो. फिडलरला त्याचा संशय आल्याने ब्रिटिशांना त्याचा काटा काढायचा असतो. एकट्या मुंटला ते शक्य नसते, त्यामुळे ब्रिटिश दोन भागांची योजना आखतात. लेमसला तिथे पाठवायचे व मुंट डबल एजंट असल्याचे पुरावे देत मुंटला अडकवायचे; मग आपल्याच ऑपरेशनमधील कच्चे दुवे उघड होतील. अशा पद्धतीने लिजच्या वगैरे साक्षीने होणारी ही सगळी चौकशी खरं तर मुंटवर अन्याय करणारी आहे. प्रत्यक्षात तो प्रामाणिक एजंट आहे व फिडलर त्याला अडकवतोय, हे सिद्ध करून फिडलरचे करिअर संपवायचा डाव आहे. कादंबरीच्या शेवटी मुंट हा लेमस व लिजला पळायला मदत करतो, पण बर्लिनची भिंत ओलांडताना लिजला गोळी लागते. ती कोसळल्यानंतर तिला भिंतीच्या पलीकडे खेचून घ्यायला स्मायली व इतर असूनही लेमस भिंतीच्या अलीकडेच राहायचे ठरवतो व गोळीने तोही मरण पावतो. स्वातंत्र्य आणि समतेच्या ज्या लोकशाही मूल्यांचा जयजयकार पश्चिमी राष्ट्रे करतात; ती मूल्ये मोठ्या शासनसंस्था सर्रास पायदळी तुडवतात, हे सत्य ही कादंबरी दाखवते. कादंबरीचा हा भन्नाट प्रवास, त्या प्रवासात भेटणाºया व्यक्तिरेखा, एकातून एक निर्माण होत जाणारी भन्नाट घटना-प्रसंगांची मालिका, त्यातून वैश्विक सत्याचे होत जाणारे दर्शन वाचकाला शब्दश: खिळवून ठेवते. अभिजातपण आणि लोकप्रियतेचे रहस्य दडलेले असते...
(shashibooks@gmail.com)
 

 ----------------------------------------------------------

इथे पुस्तकाचा परिचय देणारा मूळ लेख संपतो. 

तुम्हाला जसे जमेल तसे मराठी / इंग्रजी ज्या भाषेत वाचायला मिळेल त्या भाषेत वाचा. पण ही अद्भुत कादंबरी नक्की वाचा. 
वाचलीच पाहिजे अशी जी जगात पुस्तके आहेत त्यात ही कादंबरी नक्कीच खूप वरची आहे. जेम्स बॉण्ड किंवा इथन हंट या नायकांचे ऍक्शन ने भरलेले हेरपट (Spy Movies) आवडत असतील तर ही कादंबरी तुम्हाला जबरदस्त हादरवणार हे नक्की. साहसकथा आवडणाऱ्या सर्वाना ही कादंबरी आवडेल.  

धन्यवाद 
- पुस्तकवेडा  

No comments:

Post a Comment