पुस्तकाचे नाव : शपथ वायुपुत्रांची
मूळ लेखक : अमिश त्रिपाठी
मराठी अनुवादः मेघना संभू-शेट्ये
पृष्ठसंख्या : ६८४
किंमत : रुपये ३९५
(पण ऑनलाईन मागवल्यास सवलतीत २१० ते २३० पर्यंत मिळून जाते)
शपथ वायुपुत्रांची कालच वाचून झाले. मला तरी शिवा ट्रिलॉजी आवडली. मूळ कथानक केंद्र स्थानी ठेवून मी वाचत असल्यामुळे आणि तांत्रिक, भाषिक, मुद्रण, अनुवाद अशा चुकांकडे दुर्लक्ष करु शकल्यामुळे कथानकाचा खूप मस्तपणे आनंद घेता आला. वायुपुत्रांची शपथ या तिसर्या आणि शेवटच्या भागाचा आत्मा दोन प्रमुख गोष्टींत आहे
१. कथानकाची लयबद्धता आणि
२. सती
या व्यतिरिक्त शिव, गणेश, कार्तिकेय, भगीरथ, भृगू, पाशुपतास्त्राची प्राप्ती, अज्ञात मारेकरी, मेलुहाचा सेनापति इत्यादी प्रमुख गोष्टी आहेतच. तरीही कथानकाचा आत्मा व्यापला आहे तो याच २ गोष्टींनी
सती चे पात्र प्रचंड ताकदीने या भागांत रंगवले गेले आहे. तसे ते सुरुवातीपासूनच होते. पण तिसर्या भागाच्या वाचनानंतर मनात काही उरत असेल तर ते शिव नसून सती. हे पात्र खूप ताकदीने रंगवले गेले आहे पण त्यामुळे शिवा ट्रिलॉजीच्या शेवटी शिव कमी उरतो.
माझ्यामते 'शपथ वायुपुत्रांची' च्या उणीवा व बलस्थाने अशी आहेत :
बलस्थाने:
१. सती
२. कार्तिकेयाने केलेला शत्रुचा संहार छान रंगवलेला आहे
३. तोच संहारक कार्तिकेय नंतर संयमी दाखवला आहे
४. कथानकाची सुसुत्रता आणि लयबद्धता
५. शिवाचे प्रभावी निर्णय आणि व्यक्तीमत्त्व
६. सतीचा निष्णात मारेकर्यांशी झालेला लढा. हे प्रकरण विशेष प्रभावित करते.
उणीवा:
१. शपथ वायुपुत्रांची हे शीर्षक असलेल्या भागात वायुपुत्रांचा प्रभावच जाणवत नाही.
२. पाशुपत्य अस्त्राची न समजणारी माहिती देऊन उगाच गोंधळ वाढवला आहे
३. शिव हा शीघ्रकोपी आणि संहारक अशी त्याची पुराणांतली प्रतिमा आहे असे असताना मेलुहाची राजधानी देवगिरी व त्यातील सर्व सैनिकांचा व मेलुहावासीयांचा संहार अतिशय संथपणे वेळ देऊन केलेला दाखवला आहे. बर हे फिक्शन आहे हे माहिती असूनही पुढे त्यानंतरच्या प्रकरणांत पुराणांतील कथांशी नाळ जोडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो तोकडा पडला आहे. असा शेवट उरकण्यापेक्षा कथानक स्वरुपातच शेवट दाखवला असता तर अधिक प्रभावी ठरला असता.
पहिल्या पुस्तकापासून शेवटच्या भागापर्यंत लेखकाने कथानकातील लयबद्धता टिकवली असल्याने आणि धक्का तंत्राचा बर्यापैकी यशस्वी वापर केला असल्यामुळे ही मालिका वाचनीय आहे हे नक्की.
सध्या व्यस्ततेमुळे थोडक्यात लिहिले आहे. पुढेमागे पूर्ण तिन्ही भागांवर (शिवा ट्रिलॉजीवर ) सविस्तर एक लेख लिहीन.
धन्यवाद,
- सागर
No comments:
Post a Comment