नमस्कार रसिक वाचकहो,
यंदाचे वर्ष दिवाळी अंकांच्या दृष्टीने जरा यथातथाच म्हणावे लागेल. दिवाळी अंक म्हटले की काही वर्षांपूर्वी अगदी उड्या पडायच्या. आता त्यापेक्षा जास्त उड्या पडतात. पण येथे मूळ मुद्दा येतो तो दिवाळी अंकांचा दर्जाही साजेसा आहे काय? मी दरवर्षी अनेक दिवाळी अंक घेतो. यावेळी अनेक दिवाळी अंक चाळूनही घ्यावे असे अजिबात वाटले नाही. तरीसुद्धा काही दिवाळी अंक घेतले आहेत , म्हणजे अनुक्रमणिका पाहून घ्यावे असे वाटले ते देतो आहे.
१. धनंजय (विषयांचे वैविध्य आणि भरपूर कथा. एकूणच पैसा वसूल असा हा दिवाळी अंक)
२. जत्रा (गेले अनेक वर्षे सूर हरपलेला हा दिवाळी अंक या वेळी जरा चांगला वाटला)
३. साहित्य चपराक (दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणारा अंक )
४. किस्त्रीम (वैचारिक मंथन आवडणार्यांसाठी किस्त्रीम हा नेहमीच एक मेजवानी असतो)
५. दक्षता (मिडियासारखा टीआरपी मसाला न लावता जे आहे ते व गुन्ह्यामागची पार्श्वभूमी व्यवस्थित सांगणारा गेली अनेक वर्षे दर्जा टिकवून असलेला हा अंक)
६. समदा (यात अनेक मान्यवरांच्या शाळेतील दिवसांच्या आठवणी आहेत , त्यामुळे अधिक छान झालाय हा अंक)
७. नवल ( दर वर्षी आपल्या विस्मय कथांनी एक वेगळेपण जपणारा हा दिवाळी अंक)
८. हंस (जाहिरातींना पूर्ण फाटा देऊन फक्त लेखांवर भर देण्याचा आगळावेगळा प्रयत्न करणारा हा दिवाळी अंक)
मुद्रीत दिवाळी अंकांपेक्षा आंतरजालीय दिवाळी अंकांमधे एक प्रकारचा उत्साह दिसला. खूप लोक लिहिताना दिसले. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील अनुभव , वेगवेगळ्या विषयांवरील कथा , कविता असे अनेक प्रकार बघायला मिळाले.
जालीय दिवाळी अंक :
मायबोली-हितगुज : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2013/index.html
ऐसी अक्षरे : http://www.aisiakshare.com/diwali13
मिसळपाव : http://www.misalpav.com/diwalianka.html
रसिक वाचक मित्र-मैत्रिणींनो तुमचा दिवाळी अंक वाचनाचा काही अन्य वेगळा अनुभव असेल तर जरुर सांगा. मलाही वाचायला आवडेल.
धन्यवाद,
-सागर
No comments:
Post a Comment